Food Processing Industry  Agrowon
यशोगाथा

Herbal Processing Business : कोकणात सुगंधी, वनौषधींपासून तेल, पावडर निर्मिती

Lemongrass Processing : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वर्दे (ता. कुडाळ) येथील धोंडू माणगावकर यांनी सुगंधी वनस्पती व वनौषधींपासून तेले व पावडर निर्मितीचे अवघड आव्हान पेलले. प्रशिक्षणासह तांत्रिक, व्यावसायिक ज्ञानवृद्धीतून त्यात उद्योगात कौशल्य मिळवले.

एकनाथ पवार

Agriculture Success Story : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस-भडगाव मार्गावर कुडाळ तालुक्यात वर्दे गाव आहे. भात हे येथील मुख्य पीक असून अलीकडील वर्षात काजूची लागवड वाढली आहे. गावातून प्रसिद्ध पीठढवळ नदी वाहते. त्यास एप्रिल अखेरीपर्यत मुबलक पाणी असते.

त्यामुळे उन्हाळ्यात भाजीपाला, कुळीथ, भुईमूग अशी पिकेही शेतकरी घेतात. गावातील कुंभारवाडी येथे धोंडू बाबाजी माणगावकर यांचे घर व शेती आहे. मात्र मुंबईलाच त्यांचे शिक्षण झाले. पदवीनंतर ते तेथेच व्यवसाय करू लागले. अर्थात गावाची ओढ कायमच होती. गणेशोत्सव आणि मेच्या सुट्टीत ते घरी आवर्जून येऊन राहत असत.

उद्योग करण्याची आस

मुंबईत त्यांची एका अभियंत्यासोबत मैत्री झाली. ते कुटुंब गोशाळा चालवायचे. त्या वेळी हा अभियंता मित्र व अन्य मित्र जेव्हा एकत्र यायचे त्या वेळी शेण, गोमूत्र, सेंद्रिय शेतीवर चर्चा घडायची. कालांतराने धोंडू यांनाही चर्चेत रस वाटू लागला. दैनंदिन व्यवसायाव्यतिरिक्त काहीतरी नावीन्यपूर्ण करावे असे वाटू लागले.

दरम्यान वनौषधी, त्यांचें उपयोग याविषयी सतत वाचनात आले होते. त्यामुळे त्यातील कुतूहल वाढले होते. अशातच लखनौ येथील देशात प्रसिद्ध सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल ॲण्ड ॲरोमॅटिक प्लांट्‍स यांच्या ऑनलाइन अभ्यासक्रमाची माहिती मिळाली. क्षणाचाही विलंब न करता प्रवेशाची प्रकिया पूर्ण केली. आठ दिवसांचा अभ्यासक्रम मनापासून पूर्ण केला देखील. तेवढ्यावरच न थांबता काही दिवसांनी लखनौ येथे प्रत्यक्ष जाऊन सविस्तर माहिती घेतली.

उद्योगातील सुरुवातीचे अनुभव

सन २०२० मध्ये कोरोनाचे संकट ओढवले. धोंडू दरवर्षी गणेशोत्सवासाठी गावी जायचे. परंतु या संकटामुळे महिनाभर ते आधीच गावी पोचले. त्यांना भेटणाऱ्या अनेकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या. हातावर पोट असलेल्यांची अवस्था बिकट होती. अशावेळी गावातच रोजगार निर्माण करता येईल का असा विचार धोंडू यांच्या मनात आला.

लखनौ येथे प्रशिक्षण घेतले होतेच. वनौषधींपासून कोणकोणती उत्पादने तयार होऊ शकतात याचा अभ्यास विविध स्त्रोतांमधून सुरू झाला. शेवग्याच्या पानांपासून बनविलेल्या पावडरीला मोठी मागणी असल्याचे लक्षात आले. त्यातून आपल्याच शेतात सुमारे पंधराशे झाडांची लागवड केली.

काहीनी लागवड करू नकोस म्हणून सल्ला दिला होता. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले. कोकणातील पाऊस व शेतातील पाण्याची अवस्था यामुळे हा संपूर्ण प्रयोग फसला. अनेकांच्या टीकेचे धनी व्हावे लागले. परंतु धोंडू यांनी त्याकडे लक्ष दिले नाही.

लेमनग्रासचा विदारक प्रयोग

त्याच वर्षी नव्या उमेदीने लेमनग्रासची लागवड केली. त्याची वाढ उत्तम होऊन प्रयोग यशस्वीही झाला. एका व्यापाऱ्याने खरेदीची हमी दिली होती. त्यानुसार लेमनग्रास कापून, वाळवून ठेवले. मात्र व्यापारी फिरकलाच नाही. मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. कापणी केलेले लेमनग्रास शेतातच खत म्हणून कुजविण्याची वेळ आली.

नव्या हिमतीने पुन्हा उद्योगाची वाट

पहिल्या दोन प्रयोगांत मोठे नुकसान लागले तरी धोंडू यांनी धैर्य तोडू दिले नाही. पुन्हा नव्या हिमतीने त्यांनी याच लेमनग्रासपासून तेल निर्मिती करण्याचा निश्‍चय केला. सोबत वनौषधींपासून पावडर तयार करण्याची जिद्द बाळगली. जागेची सुविधा, भांडवल उभारणे, यंत्रसामग्री, मनुष्यबळ अशा सर्व घटकांची उभारणी केली. त्यासाठी लागेल ते कष्ट वेचले. टप्प्याटप्प्याने एकेक उत्पादन तयार होऊ लागले. आज धोंडू यांचा या उद्योगात पाच वर्षांचा अनुभव तयार झाला असून त्यात ते स्थिरावत चालले आहेत.

माणगावकर यांच्या प्रक्रिया उद्योगाची वैशिष्ट्ये

जिल्ह्यातील एचडीएफसी बॅंकेच्या शाखेने यंत्रसामग्रीसाठी आठ लाखांचे कर्ज दिले. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रकिया उद्योग योजनेतून ३५ टक्के अनुदान मिळाले.

आज डिस्टिलेशन युनिट, निर्मिती ते पॅकिंगपर्यंतची विविध यंत्रे उपलब्ध आहेत. घराजवळ तीनशे चौरस फुटाचे व गावातच सहा हजार चौरस फुटाचे अशी दोन नुनिटस आहेत.

वनौषधींवर आधारित सुमारे पंधरा पावडरींचे उत्पादन. यात अश्‍वगंधा, शतावरी, हरडा, बाळ हरडा, अर्जुन, शेवगा पान, तुळस, बेहडा, हळद, काळी हळद, आवळा, रिठा, शिकेकाई, ब्राह्मी, त्रिफळा यांचा समावेश.

लेमनग्रास, वाळा, हळद यांच्यापासून तेलनिर्मिती.

कच्चा माल म्हणून सहा एकरांत लेमनग्रास तर काही गुंठ्यांमध्ये हळद, सिट्रोलिना, इन्शुलिन प्लॅंट, वाळा, ब्राह्मी यांची लागवड. सावंतवाडी, वेंगुर्ला, कणकवली तालुक्यांतील शेतकऱ्यांकडूनही कच्च्या मालाची थेट खरेदी होते. स्थानिकांना लेमनग्रास लागवडीसाठी प्रोत्साहित करण्याबरोबर शेतकऱ्यांना खरेदीबाबत हमी दिली जाते.

१५ टन लेमनग्रासवर होते प्रकिया. प्रति टन लेमनग्रासपासून साडेआठ ते दहा लिटरपर्यंत तेल उत्पादन.

प्रत्येकी दोन टन वनस्पतींवर प्रकिया करून पावडर निर्मिती.

वैश्विक प्रकृती ब्रँडने उत्पादनांची विक्री.

पावडरीच्या प्रकारानुसार प्रति किलो ३०० ते ५५० रुपयांपर्यंत किमती.

वार्षिक २२ लाखांपर्यंत उलाढाल.

बाजारपेठ

मुंबई, दिल्ली येथील तीन कंपन्यांशी करार केला असून त्यांना उत्पादनांचा पुरवठा होतो. त्यांच्याकडून उत्पादनांना चांगली मागणी आहे. सोशल मीडिया तसेच ऑनलाइन ट्रेडिंग उद्योगातील आघाडीच्या आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कंपन्यांच्या व्यासपीठावरूनही उत्पादनांची विक्री होते. ग्लोबल कोकण महोत्सवात वैश्‍विक प्रकृतीच्या उत्पादनांना आयोजकांनी मोफत स्टॉल उपलब्ध करून दिला आहे.

मदत, पाठबळ

प्रकिया उद्योगासाठी धोंडू यांना वडील बाबाजी, आई विजया, भाऊ सचिन, बहीण गीतांजली, पत्नी संजीवनी आदी सर्वांची मोठी मदत व पाठबळ लाभले आहे. लखनौ येथील संस्थेचे डॉ. आश्‍विन ननावरे यांचे वेळोवेळी तांत्रिक मार्गदर्शन, शासन नियुक्त प्रकल्प जिल्हा स्तरीय अधिकारी अरिता सूरज तेंडुलकर तसेच सरपंच व ग्रामस्थांचेही सहकार्य लाभल्याबाबत कृतज्ञता धोंडू व्यक्त करतात.

धोंडू माणगावकर ९७७३३६९००७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT