Rural entrepreneurs Success Story : लातूर जिल्ह्यातील मुरूड येथील समाधान सरडे यांची सेलगाव (ता. कळंब) येथे वडिलोपार्जित पाच एकर शेती आहे. बारावीनंतर डी. फार्मसी. करून औषध विक्री व्यवसायाची इच्छा असल्याने तसा संबंधित महाविद्यालयात प्रवेशही घेतला. वडील तेरणा कारखान्यात कामगार होते. कारखाना बंद पडल्यानंतर कुटुंबांची आर्थिक स्थिती खालावली. डी. फार्मसीच्या दुसऱ्या वर्षाचे तीन हजार रुपये शुल्क भरण्यासाठी पैसे नव्हते. नाइलाजाने शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागले.
मग मुरुडमध्ये मेडिकल दुकानात नोकरी केली. त्यानंतर भागीदारीत आडस येथे तर लातूरला स्वतःचा औषध विक्रीचा व्यवसाय सुरु केला. दरम्यान, १९९९ च्या काळात नेटवर्क मार्केटिंगमध्ये ते सहभागी झाले. त्यात जम बसविल्यानंतर मित्राच्या मदतीने स्वतःची कंपनी स्थापन करून देशभरात पाच लाख गॅस सेफ्टी किटची विक्री केली. रात्रीचा दिवस केला. कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून देशभर प्रवास केला. परिषदा, मेळाव्यांमध्ये भाग घेतला. अखेर ठरावीक टप्प्यावर हा व्यवसाय थांबवून शेती व जोडीला दुग्ध हा पूरक व्यवसायच करायचा हे पक्के केले. अखेर कंपनीच्या भागीदारीतून ते बाहेर पडले.
शेतीच्या विकासाकडे लक्ष
सारे कौशल्य व कष्ट पणास लावून सरडे यांनी आपली कंपनी मोठी केली होती. त्यातील उत्पन्नाची शेतीत योग्य गुंतवणूक करीत पळसप (ता. धाराशिव) शिवारात सुमारे सतरा वर्षांपूर्वी ९२ एकर माळरान जमीन खरेदी केली. भाऊ संतोषच्या मदतीने जमिनीचा कायापालट करण्यास सुरुवात केली.
दीड किलोमीटरवरील पाझर तलावातून ८० एकर जमिनीवर गाळ वापरला. पावसाळा वगळल्यास सलग तीन वर्षे रात्रंदिवस गाळ वापरण्याचे टाकण्याचे काम सुरु होते. त्यासाठी दोन टिप्पर व एक जेसीबी यंत्राची खरेदी केली. त्यातून चार कोटी रुपये खर्चाचे काम पन्नास लाखांच्या डिझेलमध्ये तडीस केले. काम पूर्ण झाल्यानंतर यंत्रे- वाहने विकण्यात आली.
दुग्ध व्यवसायातील वाटचाल
सन २०२२ पासून दुग्ध व्यवसायास सुरुवात केली. मात्र विविध ११ ठिकाणी जाऊन एक ते दोनदिवसीय प्रशिक्षण घेतले. ‘नेटवर्क मार्केटिंग’चा पूर्वानुभव असल्याने दूधविक्रीबाबात आत्मविश्वास होता.
केवळ उत्पादन व गुणवत्ता यांचे गणित समजून घेण्याची गरज होती. सांगली जिल्ह्यातील अरविंद पाटील यांच्याकडे तीन दिवसांचे प्रशिक्षण घेऊन त्यांच्याच मदतीने हरियानातून मुऱ्हा जातीच्या आठ म्हशी व एक रेडा आणला.
त्यासाठी हरियानामध्ये आठ दिवस अभ्यासवजा भटकंतीही केली. १२० बाय ६० फूट आकाराचा गोठा बांधला. त्याची सुमारे ६५ म्हशींचे बंदिस्त पद्धतीने पालन करण्याची क्षमता आहे. गोठ्यात पैदास झालेल्या १२ व खरेदी केलेल्या अशा आजा ४२ पर्यंत म्हशींची संख्या आहे.
व्यवस्थापनातील बाबी
पक्क्या सिमेंट गव्हाणी. स्वयंचलित पद्धतीने पिण्याच्या पाण्याची सुविधा.
प्रत्येक म्हशीसमोर १५ लिटर पाण्याचे ड्रम. पाणी प्यायल्यानंतर तेवढेच पाणी पूर्ववत त्यात संकलित होते पन्नास हजार लिटर क्षमतेचा हौद बांधला आहे.
हिरव्या चाऱ्यासाठी प्रत्येकी सहा एकरांत मका व संकरित नेपियर गवताची लागवड.
उत्पादित ज्वारीचा कडबा व सोयाबीन गुळीच्या माध्यमातून वाळलेला चारा उपलब्ध होतो. कुट्टी करूनच चारा देण्यात येते.
दिवसातून दोन वेळा म्हशी स्वच्छ धुण्यात येतात.
पशुवैद्यकांच्या सल्ल्याने नियमित लसीकरण. स्वच्छता, प्रमाणात पौष्टिक आहार व नियमित पाणी यामुळे म्हशी आजारांना कमी बळी पडतात.
अल्पावधीतच दुधाची होते विक्री
सुरुवातीच्या काळात मोठी कसरत झाली. उत्तर प्रदेशातून आलेले मजूर पुन्हा निघून गेले. पुढील काही दिवस स्थानिक मजुरांच्या साह्याने व्यवस्थापन सांभाळताना कस लागला. पुन्हा उत्तर प्रदेशातील मजूर आल्यानंतर व्यवसायाची घडी पूर्ववत झाली. आज गोठ्यात पहाटे लवकरच कामास सुरवात होते. दररोज किमान दीडशे लिटरहून अधिक दुधाचे संकलन होते. मुरूड येथे सरडे यांनी दूध विक्री केंद्र थाटले आहे. श्री महादेवाच्या नावावरून दक्षीत डेअरी फार्म असे त्याचे नामकरण केले आहे. गोठ्यातून या ठिकाणी सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळेस दूध येते.
सरडे स्वतः येथे प्लॅस्टिक पिशवीबंद दुधाची विक्री करतात. दुधाची गुणवत्ता कायम जपली आहे. त्यामुळे ग्राहकांना त्याची प्रतीक्षा असते. केंद्रात दूध आल्यानंतर केवळ पंधरा ते वीस मिनिटांच्या कालावधीत पूर्ण दुधाची विक्री होते. सत्तर रुपये प्रति लिटर असा त्याचा दर आहे.
खर्चाचा विचार करता महिन्याला सुमारे ४० ते ५० टक्क्यांपर्यंत नफा मिळत असल्याचे सरडे सांगतात. या व्यवसायातून महिला व पुरुष मिळून दहाजणांना रोजगार दिला आहे.
ग्राहकांकडून दुधाला मोठी मागणी असल्याने येत्या काळात आणखी पंधरा म्हशी खरेदी करून रोजचे दूध संकलन चारशे लिटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. वडिलांचे २००६ मध्ये निधन झाले. त्यानंतर आई सुमनबाई व पत्नी सोनाली यांचे व्यवसायात मोठे पाठबळ मिळत असल्याचे सरडे यांनी सांगितले.
पाण्याची शाश्वती
शेतीत सोयाबीन, ऊस, मका आदी पिके घेतली आहेत. तीन विहिरी व ११ विंधन विहिरी खोदल्या आहेत. सर्व विहिरी व शेततळी पाईपलाईनद्वारे एकमेकांशी जोडले आहेत. एका विहिरीचे पाणी संपले तरी दुसऱ्या विहिरीचे पाणी उपयोगात आणता येते. सुरवातीला तीस- चाळीस एकरांत ऊस होता. मात्र पाणी कमी पडू लागल्याने आता त्याचे क्षेत्र १८ एकरांपर्यंत आहे.
उन्हाळ्यात पाणी कमी पडते. मात्र पाण्याची शाश्वती मिळवण्यासाठी दोन एकरांत शेततळे खोदण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यात पाच कोटी लिटर पाणी साठवण होईल. शेततळ्यात बाजूच्या ओढ्याचे पाणी येऊन साठते. त्यामुळे येत्या काळात पाण्याची चिंता मिटणार असल्याचे सरडे सांगतात.
- समाधान सरडे ९१५८३०१३००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.