
Dairy Success Story : नाशिक जिल्ह्यात शेरूळ (ता. मालेगाव) येथील धर्मा भागचंद चुने यांची ४२ एकर शेती होती. मात्र कोरडवाहू, निसर्गाचा लहरीपणा, पारंपरिक जिरायती पिके आदी बाबींमुळे आर्थिक शाश्वती मिळत नव्हती. अशा प्रतिकूल परिस्थितीत थोरला मुलगा दीपक यांनी कला शाखेसह (इंग्रजी) शिक्षणशास्त्र विषयात पदवी मिळवली.
धाकटा मुलगा ज्ञानेश्वर यांनीही कला शाखेच्या पदवीसह आयटीआयचा व्यावसायिक शिक्षणक्रम पूर्ण केला. मात्र अपेक्षेप्रमाणे नोकरी न मिळाल्याने दोघांनी जिरायती शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसाय सुरू केला. त्यासाठी धुळे येथून पाच म्हशी खरेदी केल्या. पाच वर्षे त्यात मेहनत केली.
नाशिकमध्ये स्थलांतर
उत्पन्न मर्यादित असल्याने नाशिकमध्ये स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पाच म्हशी घेऊन जानेवारी २०२० मध्ये नाशिकमध्ये चुने भावंडे परिवारासह दाखल झाली. आडगाव परिसरात जागा भाडेतत्त्वावर घेतली. अडचणींतून मार्ग काढत कशीबशी कामाची गाडी रुळावर आली, तोच कोरोनाची टाळेबंदी सुरू झाली.
दूध उत्पादन व विक्री व्यवस्था कोलमडली, अशावेळी दोघे बंधू धीराने परिस्थितीला सामोरे गेले. उत्पादनात सातत्य, गुणवत्ता आणि स्वच्छता या जमेच्या बाजू असल्याने ग्राहकांकडून दुधाला कायमच पसंती मिळत राहिली. त्यामुळेच व्यवसाय विस्तारता आला.
व्यवसायाचा विस्तार
मेहनतीने पुढील रूप धारण केले. व्यावसायिक दृष्टीकोन, आर्थिक बचत, भांडवल नियोजनातून दावणीला नव्याने गुजरातमधील तलाजा (भावनगर) येथून पशुपालकांकडून १६ म्हशी खरेदी केल्या. आजमितीला म्हशींची संख्या ३८ पर्यंत असून पैकी २३ दुधाळ आहेत. एक गाय आहे.
प्रामुख्याने जाफराबादी म्हशीचे संगोपन होते. या म्हशी प्रति दिन सरासरी १५ लिटर तर काही २० ते २२ लिटरपर्यंत दूध देतात. दररोज प्रति जनावरापासून किमान सात लिटर दूध मिळेल असे नियोजन असते. त्यासाठी व्यायलेल्या जातिवंत म्हशींची खरेदी व म्हशी भाकड झाल्यानंतर विक्री असे नियोजन ठेवले आहे.
व्यवस्थापनातील बाबी
पहाटे चारच्या दरम्यान शेण काढणीपासून दिवसाला सुरुवात होते. त्यानंतर सरकी व गोळी पेंड एकत्र करून खाद्य देऊन दूध काढणी होते. त्यानंतर साडेसहाच्या सुमारास पाणी पाजण्यासह पंप फवाऱ्याच्या साहाय्याने म्हशी व गोठ्याची स्वच्छता होते. त्यानंतर मका आणि हिरव्या चाऱ्याची कुट्टी व त्यात कोरडा चारा मिसळून वैरण देण्यात येते. सकाळी ८.३० ते दुपारी अडीचपर्यंत जनावरांना आराम देण्यात येतो. त्यानंतर पुन्हा सकाळच्या सत्रातील कामे उरकली जातात.
कामकाज दृष्टिक्षेपात
११० बाय ३३ फूट अंतराचे गोठा शेड.( निर्जंतुक, माशांविरहित)
हिरवा चारा कुट्टीसाठी विजेवरील यंत्र.
पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनद्वारे थेट गव्हाणीत व्यवस्था.
जनावरे व गोठा धुण्यासाठी पंपाचा वापर
म्हशींना बसण्यासाठी रबर मॅटचा वापर
जनावरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आहारात खनिज द्रव्ये, कॅल्शियम, मीठ, हळद यांची मात्रा
दर तीन ते चार दिवसांनी पशुवैद्यकाची भेट व जनावरांची तपासणी
वर्षातून एकदा लाळ्या खुरकूत व घटसर्प लसीकरण
जंत निर्मूलनासाठी सहा महिन्यातून एकदा इंजेक्शन तसेच गोळ्यांची मात्रा
दुध काढणीपश्चात साठवणूक व वाहतुकीसाठी अल्युमिनिअम व स्टील कॅन वापर.
खर्चाच बचतीवर दिले जाते प्राधान्याने लक्ष
संतुलित आहार देण्याबरोबर पुढील सहा महिन्यांसाठी लागणाऱ्या खाद्याची खरेदी करण्यात येत असल्याने आर्थिक फायदा होतो. चारा पुरवठादारांकडून नियमितपणे चारा घेत असल्याने विश्वास व पत निर्माण झाली आहे. एकूण चोख व्यवस्थापनातून जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी असते. हिरव्या चाऱ्याची खरेदी नाशिक परिसरातूनच तर कडव्याची खरेदी चाळीसगाव, पारोळा, शिरपूर, धुळे परिसरातून होते.
‘न्यू मदर डेअरी’ फार्म नावाने ओळख
सुरुवातीच्या काळात संघर्षातून सुरू झालेला व्यवसाय आता स्थिरावला आहे. सकाळी दिनेश तर दुपारच्या सत्रात ज्ञानेश्वर यांच्याकडे जबाबदारी विभागली आहे. दोन मजुरांचीही दैनंदिन कामकाजात मदत होते. वडील धर्मा, आई सुंदरबाई देखरेख ठेवण्याचे काम करतात. दररोज सकाळी व सायंकाळी नांदूर नाका - जत्रा लिंक रस्त्यावर स्टाॅलरूपी विक्री केंद्राद्वारे तीनशे लिटर दुधाची विक्री होते. केली जाते.
मागणी वाढल्यास अन्य शेतकऱ्यांकडून दूध घेण्यात येते. उत्तम सेवा, तत्परता व विश्वासार्हता यामुळे 'न्यू मदर डेअरी फार्म' अशी चुने बंधूंनी आपली ओळख निर्माण केली दूध शिल्लक राहिल्यास पनीर, दही व तूप निर्मिती घरगुती पातळीवर केली जाते. भेसळ विरहित व रास्त दर यामुळे ग्राहकांकडून या पदार्थांनाही मागणी असते. उत्पन्न व मासिक खर्च पाहता महिन्याला पाच ते सहा लाख रुपयांची उलाढाल होते.
कष्टातून पालटले दिवस
कोणताही व्यवसाय करताना सुरुवातीला संघर्ष, पुढे जिद्दीने अविरत कष्ट व कुटुंबातील सर्व सदस्यांनी एकविचाराने नियोजन केल्यास व्यवसायात प्रगती होते, हे चुने कुटुंबाने सिद्ध करून दाखवले आहे. पूर्वी गावी कुटुंबावर पीककर्ज, सोनेतारण असे १० लाखांवर कर्ज होते. आज या व्यवसायामुळे कुटुंब कर्जमुक्त झाले आहे.
नाशिकमध्ये स्वतःचे घर झाले. मुलांना दर्जेदार शिक्षण दिले जात आहे. कुटुंबाची सामाजिक व आर्थिक प्रगती झाली आहे. ज्याची मेहनत त्याला फायदा, दुर्लक्ष झाल्यास तोटा, त्यामुळे कष्टांची तयारी ठेवायला हवी. सोबतच आर्थिक शिस्त आणि व्यसनमुक्त जीवन हवे, असे चुने परिवार आवर्जून सांगतो.
ज्ञानेश्वर चुने ९९२३३२५२७८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.