
डॉ. जी. एम. गादेगावकर, डॉ. एस. ए. ढेंगे
Animal Husbandry: प्रसूतींनंतर आठवडाभर जनावरास हलका व पचनास सुलभ असा आहार द्यावा. यामध्ये गहू भुसा व तृणधान्यांचा आहारात वापर करावा. प्रसूतीनंतरचे ५ ते ६ दिवस तेलबियांपासून मिळणाऱ्या पेंडींचा आहारातील वापर टाळावा, जनावरांना गरम पाणी पिण्यास द्यावे.
आहारात हिरव्या व सुक्या चाऱ्याचा अवलंब पशूंच्या दुग्धोत्पादनाप्रमाणे करावा. संक्रमण काळात गाय, म्हशी यांच्या प्रथिनांची पूर्तता करणे अत्यावश्यक व तसेच जटील काम आहे. उच्च दुग्धोत्पादन असणाऱ्या पशूंच्या खुराकात १५ ते १६ टक्के प्रथिनांचा समावेश असावा. सोयाबीन पेंड, शेंगदाणा पेंड, सरकी पेंड अशा प्रथिन स्रोतांचा खुराकात अवलंब करावा.
या काळात, अधिक दूध देणाऱ्या पशूंच्या आहारात बायपास प्रथिनांचा (कोठीपोटात विघटन न होणारी प्रथिने) समावेश करावा. बायपास प्रथिनांच्या अवलंबामुळे पशूंना दुग्धोत्पादनासाठी आवश्यक आमिनो आम्ले योग्य प्रमाणात शरीरात उपलब्ध होतात. दुग्धोत्पादन, दुधातील पोषण मूल्यांमध्ये वाढ दिसून येते.
खनिज व क्षार पोषण पूर्तता
दुधाळ पशूंच्या खुराकामध्ये कॅल्शिअमयुक्त खनिज मिश्रणाचे प्रमाण १ ते २ टक्के असणे आवश्यक आहे. दुधाळ पशूंच्या शारीरिक अवस्थेनुसार व दुग्धोत्पादनानुसार किमान ५० ग्रॅम खनिज मिश्रण प्रति दिन देणे गरजेचे ठरते.
उच्च दुग्धोत्पादन असणाऱ्या गाई, म्हशींसाठी चिलेटेड खनिज मिश्रणाचा उपयोग केला जाऊ शकतो. चिलेटेड खनिज मिश्रणाचा चांगला उपयोग होत असल्या कारणाने ती देऊन पशूंची खनिजांची गरज भागते. कॅल्शिअम स्रोत म्हणून आहारात डाय कॅल्शिअम फॉस्फेट, लाइम स्टोन पावडर यासारख्या कॅल्शिअम स्रोतांचा वापर करावा.
अति तंतुमय घटकांचा समावेश कमी करणे
पशूंमध्ये गर्भावस्थेच्या/ गाभण काळातील शेवटच्या दोन आठवड्यात आहार घेण्याचे प्रमाण ३० टक्यांपर्यंत कमी होते. प्रसूतीनंतर सुद्धा दीड ते दोन महिने आवश्यकतेपेक्षा कमी असते. त्यासाठी आहारात पाचक व चांगले पोषणमूल्य असलेला चारा देणे गरजेचे ठरते, कारण अति परिपक्व चारा जसे की, भात व गव्हाचा कोंडा/ भुसकट यांची पाचकता कमी असते, म्हणून संक्रमण काळात त्यांचा पशू आहारातील अति समावेश टाळावा.
खुराक / अंबोण प्रमाण
गाईसाठी : एक किलो खुराक शरीरपोषणासाठी आणि एक किलो अंबोण प्रति २.५ लिटर दुग्धोत्पादनासाठी देणे आवश्यक असते.
म्हशींसाठी : १.५ किलो खुराक शरीरपोषणासाठी आणि १ किलो अंबोण प्रति २ लिटर दुग्धोत्पादनासाठी द्यावा.
म्हशींच्या दुधातील फॅट/ स्निग्धांशाचे प्रमाण अधिक असल्याने प्रती किलो दुग्धोत्पादनासाठी त्यांना अधिक पोषण मूल्यांची गरज भासते.
खुराक मिश्रणामध्ये १६ टक्के प्रथिने, ६५ टक्के एकूण पचनीय पदार्थ, ०.५ ते ०.७ टक्के कॅल्शिअम व ०.३ ते ०.४ टक्के फॉस्फरसचे प्रमाण असावे. खुराका व्यतिरिक्त गाई, म्हशींना प्रती दिन ५ ते ८ किलो सुका चारा आणि २० ते २२ किलो हिरवा चारा एकाच वेळी न देता विभागून थोड्या थोड्या वेळाने कुट्टी करून द्यावा जेणे करून चाऱ्याची नासाडी न होता नुकसान टाळता येते.
जनावरांना खुराक त्यांचा दुग्धोत्पादनाप्रमाणे द्यावा. अधिक दुग्धोत्पादन असणाऱ्या गायी व म्हशींना खुराक दिवसातून चार वेळा विभागून द्यावा. कमी दुग्धोत्पादन असणाऱ्या गाई,म्हशींना खुराक दोन वेळा विभागून द्यावा.
- डॉ.जी.एम.गादेगावकर, ९९३०९०७८०६
(पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.