Ganesh and Sapna Agrowon
यशोगाथा

Inspirational Rural Story: एक स्वप्न... गणेश आणि सपनाचं!

Ganesh and Sapna Story: गणेश म्हणतो, ‘‘मला शिकायचं होतं. पण पोटाची भूक आणि संसाराची जबाबदारी मला सतावत होती. शेवटी शिकण्याऐवजी मी शाळेत शिपाई म्हणून कामाला लागलो. त्याच्या जीवनात एक डोंगरकन्या अर्धांगिनी बनून आली. तिचे नाव सपना.

मनोज कापडे

Mountain Life Story: लोणावळा पर्वतरांगेतील दऱ्याखोऱ्यांत उंबरे नावाची कुळे शेतीवर कधीकाळी उदरनिर्वाह करीत आणि स्वराज्य रक्षणात मावळे म्हणून सामील होत असत. पुढच्या प्रवासात नियतीने अनेकांना भूमिहीन केले. त्यापैकीच उधेवाडीचे राजाराम उंबरे हे एक. भूमिहीन राजारामला त्याच्या आईबाबांनी जंगलातील लाकडं, रानफळे विकून मोठा केला. स्वतःची शेती नसल्याने राजारामाला जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. पत्नी रुक्मिणीसोबत राजारामने डोंगरात कुठेतरी नाचणी, वरईची शेती करून संसाराचा गाडा हाकला.

त्याला तानाजी, गणेश, मंगल आणि उषा अशी चार अपत्य झाली. ही कथा यातील गणेश उंबरे याची आहे. डोंगरात जगण्यासाठी रोजचा संघर्ष करता करता गणेशच्या परिवारातील एक एक सदस्य काळाने ओढून नेला. आधी बहीण वारली. त्यानंतर वडील आणि पाठोपाठ गणेशचा मोठा भाऊ तानाजी आणि नंतर आजोबालादेखील नियतीने हिरावून घेतले. त्यामुळे शिकून मोठे होण्याची स्वप्नं बाळगणाऱ्या गणेशला मजूर व्हावे लागले.

त्याने उंबरे कुटुंबाच्या संसाराची धुरा स्वतःच्या खांद्यावर घेतली. गणेश म्हणतो, “मला शिकायचं होतं. पण, पोटाची भूक आणि संसाराची जबाबदारी मला सतावत होती. शेवटी शिकण्याऐवजी मी शाळेत शिपाई म्हणून कामाला लागलो. दिवसभर राबून पगार कमी मिळायचा. त्यामुळे मी नोकरी सोडली. मग गावच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला लागलो. त्यामुळे मी गावात राहू लागलो. वनसंवर्धनाची कामे करू लागलो. जंगलात पर्यटक यायचे. त्यांना सतत मदत करीत होतो. त्याचा फायदा मला संकट काळात झाला.’’

शेतकरी कन्या आली घरी

एका पाठोपाठ चार सदस्यांचा मृत्यू झालेले घर गणेश सावरत होता. अशातच पुन्हा एक संकट आले. डोंगररांगेत एकदा मोठे चक्रीवादळ आले आणि गणेशचे पाच खणाचे घर उडून गेले. दुःखाची ही मालिका पाहून गणेश हादरला. गणेश निर्व्यसनी, कष्टाळू, भागवत संप्रदायाला मानणारा आहे. अशावेळी त्याच्या जीवनात एक डोंगरकन्या अर्धांगिनी बनून आली. तिचे नाव सपना. मावळातील तुंग किल्ल्याच्या पायथ्याशी राहणारे शेतकरी किसनराव लोहकरे यांची सपना ही मुलगी.

भूमिहीन उंबरे कुटुंबाच्या घरी किसनरावांनी धाडसाने सपनाला नांदायला पाठवले. संकटाच्या हरघडीला हिच सपना गणेशच्या मागे ठामपणे उभी राहू लागली. वाडीतील गणेश व सपना ही चिमणा-चिमणीसारखी प्रेमळ जोडी अनेक पर्यटकांना मदत करायची. त्यामुळे चक्रीवादळात ही जोडी बेघर होताच अनेक पर्यटक त्यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी गणेश व सपनाचे अश्रू पुसले व नवा खोपा बांधण्यासाठी मदत केली. भक्कम भिंती; पण पत्र्याचे छत असलेल्या घरासाठी गणेशने तीन लाखाचे कर्जही काढले.

पैसे पुरेसे नसल्याने हे घर गेल्या तीन वर्षांपासून टप्प्याटप्याने उभे राहते आहे. याच घरात या जोडीला आर्यन आणि वैष्णवी, अशी दोन मुले झाली. मुलगा पाचवीत तर मुलगी चौथीमध्ये शिकते आहे. गणेश सांगतो, ‘‘आमची वाडी दारिद्र्यात खितपत पडली होती. मात्र, गो. नी. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, मुकुंद गोंधळेकर यांनी वाडीला पुढे आणले. निसर्ग पर्यटनाला त्यांनीच चालना दिली. त्यामुळेच तर आम्हा शेतकरी व शेतमजुरांना पर्यटनाचा जोडधंदा मिळाला. आता सपना ४०-५० पर्यटकांना एकाचवेळी जेऊखाऊ घालते.

तिच्या जोडीला मी आणि आईही राबतो. माझ्या लग्नापूर्वीच वडील, आजोबा, भाऊ, बहीण एकापाठोपाठ देवाघरी निघून गेले. त्यामुळे आई उदास होती. मात्र, सपना आमच्या आयुष्यात आल्यावर तिने मला आणि आईला सावरले. या दऱ्याखोऱ्यांत रोजचं जगणं खूप अवघड असतं. आम्ही काहीही झाले तरी आईला अंतर दिले नाही. उलट आईने आम्हाला सांगितले की, तुम्ही या डोंगरात तुमच्यास मुलांना अडाणी ठेवू नका. अडाणी राहिली तर ती आपल्यासारखीच मोलमजुरी करतील. आम्ही आईचे ऐकून दोन्ही मुलांना आता लोणावळ्याला चांगल्या शाळेत घातलं आहे.

आम्ही झुंज देत राहू

गणेश आणि सपना दोघेही मनमिळाऊ आहेत. सपना म्हणते, ‘‘दिवसभर हाताला काम, डोंगरात राहण्यासाठी एक चांगलं घर, त्यात रात्री सुखाची झोप, मुलाबाळांना चांगली शाळा यापलीकडे आमची काही इच्छा नाही.’’ त्यावर मी विचारले की, तरी पण प्रत्येकाच्या संसारात नवरा बायकोचं काही तरी एक स्वप्नं असते. तुमचे स्वप्नं काय आहे? त्यावर सपना म्हणते, ‘‘सारं काही आहे जवळ. तरीपण हे अर्धवट बांधकाम राहिलेलं घर पूर्ण व्हावे. मुले शिकावी, असे वाटते. त्यासाठी आम्ही झुंज देत राहू..!’’

- गणेश उंबरे ८८८८१९०८५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2025: देशात खरीप पेरणीला वेग; कापूस, सोयाबीन, तूर पिछाडीवर

ZP School Admission : झेडपी शाळेत प्रवेश घेतल्यास होणार कर माफ

Free Sand Policy : घरकुल लाभार्थ्यांना चार टक्केच वाळूचा पुरवठा

Crab Farming : बंदीस्त खेकडा पालन करण्यासाठी प्रोत्साहन

Livestock Support: पशुपालकांना आता मिळणार शेतीसारख्या सवलती; ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

SCROLL FOR NEXT