
Soil Conservation : भारतामध्ये राबविलेल्या बहुतांशी पाणलोट विकास कार्यक्रमांमध्ये क्षेत्र आणि ओघळीवरील उपचारांबाबत एकात्मिकता दिसून येत नाही. बहुतांशी वेळा क्षेत्र उपचारांचे सर्वेक्षण आणि अंदाजपत्रक (एस्टिमेट) हे किचकट स्वरूपाचे असते. या प्रक्रियेस ‘नेट प्लॅनिंग’ देखील म्हणतात. या प्रक्रियेसाठी तज्ज्ञ व्यक्तींची आवश्यकता भासते. याशिवाय गटनिहाय सर्वेक्षण करून गावातील संपूर्ण क्षेत्राचे उपचार याचे आर्थिक व तांत्रिक निकषानुसार गणित बसविणे ही प्रक्रिया क्लिष्ट व वेळखाऊ असते. या प्रक्रियेला फाटा देऊन जास्तीत जास्त कामे ओघळीवरील उपचारांबाबत आखली जातात.
याच उपचारांवर जास्तीत जास्त आर्थिक खर्चदेखील दाखवला जातो. पाणलोट क्षेत्रांच्या सर्वेक्षणानंतर सविस्तर प्रकल्प अहवाल बनतो. एखाद्या गावामध्ये क्षेत्रोपचार व ओघळीवरील उपचार किती असावेत, यामधील समतोलाबाबत कोणतीही नियमावली अस्तित्वात नाही. त्यामुळे बहुतांशी वेळा क्षेत्र उपचारासाठी उपलब्ध असणाऱ्या जमिनीचे सर्वेक्षण न करता कंपार्टमेंट बंडिंग (क, ब) अशीच कामे प्रस्तावित केल्याचे दिसून येते.
मध्यवर्ती व अंतरिम मूल्यमापनाच्या निकषांमध्ये नेमकेपणाने काय फलित साध्य झाले आहे, याचे तपशील प्रकल्प राबविणाऱ्या व मूल्यमापन करणाऱ्या यंत्रणांशिवाय अन्य कोणालाही फारसे कळत नाहीत. त्यामुळे त्याचा फायदा घेत स्वतःला सोयिस्कर अशी कामांची रचना केली जाते. त्यातून अनेक पाणलोट क्षेत्र कार्यक्रम फोल ठरत जातात.
जैविक बांध
पाणलोट क्षेत्राच्या उपचारांमध्ये जैविक बांधबंदिस्ती (Vegetative Bunding) महत्त्वाची ठरते. यासाठी जैविक बांध प्रस्तावित करण्यात येतात. सर्वसाधारणपणे जून महिन्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत नद्या अथवा नाल्यांमध्ये येणाऱ्या गाळाचे प्रमाण कमी करण्याची क्षमता या उपचारांमध्ये आहे.
भारतामध्ये घळई धूप, चादरी धूप आणि सालकाढी धूप या प्रकारांमुळे बिगरवहिती व वहितीखालील दोन्ही प्रकारच्या जमिनी बाधित आहेत. यापैकी सरासरी पाच ते दहा टक्क्यांपेक्षा जास्त उताराच्या क्षेत्रावरती घळई धुपेचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. यावरती उपाय योजना करण्याच्या दृष्टिकोनातून जैविक बांध तयार करण्यात येतात. नालाक्षेत्र क्र. एक व दोन मधील क्षेत्रांत ज्या ठिकाणी उघड तयार होते, त्या ठिकाणी गवती बांध तयार केला जातो.
सर्व साधारणपणे ३० सेंटिमीटर खोलीच्या ओघळीवर हे बांध तयार करण्यात येतात. शक्यतो मॉन्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्याला माती बांध घातले जातात. त्यावर स्थानिक गवतांच्या योग्य जातींची ठोंबे दोन ओळींमध्ये सर्वसाधारणपणे १५ ते २० सेंटीमीटर अंतर ठेवून लावली जातात. याशिवाय काही स्थानिक झुडूपवर्गीय वनस्पतींची निवड करून, त्यांचीही एक ओल गवताच्या पाठीमागे एका रांगेत लावावी.
झुडुपातील अंतर ३० सेंमी ठेवावे. पावसापासून मिळणाऱ्या पाण्याचा अपधाव बांधामध्येच साठतो. या ओलाव्यावर गवतांचे व झुडुपांचे पोषण चांगले होते. यांच्या मुळांमुळे माती घट्ट धरून ठेवली जाऊन मूलस्थानी मातीचे संरक्षण होते. वहितीखाली असणाऱ्या क्षेत्रांमध्ये देखील जैविक बांध बंदिस्ती महत्त्वाची ठरते.
दोन-तीन दशकापूर्वी केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये एखादे जनावर बांधल्यास ते संपूर्ण गोल फिरेल एवढा बांध शेतामध्ये राखला जायचा. मात्र शेतीच्या तुकडीकरणांमुळे बांध मुळातच लहान होत गेले आहेत. त्यातही जैविक बांधबंदिस्ती या उपचारांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वळण बंधारा
जानेवारी अखेरपर्यंत पाणी वाहणाऱ्या नाल्यामध्ये नाल्यामध्ये सरासरी पाण्याचा प्रवाह १५० लिटर प्रति सेकंद हून अधिक असणाऱ्या ठिकाणी सिमेंटचे पक्के बांध घालून वळण बंधारा ( Diversion Bunding) केला जातो. त्यामुळे नाला पात्राच्या उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूला उपलब्ध जमिनींना सायफन पद्धतीने पाण्याची उपलब्धता होते.
हा बंधारा बांधताना नाल्याची खोली ३ मीटरपेक्षा व रुंदी ३० मीटरपेक्षा जास्त असू नये. याशिवाय उपजाऊ जमिनी ५० ते १०० मीटर अंतरावर असाव्यात. या बंधाऱ्यातील पाणी शेतामध्ये गरजेनुसार देऊन उर्वरित अधिकचे पाणी एका पाटाद्वारे पुन्हा नैसर्गिक प्रवाहात सोडले जाते.
वळण बंधाऱ्यातील पाणी शेतकऱ्यांना २४ तास उपलब्ध होऊ शकते. या पाण्याच्या वापरासाठी कोणत्याही विजेच्या पंपाची गरज भासत नाही. भारतामध्ये हिमालय पर्वत रांगांमध्ये व पश्चिम घाटामध्ये अशा प्रकारच्या वळण बंधाऱ्यांना मोठा वाव आहे.
वासुंबे येथील वळण बंधारा
रेनावी आणि रेबनगाव या गावातील पाणलोट क्षेत्रातून वासुंबे (ता. खानापूर, जि. सांगली) येथे मोठ्या प्रमाणात अपधाव उपलब्ध होतो. त्यावर १९५५ सालच्या राष्ट्रीय विकास योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील वासुंबे या गावी वळण बंधारा बांधण्यात आला होता. हा बंधारा बऱ्याच कालखंडासाठी प्रवाहित राहत असे.
कालांतराने पाटाच्या पुरेशा डागडुजी अभावी हा बंधारा बंद पडला. सर्वसाधारणपणे उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूला सर्व साधारणपणे ९० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र भिजविण्याची क्षमता या वळण बंधाऱ्याची आहे. २०१२ मध्ये सर्वेक्षण करत असताना स्थानिक शेतकरी भीमराव पवार यांची मुलाखत घेतली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार २००९-१० पर्यंत हा बंधारा पूर्णपणे गाळाने भरून गेला होता.
२०१० मध्ये ॲड. बाबासाहेब मुळीक यांच्या प्रयत्नातून हा बंधारा पुनरुज्जीवित करण्यात आला. त्यानंतरही पुढे डागडुजी व अन्य कामांकडे दुर्लक्षच केले गेले. परिणामी सद्यःस्थितीत ९० हेक्टर क्षेत्राला पाणी पुरविण्याची क्षमता असलेला हा बंधारा केवळ १८ ते २० हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवत आहे. महाराष्ट्रातील उपलब्ध वळण बंधाऱ्यांपैकी तांत्रिकदृष्ट्या योग्य असलेला बंधारा म्हणून नक्कीच पाहता येईल. पण त्यातील गाळ काढून तो पुनरुज्जीवित करण्याची आवश्यकता आहे.
ढाळीची बांध बंदिस्ती
सरासरी चार टक्के इतक्या उताराच्या जमिनीवर ढाळीच्या बांध बंदिस्तीची कामे केली जातात. मॉन्सूनच्या काळामध्ये पडणाऱ्या पावसाचा वेग कमी करण्यासाठी ही बांध बंदिस्ती उपयोगी ठरते. तिच्यामुळे पाणी प्रवाहाचा वेग कमी राहून स्थानिक पुरांवर नियंत्रण मिळवणे शक्य होते. याशिवाय बहुतांशी जलसाठा बांधाच्या आतच केल्यामुळे जमिनीतील भूजल पातळी वाढते.
पण पाणी साठविणे हा ढाळीच्या बांध बंदिस्तीचा उद्देश नसतो. बांधाला सरासरी ०.२०% इतक्या प्रमाणात उतार दिला जातो. पर्जन्याद्वारे मिळणारे पाणी सावकाशीने बांधाचे बाहेर जाण्याची व्यवस्था केली जाते. बहुतांशी भागामध्ये मॉन्सूनपूर्व किंवा अवकाळी पाऊस येतो व कमी कालखंडामध्ये जास्त पाऊस पडतो. अशा ठिकाणी पावसामुळे जमिनी बाधित होतात व धूप वाढते. त्याच्या नियंत्रणासाठी ढाळीचे बांध उपयोगी ठरतात.
ढाळीच्या बांधबंधिस्तीतून समृद्ध झालेले गोंटामार
बेळगाव जिल्ह्यातील गोंटामार (ता. सौंदत्ती) हे गाव बेळगावपासून सर्वसाधारणपणे पस्तीस कि.मी.वर आहे. पर्जन्यछायेच्या क्षेत्रात मोडणाऱ्या गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र ५०९ हेक्टर आहे. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५१० मिलिमीटर आहे. सन २००६ ते २०११ या कालखंडामध्ये पश्चिम घाट विकास योजना (Western Ghat Development Program) या अंतर्गत या गावांमध्ये ‘माथा ते पायथा’ या तत्त्वाने जलसंधारणाच्या कामाचे नियोजन करण्यात आले.
या कार्यक्रमांतर्गत पाणलोट क्षेत्राच्या वेगवेगळ्या उपचारांवर प्रति हेक्टरी रुपये ६००० प्रमाणे सर्वसाधारणपणे ३१ लाख रुपयांचा निधी खर्च केला होता. येथे सर्वच भौगोलिक क्षेत्राचा नैसर्गिक उतार सर्वसाधारपणे ४ टक्क्यांच्या आसपास आहे. जमीनही बहुतांशी हलकी आहे. यामधील ९० टक्के निधी हा ढाळीची बांध बंदिस्ती व शेती बांध बंदिस्ती या उपक्रमांवर खर्च करण्यात आला. गावात या उपचारांमुळे एकूण २६६ टीसीएम इतका जलसाठा जमिनीमध्ये मुरला. परिसरातील विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली आहे.
या उपचारांमुळे प्रकल्पपूर्व पडिल असलेल्या १७७ हेक्टर जमिनीपैकी सर्वच जमीन वहितीखाली आल्या. प्रकल्पपूर्व जेमतेम २ हेक्टर क्षेत्र बागायती असलेल्या या गावात पाणलोट क्षेत्र विकासानंतर त्यात वाढ होऊन ९९ हेक्टर जमीन बागायती झाली आहे. आता त्यात प्रामुख्याने कपाशी, ऊस, रेशीम शेती आणि भाजीपाला अशी प्रमुख पिके घेतली जातात.
गावामध्ये ४५ विहिरी आणि ३० बोअरवेल हे सिंचनासाठी वापरल्या जात असून, त्यांची पाणी देण्याची क्षमता सरासरी २.३८% इतकी आहे. इथला भूस्तर लक्षात घेता पाणी देण्याची क्षमता लक्षणीय ठरते. संरक्षित सिंचनांमुळे गावकऱ्यांनी सरासरी बाजरी, ज्वारी व मका या पिकांचे उत्पादन पूर्व परिस्थितीपेक्षा ३ ते ३.५ क्विंटल जास्त मिळत असल्याचे नमूद केले. डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनामध्ये देखील वाढ झाल्याचे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे.
- डॉ. चंद्रशेखर पवार, ९९२३१२२७९१, (संचालक, शिवश्री पर्यावरण संस्था, पुणे.) , - डॉ. सतीश पाटील, ९४२२७०७२६१, (प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.