Agriculture Success Story : गेल्या काही वर्षांपासून केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या प्रशिक्षणावर भर दिला जात आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या पुणे येथील कृषी महाविद्यालयानेही पुढाकार घेत विद्यार्थांसाठी अळिंबी प्रशिक्षणाचा उपक्रम हाती घेतला आहे. महाविद्यालयात १९८३ मध्ये अळिंबी प्रकल्पास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पामध्ये पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थी काम करतात.
अळिंबी संशोधन केंद्राचे कार्य
निसर्गात आढळणाऱ्या जंगली अळिंबीचे सर्वेक्षण करून खाण्यायोग्य प्रजाती ओळखणे, त्यांची सूची तयार करणे तसेच खाण्यास योग्य असलेल्या जातींचा शोध घेण्यासाठी पुणे कृषी महाविद्यालयात अखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन प्रकल्प कार्यरत आहे.
अळिंबी संशोधनाचे राज्यातील हे एकमेव महत्त्वाचे केंद्र आहे. सध्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महानंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली कवक शास्त्रज्ञ डॉ. अशोक जाधव, कृषी साहाय्यक नामदेव देसाई हे या केंद्रामध्ये कार्यरत आहेत.
प्रादेशिक अनुकूलतेसाठी हिमाचल प्रदेशातील सोलनमधील चंबाघाट येथील अळिंबी संशोधन संचालनालयाकडून देण्यात येणाऱ्या जास्त उत्पादन देणाऱ्या अळिंबी जातींचे प्रामुख्याने येथे मूल्यांकन केले जाते. त्यानंतर अहवाल सादर करून शेतकरी, विद्यार्थी यांना प्रशिक्षणातून लोकांपर्यंत माहिती पोहोचवून पूरक व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
अळिंबीवरील संशोधन
कृषी महाविद्यालयातील केंद्रावर अनेक वर्षांपासून धिंगरी, दुधाळ आणि बटण अळिंबीवर संशोधन केले जाते. यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. केंद्रातील स्वतंत्र इमारतीमध्ये अळिंबी संशोधनासाठी प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे.
व्यावसायिक तत्त्वावर अळिंबी लागवडीसाठी लागणारे साहित्य, यंत्रणा तसेच पायाभूत सुविधा याठिकाणी आहेत. याचबरोबरीने प्रशिक्षण हॉल, वातावरण नियंत्रण सुविधा येथे उपलब्ध आहे. येथील प्रयोगशाळेत विद्यार्थी तसेच नव उद्योजकांना अळिंबी उत्पादनाबाबत प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षणाची सोय
गेल्या काही वर्षात शहरी तसेच ग्रामीण बाजारपेठेत अळिंबीची मागणी वाढत आहेत. हे लक्षात घेऊन या केंद्रामध्ये तीन प्रकारे अळिंबी उत्पादनाबाबत प्रशिक्षण घेतले जाते. मागील दहा वर्षांत या केंद्राच्या माध्यमातून ३५० प्रशिक्षणांच्या माध्यमातून चार हजार ४४२ लाभार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.
यामध्ये अळिंबी लागवड तंत्रज्ञान ते विक्रीपर्यंतचे मार्गदर्शन केले जाते. या केंद्रामध्ये दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी धिंगरी आणि दुधी अळिंबी लागवड तंत्रज्ञानाबाबत एक दिवसीय प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणासाठी प्रति व्यक्तीस एक हजार रुपये शुल्क आहे.
खात्रीशीर पुरवठा
राज्यातील शेतकऱ्यांचे खात्रीशीर अळिंबी उत्पादन घेता यावे, यासाठी लागणाऱ्या बियाणाचा (स्पॉन) पुरवठा या केंद्राकडून केला जातो. केंद्रातून ५०० ग्रॅमच्या प्लॅस्टिक पिशवीतून प्रति किलो ९० रुपये दराने बियाणाचा पुरवठा केला जातो. तसेच मागणीनुसार पार्सल पाठविले जाते. बियाणे जास्त प्रमाणात हवे असल्यास १० ते १५ दिवस अगोदर ५० टक्के आगाऊ रक्कम भरून मागणी नोंदवावी लागते.
केंद्रामार्फत दरवर्षी तीन ते पाच टनांपर्यंत बियाणे विक्री होते. यातून दरवर्षी चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. याशिवाय गोवा, गुजरात, कर्नाटक, ओडिशा राज्यातील शेतकरी तसेच उद्योजकांना अळिंबी बियाणे पाठविले जाते. अळिंबी उत्पादनासाठी या केंद्राने विविध शिफारशी तसेच तंत्रज्ञान विकसित केले आहे.
केंद्रातर्फे राज्यात अळिंबी लागवड वाढीसाठी प्रयत्न केले जातात. राज्यात सध्या ४०६ उद्योजक धिंगरी अळिंबीचे उत्पादन घेतात. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी ४२५ टनांहून अधिक धिंगरी अळिंबी उत्पादन होते. राज्यात सध्या २६ अळिंबी बियाणे उत्पादन केंद्र कार्यरत आहेत. यातून वार्षिक १,९५७ टन अळिंबी बियाणाचे उत्पादन होते, अशी माहिती डॉ.अशोक जाधव यांनी दिली.
केंद्राचा गौरव
२०२० मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा यांच्या अध्यक्षतेखाली अळिंबी संशोधन प्रकल्पाच्या वार्षिक कार्यशाळेत उत्कृष्ट योगदानाबद्दल पुणे कृषी महाविद्यालयातील अखिल भारतीय समन्वित अळिंबी संशोधन प्रकल्पास ‘सर्टिफिकेट ऑफ एक्सलंन्स' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
अळिंबी उद्योजक : राज्यात धिंगरी अळिंबी लागवड लोकप्रिय करण्यासाठी या केंद्राने मोठ्या प्रमाणात विस्तार कार्य केले आहे. या केंद्रामध्ये दरवर्षी राज्य तसेच परराज्यातील विद्यार्थी, शेतकरी आणि नव उद्योजक भेटी देतात. दरवर्षी सुमारे १५ ते २० हजार व्यक्ती या केंद्रास भेट देतात. केंद्राच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये अळिंबी उत्पादनाबाबत जागरूकता वाढत आहे.
या केंद्रामार्फत तांत्रिक मार्गदर्शन घेऊन धिंगरी आणि बटण अळिंबी प्रकल्प सुरू झाले आहेत. राज्यात ४४५ हून अधिक उद्योजक धिंगरी अळिंबीची लागवड करत आहेत. तसेच बियाणे उत्पादन, विपणन आणि प्रक्रियेमध्ये काहीजण कार्यरत आहेत. प्रामुख्याने बटण अळिंबीमध्ये ३७, धिंगरी अळिंबीमध्ये ४०६ आणि दुधी अळिंबी उत्पादनात दोन असे एकूण ४४५ हून अधिक उद्योजक या केंद्राच्या माध्यमातून तयार झाले आहेत.
डॉ.अशोक जाधव ९४२३००७९३१
नामदेव देसाई ९८२२३११६८०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.