Mushroom Production : आरोग्यदायी धिंगरी अळिंबीचे उत्पादन तंत्र

Mushroom Farming : अळिंबी हे अतिशय नाजूक, नाशिवंत व अल्पमुदतीचे पीक आहे. अळिंबी उत्पादनासाठी वापरण्यात येणाऱ्या काड व इतर घटकांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.
Mushroom Production
Mushroom ProductionAgrowon
Published on
Updated on

कानिफनाथ बुरगुटे, श्रीधर बन्ने, डॉ. संदीप बडगुजर

Mushroom Production Technology : अळिंबी अर्थात मशरूम ही बुरशी गटात मोडणारी वनस्पती आहे. अळिंबीचे उत्पादन कमी जागेत आणि उपलब्ध साधनसामग्रीच्या माध्यमातून करता येते. देशासह जगभरात दिवसेंदिवस अळिंबीची मागणी वाढते आहे.

त्यामुळे व्यापारी तत्त्वावर अळिंबी उत्पादन घेणे फायदेशीर ठरते. अळिंबीच्या विविध जाती आहेत. त्यापैकी धिंगरी अळिंबी ही कमी खर्चात चांगला आर्थिक फायदा मिळवून देते. धिंगरी अळिंबीमध्ये अनेक पौष्टिक आणि औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे धिंगरी अळिंबीची लागवड फायदेशीर ठरते.

आरोग्यदायी फायदे

रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर.

रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

हृदयाचे आरोग्य राखते.

कॉलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते.

वजन कमी करण्यास फायदेशीर.

मधुमेहावर गुणकारी.

ॲन्टी ऑक्सिडंट गुणधर्म.

हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त.

धिंगरी अळिंबीच्या प्रजाती

फ्ल्यूरोटस साजोरकाजू (Pleurotus Sajorkaju)

प्ल्यूरोटस फ्लावेलाट्स (Pleurotus flabellatus)

फ्ल्यूरोटस ओस्ट्रीटस (Pleurotus Ostreatus)

फ्ल्यूरोटस फ्लोरिडा (Pleurotus Florida)

Mushroom Production
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठ

घ्यावयाची काळजी

अळिंबी प्लॅस्टिक पिशवी काढलेल्या बेड मांडणीवर दोरीच्या शिंकाळ्यावर योग्य अंतरावर ठेवावेत. बेडवर दिवसांतून किमान २ ते ३ वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी.

खोलीमध्ये जमिनीवर व भिंतीवर पाणी फवारून तापमान २५ ते ३५ अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ८५ ते ९० टक्के पर्यंत नियंत्रित करावी.

साधारण ३ ते ४ दिवसांत बेडच्या भोवती अंकुर (पीनहेड) दिसू लागतात. त्यानंतर पुढील ३ ते ४ दिवसांत त्यांची झपाट्याने वाढ होऊन काढणीस तयार होतात.

कीड व रोग व्यवस्थापन

अळिंबी हे अतिशय नाजूक, नाशवंत व अल्प मुदतीचे पीक आहे. उगवणीसाठी वापरण्यात येणाऱ्या काड व इतर घटकांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. जेणेकरून कीड-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यास मदत होईल. रोगग्रस्त बेड नष्ट करावेत. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निर्जंतुकीकरण करताना बुरशीनाशकांचा वापर करावा.

काढणी

पूर्ण वाढ झालेली धिंगरी अळिंबी ब्लेडच्या साह्याने किंवा चाकूने हळुवारपणे कापून घ्यावी. शक्यतो बेडवरील सर्व अळिंबी एकाचवेळी कापू नयेत. कापणी करताना अळिंबी बेडवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. कारण अळिंबीचे पांढरे तंतू यामुळे मरण्याची शक्यता असते. पूर्ण वाढ झालेली अळिंबी काढल्यानंतर बेडवर २ ते ३ वेळा पाणी फवारून घ्यावे.

दुसरा व तिसरा बहर येणे

पहिल्या बहाराची कापणी केल्यानंतर त्याच बेडपासून ८ ते १० दिवसांनी दुसरा आणि पुन्हा ८ ते १० दिवसांनी तिसरा बहार घेता येतो. कापणी झाल्यावर बेड १२ तास तसाच ठेवावा. त्यास पाणी देऊ नये. त्यानंतर साधारण बारा तासानी बेडवरील पांढरी वाढ पिवळसर झालेली दिसेल.

ही वाढ चाकूने किंवा स्वच्छ ब्लेडने हळूहळू खरडून टाकावी. अशा बेडला दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी द्यावे. आठ ते दहा दिवसानंतर त्याच बेडला बहार आलेला दिसून येतो.

उत्पादन

एक ते दोन किलो वाळलेल्या काडाच्या एका बेडपासून साधारण ४५ दिवसांत ३ ते ४ किलो अळिंबी उत्पादन मिळते. दहा किलो ओल्या अळिंबीपासून १ किलो वाळलेली अळिंबी उत्पादन मिळते.

Mushroom Production
मार्केटिंग, ब्रॅंडिंगद्वारे अळिंबी व्यवसायात यश

जागेची निवड

अळिंबीच्या लागवडीसाठी ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण होईल अशा निवाऱ्याची गरज असते. त्यासाठी कच्चे किंवा पक्क्या बांधकामाची खोली किंवा झोपडी असावी.

निवडलेल्या जागेमध्ये तीव्र सूर्यप्रकाश येऊ नये. तसेच हवा खेळती राहील, याची दक्षता घ्यावी.

माध्यम

अळिंबी लागवडीसाठी सेंद्रिय आणि पिष्टमय पदार्थ अधिक असलेल्या घटकांची आवश्यकता असते. त्यात शेतातील पिकांचे अवशेष, भातपेंढा, गव्हाचे काड, ज्वारी, बाजरी, मका, यांची ताटे व पाने, भुईमुगाच्या शेंगाची टरफले, उसाचे पाचट, वाळलेले गवत व पालापाचोळा इत्यादी घटकांचा वापर करता येतो.

वातावरण

अळिंबीच्या लागवडीसाठी नैसर्गिक तापमान २५ ते ३० अंश सेल्सिअस व हवेतील आर्द्रता ८५ ते ९० टक्के असणे आवश्यक आहे. यासाठी लागवडीसाठी निवडलेल्या जागेचे तापमान व आर्द्रता नियंत्रित ठेवणे आवश्यक असते. त्यासाठी जमिनीवर तसेच शेडच्या चारी बाजूंनी गोणपाटाचे आवरण लावून त्यावर सतत पाणी फवारण्याची व्यवस्था करावी. साधारणपणे २५ अंश सेल्सिअस तापमानात अळिंबीची वाढ उत्तम होते.

काड निर्जंतुकीकरण

काडाचे २ ते ३ सेंमी लांबीचे बारीक तुकडे पोत्यामध्ये भरून थंड पाण्यात ८ ते १० तास भिजत घालावेत. त्यानंतर काडाचे पोते थंड पाण्यातून काढून त्यातील उर्वरित पाण्याचा निचरा होण्यासाठी उंच जागी ठेवावे.

अ) गरम पाण्याने निर्जंतुकीकरण ः उकळत्या पाण्यात भिजविलेल्या काडाचे पोते ८० अंश सेल्सिअस तापमानाच्या गरम पाण्यात २० ते २५ मिनिटे बुडवून ठेवावेत.

ब) रासायनिक निर्जंतुकीकरण ः रासायनिक निर्जंतुकीकरण करण्यासाठी कार्बेन्डाझिम १५ ग्रॅम अधिक फॉर्मेलीन १०० मिलि अधिक मॅलेथिऑन ५० मिलि हे १०० लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात काडाचे पोते १६ ते १८ तास भिजत ठेवावे. त्यानंतर काडाचे पोते बाहेर काढून त्यातील अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यासाठी उंच जागी ठेवावे. तसेच थंड होण्यासाठी सावलीत ठेवावे.

पिशव्या भरणे

काड भरण्यासाठी ३५ बाय ५५ सेंमी आकाराच्या ५ टक्के फॉर्मेलीनमध्ये निर्जंतुक केलेल्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करावा. यामध्ये काड थर पद्धतीने भरावेत. हे काम २ टक्के टक्के फॉर्मेलीनचे द्रावण फवारून निर्जंतुक केलेल्या बंदिस्त जागेत करावे.

पिशवी भरताना प्रथम ८ ते ९ सेंमी जाडीचा काडाचा थर देऊन त्यावर अळिंबीचे बियाणे (स्पॉन) पसरावे. असे काड व स्पॉन यांचे ४ ते ५ थर भरावेत. भरताना तळहाताने काड थोडेसे दाबावेत.

पिशवी भरल्यानंतर दोऱ्याने पिशवीचे तोंड घट्ट बांधावे.

पिशवीच्या पृष्ठभागावर सुई किंवा टाचणीच्या साह्याने छिद्रे पाडावीत.

अशाप्रकारे भरलेल्या पिशव्या निवाऱ्याच्या जागेत केलेल्या मांडणीवर व्यवस्थित ठेवाव्यात. त्यासाठी २५ ते २८ अंश सेल्सिअस तापमान अनुकूल असते.

बुरशीची पांढऱ्या रंगाची वाढ सर्व पृष्ठभागावर दिसून आल्यावर प्लॅस्टिकची पिशवी काढून टाकावी. बुरशीची वाढ होण्यास साधारण १० ते १५ दिवस लागतात.

- डॉ. संदीप बडगुजर, (विभागप्रमुख) ९५५२६२९८४७

- कानिफनाथ बुरगुटे, (आचार्य पदवी विद्यार्थी) ८३९०६२२७९९

(वनस्पती रोगशास्त्र विभाग, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com