Mushroom Business : अळिंबीची उत्पादन ते पुरवठा साखळी

Mushroom Production : कोल्हापूर जिल्‍ह्यातील चंदगड या दुर्गम तालुक्यातील म्हाळुंगे खालसा येथील रामचंद्र गावडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व संघर्षातून धिंगरी अळिंबी व्यवसायात नाव तयार केले आहे.
Ramchandra Gawde and Mushroom Production
Ramchandra Gawde and Mushroom ProductionAgrowon

Mushroom Farming and Supply : कोल्हापूर जिल्‍ह्यातील चंदगड या दुर्गम तालुक्यातील म्हाळुंगे खालसा येथील रामचंद्र गावडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती व संघर्षातून धिंगरी अळिंबी व्यवसायात नाव तयार केले आहे. अळिंबीला ‘मार्केट’ मिळविण्यासाठी त्यांनी विशेष मेहनत घेतली. आज उत्पादन ते पुरवठा अशी साखळी तयार करून त्यांनी व्यवसायात नफा व स्थैर्य आणले आहे.

कोल्हापूर जिल्‍ह्यातील चंदगड या दुर्गम तालुक्यातील का आहे. दळणवळणाची साधने कमी असल्‍याने अनेक गावांचा विकास फारसा झालेला नाही. अशाच गावांचे प्रतिनिधित्व करणारे म्हाळुंगे खालसा हे चंदगड पासून ४५ किलोमीटरवर असलेले गाव आहे. बस किंवा खासगी वाहतूकही फारशी नसल्‍याने येथील ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागते. याच गावातील रामचंद्र खाचू गावडे पूर्वी वर्कशॉपमध्ये सुतारकाम व पेंटिंग व्यवसाय करायचे. मात्र आरोग्याच्या समस्या उद्‍भवल्या. हृदयाचे ऑपरेशन झाले. त्यानंतर हा व्यवसाय थांबवावा लागला.

Ramchandra Gawde and Mushroom Production
Mushroom Production : आळिंबी उत्पादनाद्वारे शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावे

अळिंबी व्यवसायाचा पर्याय

गावडे यांची साडेतीन एकर शेती आहे. ती बंधू पाहतात. पण पहिला व्यवसाय बंद केल्यानंतर दुसरा पर्याय शोधणे गरजेचे होते. मित्राने त्यांना अळिंबी निर्मितीचा व्‍यवसाय सुचवला. सन २०१७ मध्ये उपलब्ध जागेत अळिंबी निर्मिती सुरू झाली. कोरोना काळात त्यात खंड पडला. पण हिंमत न हारता गावडे यांनी २०२१ मध्ये आपल्या शेताच्या चार गुंठ्यांत शेड बांधले. शेड, रॅक, ह्युमिडीफायर व अन्य उपकरणे असे मिळून वीस लाख रुपये भांडवल गुंतवले.बॅक ऑफ महाराष्ट्राचे सुमारे पावणेतेरा लाखांचे कर्ज मिळाले. त्यातून व्यवसायाने गती घेतली.

...असा आहे गावडे यांचा अळिंबी व्यवसाय

१२०० बेडसमध्ये धिंगरी अळिंबीचे उत्पादन.

बेडनिर्मितीसाठी सोयाबीन, कपाशीचे काड किंवा भाताचे पिंजर यांचा वापर. चंदगड भागात पाऊस भरपूर असतो. अशावेळी वर्षभराचे तापमान व आर्द्रता पाहून कोणते काड वापरायचे हे ठरवले जाते. वर्षाला पाच ट्रॅक्टर सोयाबीन काड, तीन ट्रॅक्टर भाताचे पिंजर असा कच्चा माल लागतो.

बियाणे (स्पॉन) रुजवून व बेड तयार झाल्यानंतर सुमारे अठरा दिवस ‘इनक्युबेशन रूम’मध्ये ते ठेवले जातात.

त्यानंतर ‘ग्रोइंग रूम’मध्ये आणले जातात. येथे ‘फॉगर्स’, ह्युमिडीफायर आदी यंत्रणा आहेत. येथे पाच-सहा दिवसांनंतर अळिंबीचे ‘पिन हेड’ निघण्यास सुरुवात होते. त्यानंतर दोन- चार दिवसांत उत्पादन मिळू लागते.

Ramchandra Gawde and Mushroom Production
Mushroom Production : आळिंबी उत्पादनाद्वारे शेतकऱ्यांनी उत्पन्न वाढवावे

काढणी, उत्पादन, पॅकिंग

प्रति बेड प्रति १० दिवसांनी एक याप्रमाणे एका महिन्‍यात तीन काढण्या होतात. त्यातून एक ते सव्वा किलो अळिंबी मिळते.

एक दिवसाआड बेड तयार केले जातात. दुपारी बारा ते दोन वाजेपर्यंत तयार अळिंबी काढून पॅकिंग होते.

घरातील सर्वांचे श्रम

व्यवसायात रामचंद्र यांना पत्नी रेश्मा व मुलगा चाळोबा यांची मोठी मदत होते. तिघांच्या समन्वयातूनच व्यवसाय पुढे जाऊ शकला. गावातील एक व्यक्तीलाही रोजगार दिला आहे.

मेहनतीतून मिळवली बाजारपेठ

चंदगडसारख्या भागात अळिंबीला बाजारपेठ मिळवणे मोठे आव्हान होते. या भागात अळिंबी कमी ग्राहकांनाच माहिती होती. त्यातही त्याच्या गुणवत्तेविषयी अनेक शंका होत्या. मात्र अळिंबीचे प्रमोशन करण्यासाठी गावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. आवडल्यास विकत घ्या असे सांगत शेकडो किलो अळिंबी गावपरिसरात तसेच ओळखीच्या व्यक्तींना मोफत दिली. काही वेळा रस्त्याकडेला उभारून विक्री केली. हळूहळू मेहनतीचा परिणाम दिसू लागला. ग्राहकांची संख्या वाढू लागली.

गोव्‍याची ‘फिक्स’ बाजारपेठ

दरम्यान, गोव्यामध्ये अळिंबीला रोजची मागणी असून दरही चांगला मिळत असल्याचे कळले. तेथे अनेक विक्रेत्‍यांकडे जाऊन अळिंबी घेण्याची विनंती केली. विक्रीनंतर शिल्लक अळिंबीही घेतो असे आश्‍वासन दिले. आज गावडे प्रसिद्ध गोवा बागायतदार संघाला दररोज अळिंबी पुरवतात. दोन- तीन वर्षांपासून एकही दिवस खंड न पडता वीस ते २५ किलो व काही वेळा चाळीस किलोपर्यंत अळिंबीच पुरवठा होतो. अशा रीतीने उत्पादन ते पुरवठा अशी सक्षम साखळी त्यांनी तयार केली आहे. गोव्यात दोन डीलर देखील माल घेतात. असा सातत्याने पुरवठा करणारे या भागातील गावडे एकमेव अळिंबी उत्पादक असावेत.

...असा पोहोच होतो माल

-१०० व २०० ग्रॅम पनेटमध्ये पॅक केलेली अळिंबी दहा किलोमीटरवरील तुडये गावातील भाजीपाला वाहतूक वाहनाद्वारे गोव्याला जाते. या अळिंबीस २०० रुपये प्रति किलो हा फिक्स दर दोन वर्षांपासून मिळतो. विशेष म्हणजे गावडे यांनीच हा दर ठरविला आहे. प्रति दिन वीस किलो विक्री गृहीत धरल्‍यास दररोज चार हजारांहून अधिक रुपयांची विक्री होते. भाताच पिंजर, सोयाबीनचे काड स्वस्त दरात उपलब्ध होत असल्याने उत्पादन खर्च कमी झाला आहे. महिन्‍याला सुमारे ६० टक्क्यांपर्यंत नफा मिळतो.

बीजनिर्मितीही शिकले

अळिंबी निर्मितीसाठी पुणे, बंगळूरहून स्पॉन (बीज) आणावे लागे. बंगळूरहून ते रात्री उशिरा मिळे. अशावेळी स्वतःच स्पॉन तयार करायचे गावडे यांनी ठरवले. पुणे येथील कृषी महाविद्यालयातील तज्ज्ञ नामदेव देसाई यांच्याकडून तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतले. निर्मितीसाठी आवश्‍यक कुकर व इनॉक्युलेशन चेंबर तयार करून घेतले. आज स्पॉननिर्मितीत गावडे स्वयंपूर्ण झाले आहेत. याचे त्यांना समाधान आहे. चिकाटी, इच्छाशक्ती व अभ्यासाच्या जोरावर आज या व्यवसायात त्यांनी चांगली मजल मारली आहेत. कृषी विभागाचे अनुदान रूपात सहकार्य मिळाले आहे. ते ॲग्रोवनचे नियमित वाचकही आहेत.

रामचंद्र गावडे ७५८८२४८६०७

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com