Farmer Success Story : खानापूर तालुका म्हटलं, की समोर येतो तो दुष्काळ. याच तालुक्यातील भूड हे गाव देखील कायम दुष्काळाच्या सावटाखाली असते. प्रतिकूल स्थितीतही येथील शेतकरी जिद्दीने शेती करत असल्याचे दिसून येते.
याच गावातील राहुल कदम हे युवा शेतकरी. राहुल यांचे वडील मुंबईत एका कंपनीत नोकरी करत होते. मुंबईत १९८३ पर्यंत नोकरी केल्यानंतर ते गावी परतले. गावच्या शेतीत १९८४ मध्ये द्राक्ष लागवड करून शेतीत रमले.
शेतीला शाश्वत पाण्याची उपलब्धता होण्यासाठी विहीर घेतली. मात्र जेमतेम पाणी लागले. त्याच पाण्यावर द्राक्ष लागवड फुलली.
राहुल यांनी बीएपर्यंतचे शिक्षण घेतल्यानंतर खाद्य प्रक्रिया उद्योगातील तंत्रज्ञान आणि आयात-निर्यात या विषयाचे शिक्षण घेतले. २०१५ मध्येच राहुल यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे अनपेक्षितपणे शेतीची संपूर्ण जबाबदारी राहुल यांच्यावर आली.
शेतीविषयी झाले सकारात्मक ः
एकपीक पद्धती, सातत्याने होणारे पीक नुकसान आणि सिंचनाच्या अपुऱ्या सुविधा यामुळे राहुल यांच्या मनात शेतीविषयी कायमच नकारात्मक भावना होती. वडिलांच्या निधनानंतर शेतीची जबाबदारी राहुल यांच्यावर आली खरी. पण त्यांच्या मनात सुरुवातीपासूनच शेतीबाबत नकारात्मक भूमिका होती.
त्यामुळे पीक पद्धतीत फारसा बदल न करता, आहे त्यातच सातत्य ठेवण्यावर राहुल कदम ठाम होते. दरम्यानच्या काळात राहुल यांचे शेतकरी मित्र संजय काटकर यांनी ‘आम्ही सांगतो तशी शेती कर. त्यातून फायदा झाला तर तुझा आणि तोटा झाला तर तेवढी रक्कम मी तुला देतो’ असे सांगितले.
त्यांच्या सल्ल्लाने, २०१५ मध्ये पहिल्यांदाच टोमॅटोची २ एकरांत लागवड केली. पहिल्याच प्रयत्नात अपेक्षित उत्पादन मिळाले. त्यातूनच शेती आणि मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी मनात असलेले गैरसमज दूर झाले. आणि शेतीची गोडी वाढली.
हळूहळू पीकपद्धतींचा अभ्यास सुरू केला. दरम्यान, टेंभू योजनेचे पाणी दुष्काळी भागात वाहू लागले. भूड येथील पाचव्या टप्प्यातून शेतीला पाणी मिळाले. शाश्वत पाणी उपलब्ध झाल्याने शेती वाढविण्याचा विचार केला.
२०१७ मध्ये राहुल यांचे चुलत्यांची २१ एकर शेती भाडेतत्त्वार कसण्यासाठी घेतली. अशा सध्या ३० एकरांतून उत्पादन मिळण्यास सुरुवात झाली. त्यात भाजीपाला लागवड सुरू केली. सिंचनासाठी दोन विहिरी, बंधारा आणि पाच कूपनलिका, शेततळे अशी शाश्वत पाण्याची सोय केली आहे.
अभ्यास महत्त्वाचा ः
अलीकडच्या काळात भाजीपाल्याचे विविध नवे वाण बाजारात आहेत. त्याची माहिती घरात बसून मिळत नाही. त्यामुळे संघाच्या माध्यमातून कृषी प्रदर्शन, प्रगतिशील शेतकरी, कृषी विद्यापीठे अशा विविध ठिकाणी भेटी दिल्या जातात. त्यातून पिकांचे नवीन वाण तसेच उत्पादन तंत्रज्ञानाविषयी अद्ययावत माहिती मिळते.
भाजीपाला विक्रीसाठी बाजारपेठांचा अभ्यास केला जातो. विविध ठिकाणची आवक, दरांतील चढ-उतार याबाबत सातत्याने माहिती घेतली जाते. बाजारपेठेत माल विक्रीसाठी आणल्यानंतर मालाबरोबर शेतकऱ्याचे नाव जोडलेले असते. हे नाव व्यापाऱ्यांमध्ये प्रसिद्ध होण्यासाठी शेतीमालाचा दर्जा उत्तम असावा लागतो. त्यासाठी योग्य पद्धतीने व्यवस्थापन करत सातत्य राखले जाते.
संघाद्वारे भाजीपाला विक्री ः
भाजीपाला पिकाचा अभ्यास सुरू केल्यानंतर त्यातील बारकावे लक्षात आले. त्यातून उत्पादनाशिवाय विक्री व्यवस्था भक्कम असणे महत्त्वाचे आहे, हे लक्षात आले. गेल्या तीस वर्षांपासून शेतकऱ्यांना एकत्र घेऊन भाजीपाला लागवड ते विक्रीपर्यंत ‘श्री. रेवणसिद्ध भाजीपाला संघ’ मदत करत असल्याची माहिती मिळाली. पुढे संघाच्या माध्यमातून भाजीपाला विक्रीसाठी सुरुवात केली. चांगले दर मिळाल्याने फायदा झाला असल्याचे राहुल सांगतात.
व्यवस्थापनातील बाबी ः
- एकूण शेती ः १० एकर, करार पद्धतीने ः २१ एकर.
- ढोबळी मिरची, कारले आणि टोमॅटोची दोन हंगामात लागवड.
- शेतीत शेणखत, पोल्ट्री खताचा वापर.
- बेड, ड्रीप आणि मल्चिंगचा वापर.
- प्रत्येक प्लॉटमध्ये १५ दिवसांपासून एक महिन्याचे अंतर.
- फेरपालटीवर भर.
- योग्य व्यवस्थापनातून अधिक उत्पादन.
- ए ग्रेड दर्जाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न.
- मुंबईसह सांगली, कोल्हापूर येथील मार्केटमध्ये विक्री.
लागवड नियोजन ः
- कारले पिकाचे ८ फूट तर ढोबळी, मिरची आणि टोमॅटोची साडेचार फुटांच्या बेडवर लागवड.
- कारले लागवडीत दोन रोपांत ३ ते ४ फूट अंतर.
- टोमॅटो, ढोबळी मिरची पिकाची झिगझॅक पद्धतीने लागवड.
- टोमॅटो लागवड ः एकरी ६ हजार रोपे.
- कारले लागवड ः एकरी ४ हजार रोपे.
- ढोबळी मिरची लागवड ः एकरी १२ हजार रोपे.
भाजीपाला लागवड दृष्टिक्षेपात ः
पीक... हंगाम...क्षेत्र...एकरी उत्पादकता...मिळणारा दर (प्रति किलो)
ढोबळी मिरची...उन्हाळी, हिवाळी...५ एकर...४० ते ५० टन...३० रुपये
कारले.... उन्हाळी, हिवाळी...७ एकर...२० ते २५ टन...३० रुपये
टोमॅटो...उन्हाळी, हिवाळी...८ एकर...४० ते ५० टन...१५ ते २० रुपये
...
शेती उत्पन्नाची विभागणी ः
शेतीसाठी नवीन तंत्रज्ञान ः १५ टक्के
मजुरी, खते आणि लागवड व्यवस्थापन ः ४० टक्के
घरखर्च, आरोग्य ः ३० टक्के
मुलांचे शिक्षण ः १० टक्के
परिवार विम्यासाठी ः ५ टक्के
- राहुल पांडुरंग कदम, ८२७५०५७६१८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.