Success Story : चिखलदऱ्यातील प्रकाश जांभेकरांनी बहुपर्यायी उत्पन्नातून उंचावले अर्थकारण

Mango, Coffee Production : अल्पभूधारक असलेल्या प्रकाश जांभेकर यांनी पारंपरिक पिकांऐवजी आंबा आणि कॉफी बाग केली आहे. चिखलदरा परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘होम स्टे’ची सुविधा वन विभागाच्या सहकार्याने उभी केली आहे.
Success Story
Success StoryAgrowon

Indian Agriculture Update : मेळघाट हा वन्यप्राणी आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर. त्यामुळेच या भागात पर्यटकांची देखील रेलचेल राहते. याच परिसरातील चिखलदरा पासून ६ कि.मी. अंतरावर खटकाली शिवारामध्ये प्रकाश जांभेकर यांची दोन एकर शेती आहे.

पूर्ती ते त्यात ज्वारी, जगणी (तेलबिया), कुटकी अशी पारंपरिक पिके घेत. तसेच जांभळाची २० झाडे होती. मात्र या पारंपरिक पिकांपासून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते.

कसेबसे जगण्याइतके उत्पन्न मिळत असल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याची विवंचना त्यांना भेडसावत होती. त्यामुळे या भागातील चांगल्या पर्जन्यमानाचा विचार करता त्‍यांनी फळबाग करण्याचा निर्णय घेतला.

आंब्याची लागवड

त्यांच्या गावापासून एक कि.मी. अंतरावरच आमझरी हे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध असे गाव आहे. त्यामुळे आंब्याची बाग करण्याकडे त्यांचा कल होता. परिसरातील शेतकऱ्यांशी चर्चा करून स्वतःला कोणते आंबे आवडतात, याचा विचार करून त्यांनी दशेहरी, केसर, लंगडा, हापूस अशा काही वाणांची निवड केली.

परतवाडा येथील खासगी रोपवाटिकेतून १६० आंबा रोपांची खरेदी केली. २००९ मध्ये या रोपांची लागवड ५ मीटर बाय ५ मीटर अंतरावर केली. पाच वर्षांनंतर त्याला प्रथम फळधारणा झाली. सुरुवातीला फळधारणा कमी होती. मात्र हळूहळू ती वाढत आहे. सध्या एका झाडापासून सरासरी २५ ते ३० किलोपर्यंत फळे मिळतात.

मोहोराच्या काळात वातावरण बदल झाल्यास उत्पादन कमी मिळते. बागेमध्ये ते एका वर्षाआड शेणखत देतात. बागेतील आंबा झाडांच्या व्यवस्थापनासाठी सुमारे १० हजार रुपये प्रति वर्ष इतका खर्च होतो.

Success Story
Mango Crop Damage : सुरगाणा तालुक्यात पावसाने आंब्याचे नुकसान वाढले

कॉफीची लागवड

आंब्याची मुळे शेतात सर्वदूर पसरतात. त्यामुळे सोयाबीन, कपाशी अशा हंगामी पिकांची लागवड केल्यास आंतरमशागत करणे शक्‍य होणार नाही. म्हणून प्रकाश हे आंतरपिकासाठी पर्यायी पिकाच्या शोधात होते.

वनविभागाच्या काही अधिकारी बंगल्याच्या परिसरात तसेच चिखलदरा भागातील ख्रिश्‍चन मिशनरीच्या बंगल्यामध्ये कॉफीची झाडे आहेत. उंच, डौलदार झाडांच्या सावलीतही बहरलेली कॉफीची झाडे प्रकाश यांच्या कायम पाहण्यात येत. त्यामुळे वनविभागाचे अधिकारी व संबंधित फादर यांच्याकडून कॉफीच्या झाडांविषयी अधिक माहिती घेतली.

फादरकडूनच ४०० रुपये प्रति किलो दराने तीन किलो बियाणे खरेदी केले. त्यापासून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये रोपे तयार केली. सुमारे एक वर्षाने या रोपांची लागवड आंबा बागेतच दीड मीटर बाय दीड मीटर इतक्या अंतरावर केली.

या झाडांची वाढ होऊन त्याचे बियाणे जमिनीवर पडल्यानेही काही रोपे वाढतात. अशा रोपांचीही पुनर्लागवड त्यांनी पावसाळ्यात केली. त्यामुळे या दोन्ही पद्धतीने लावलेली २५०० कॉफी झाडे त्यांच्या शेतात तयार झाली होती. मात्र ‘होम स्टे’ उभारण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यातील शंभर झाडे काढून टाकली आहेत. सध्या त्यांच्याकडे २४०० झाडे चांगल्या प्रकारे वाढत आहेत.

या झाडांना वर्षाआड एकदा शेणखत दिले जाते. जून महिन्यात फुलधारणा होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने फळे वाढतात. जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीत ती परिपक्‍व होऊन काढणीस येतात.

कॉफीवर कीडरोगाचा प्रादुर्भाव फारसा होत नाही. त्यामुळे अद्याप त्यावर कीडनाशकांच्या फवारणीची गरज पडली नसल्याचे त्यांनी सांगितले. बागेच्या व्यवस्थापनासाठी १५ हजार रुपये खर्च आला.

‘होम स्टे’ची संकल्पना

स्थानिकांना उत्पन्न मिळण्यासोबत पर्यटकांच्या सोयीसाठी वन विभागाच्या वतीने होम स्टेची संकल्पना राबविण्यात येत आहे. या योजनेसाठी दहा आदिवासी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली होती. त्यात प्रकाश जांभेकर यांचा समावेश होता. त्याला वन विभागाच्या वतीने २ लाख रुपये इतके अनुदान मिळाले आहे.

या अनुदानातून त्यांनी २०२१ पर्यटकांसाठी एक खोली बांधली, तर स्वतःच्या खर्चातून आणखी खोली बांधली आहे. राहण्यासाठी अपेक्षित अशा सोयीसुविधा केल्या आहेत. ‘होम स्टे’मध्ये एका दिवसासाठी १८०० ते २२०० रुपये असा दर आकारला जातो. पण गेल्या कोरोना महामारी व टाळेबंदीमुळे त्या बराच बंद ठेवल्या लागल्या.

अलीकडे पर्यटकांचा ओघ चांगल्या प्रकारे वाढला आहे. त्यामुळे उत्पन्नाचा एक स्रोत सुरू झाला आहे. या मिळणाऱ्या उत्पन्नामधून एक वर्षापूर्वी आणखी दोन खोल्या बांधल्या आहेत. येथे येणाऱ्या पर्यटकांना सकाळी बागेतील कॉफी दिली जाते. त्यामुळे आपोआप तिची जाहिरात होते.

ग्राहकांना त्याची चव आवडल्याने त्यांच्याकडून या कॉफीची खरेदी होते. गेल्या हंगामातील एक क्‍विंटल आणि या वर्षामध्ये सुमारे दोन क्विंटल कॉफी या प्रकारेच सहज विकली गेल्याचे प्रकाश यांनी सांगितले.

शेती आणि ‘होम स्टे’च्या कामामध्ये वडील रिंबा बुडा जांभेकर (वय ७५ वर्षे), पत्नी नलिता, मुलगा प्रत्युष (वय १३) यांची मदत होते. दुसरा मुलगा कपिल हा सहा वर्षांचा आहे.

Success Story
Mango Canning : कॅनिंगला आंब्याचा तुटवडा; दर प्रतिकिलो ६० रुपयांवर

...असे आहे अर्थकारण

- चिखलदरा हे पर्यटनस्थळ असून, येथे राज्यभरातील पर्यटकांची रेलचेल राहते. मेअखेर ते जूनच्या पहिल्या आठवड्यात आंबा विक्रीसाठी उपलब्ध होतो. त्या वेळी प्रकाश हे रस्त्याच्या बाजूला स्वतः आंब्याची विक्री करतात.

गेल्या वर्षी हंगामातील केसर आंब्याला १५० रुपये किलोचा दर मिळाला. त्यातून त्यांनी ३० हजार रुपयांचे उत्पन्न झाले. मात्र या वर्षी गारपीटमुळे आंबा बागेमध्ये जास्त नुकसान झाले. त्यामुळे चांगली फळे मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.

- २४०० कॉफी झाडांना टप्प्याटप्प्याने बिया येत आहेत. त्या पीठ गिरणीतून दळून बारीक केल्या जातात. गेल्या वर्षी त्यांना एक क्‍विंटल तीस किलो कॉफी पावडर इतके उत्पादन हाती आले. जांभेकर या कॉफीची विक्री ८०० रुपये प्रति किलो या दराने करतात. या वर्षी २ क्विंटल कॉफी पावडर मिळाली. तीही ८०० रुपये प्रति किलो प्रमाणे विकली गेली. त्यातून १ लाख ६० हजार रुपये उत्पन्न मिळाले.

- ‘होम स्टे’मध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये २५६ कुटुंबे राहून गेली. त्यातून सुमारे सहा लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com