Dr. Paritosh Gangwal and Farm Agrowon
यशोगाथा

Success Story : ‘डॉक्टर’चा व्यावसायिक शेतीचा आदर्श

Article by Suryakant Netke : पुणे येथे ‘आयसीयू’ तज्ज्ञ डॉक्टर असलेले डॉ. परितोष गंगवाल यांनी आपली वैद्यकीय सेवा सांभाळून गोंधवणी (ता. श्रीरामपूर) येथील २० एकर शेतीलाही वाहून घेतले आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Indian Agriculture : मूळचे संगमनेर (जि. नगर) येथील रहिवासी डॉ. कल्याण व चंद्रकला हे गंगवाल दांपत्य पुणे येथे स्थानिक झाले असून, प्रसिद्ध डॉक्टर अशी त्यांची ओळख आहे. त्यांचे चिरंजीव डॉ. परितोषदेखील पुण्यातील ‘आयसीयू स्पेशालिस्ट’, पत्नी डॉ. सीमा ‘डेंटिस्ट’, तर बंधू डॉ. आनंद हे स्पोर्ट विषयातील प्रसिद्ध डॉक्टर आहेत.

शेतीचाही लागला लळा

सुमारे २६ वर्षे वैद्यकीय सेवा बजावत असतानाच २०१७ च्या सुमारास डॉ. परितोष यांना शेतीचाही लळा लागला. त्यांच्या वडिलांनी गोंधवणी (ता. श्रीरामपूर) येथे १९८५ मध्ये २० एकर शेती घेतली होती. पण ती मुख्यतः पडीक होती. सन २०२० च्या सुमारास परितोष यांचे शेताकडे येणे- जाणे वाढले. त्यानंतर शेतीचा सर्वांगीण, एकात्मिक विकास करून ती व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर करण्याचे ठरवले. त्यांना साथ मिळाली ती अनेक वर्षापासून गंगवाल कुटुंबीयांसोबत असलेल्या विजय व विलास या मस्के बंधूंची. आज शेतीचे व्यवस्थापन तेच पाहतात.

बहुविध पीक पद्धतीचा अवलंब

परितोष सांगतात, की शेती विकसित करताना पहिला प्रश्‍न होता पाण्याचा. त्याची वर्षभर शाश्‍वती करण्यासाठी सुमारे ३८ गुंठ्यांत एक कोटी लिटर क्षमतेचे शेततळे उभारले. आम्ही सुरुवातीला मोठ्या क्षेत्रावर कांदा केला. पण चांगले दर न मिळाल्याने नुकसान झाले. तेव्हापासून ठरवले, की बाजारातील मागणीचा विचार करून बहुविध पीक पद्धतीचा अवलंब करायचा. कोणतेही पीक तीन ते चार एकरांपुरतेच घ्यायचे. एखाद्या पिकात नुकसान झाले तर बहुविध पद्धतीमुळे दुसऱ्या पिकातून ते भरून काढता येते. आता दरवर्षी बारा ते पंधरा एकरांवर विविध भाजीपाला घेण्यात येतो.

गंगवाल यांच्या शेतीची वैशिष्ट्ये

ज्या काळात भाज्यांची आवक बाजारात कमी असते अशावेळी आपला माल विक्रीस येईल असे नियोजन. उदा. वांग्याची एप्रिलच्या दरम्यान तीन ते चार एकरांत लागवड. त्यास जुलै ते सप्टेंबर काळात अधिक मागणी आणि दर. प्रति किलो २५ ते ४० रुपये दर मिळतो.

टोमॅटोचीही एप्रिलच्या दरम्यानच लागवड. जून काळात त्यास चांगला दर मिळतो.

वांगी काढल्यानंतर काकडी. ती चाळीस दिवसांत सुरू होते. पुढे दोन महिने उत्पादन मिळते.

हिरव्या मिरचीची दोन एकरांत लागवड. एकरी वीस टन उत्पादन.

यंदा पाच एकरांत कांदा होता. एकरी १२ ते १४ टनांपर्यंत उत्पादन मिळाले.

रमझान सणाची मागणी ओळखून चार एकरांत यंदा कलिंगड घेतले. एकूण १०० टनांपर्यंत उत्पादन मिळाले. तोच ‘बेड,’ ठिबक व मल्चिंगवर अजून चार एकरांत कलिंगड लागवड केली आहे. त्यातच वांग्याचे आंतरपीक घेतले आहे. कलिंगड काढणी होईपर्यंत वांग्याचे उत्पादन सुरू होईल.

मोसंबीत आंतरपीक म्हणून कलिंगडाची झिगझॅग पद्धतीने लागवड.

दीड एकरांत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या मदतीने शेडनेट. त्यात यंदा ढोबळी मिरची.पहिला तोडा निघाला असून एक टन उत्पादन मिळाले आहे. ५५ ते ६० रुपये प्रति किलो दर मिळत आहे.

थोडक्यात, वर्षभर कोणत्या ना कोणत्या पिकाचे उत्पादन व उत्पन्न सुरू राहील व उत्पादन खर्चात बचत केली जाईल या पद्धतीने नियोजन.

नगर, श्रीरामपूर, औरंगाबाद, राहाता, नाशिक आदी बाजारांत विक्री.

बांधावर अर्ध्या एकरात सागवानाची लागवड व रोपांची बाग विकसित केली आहे. विविध फळझाडेही घेतली आहेत.

व्यवस्थापनातील अन्य बाबी

सत्तर टक्के सेंद्रिय व ३० टक्के रासायनिक पद्धतीचा वापर.

सुमारे २० एचएफ गायी. वर्षाला साठ ते सत्तर टन शेणखत मिळते. सुमारे १२ हजार लिटरच्या पाच टाक्या. त्यात गोमूत्र व शेणखतापासून विविध स्लरी निर्मिती.

गांडूळ खताच्या सहा टाक्या. प्रति पन्नास दिवसाच्या बॅचमध्ये पाच टन खत निर्मिती. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून विविध जिवाणू संवर्धके आणली जातात. त्यासाठी १० प्लॅस्टिक ड्रॅमची सुविधा तयार केली आहे.

प्रत्येक पिकात पॉली मल्चिंगचा वापर.

पिकांना क्षारयुक्त पाणी जाऊ नये यासाठी फिल्टर यंत्रणा बसवली आहे.

अन्य सुविधा

दैनंदिन २५ मजुरांची व्यवस्था केली आहे. मस्के कुटुंबातील सदस्यही शेतात राबतात. तीन आदिवासी कुटुंबांनाही वर्षभर रोजगार दिला आहे. बायोगॅस प्रकल्प उभारला आहे. मजुरांना स्वयंपाकासाठी इंधन म्हणून त्याचा वापर होतो. त्यांच्यासाठी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोयही आहे. भारनियमनाच्या काळात रात्री वीज असताना बिबट्या किंवा अन्य गोष्टींचे भय असते. त्यामुळे सौरऊर्जेवरील पंप यंत्रणा बसवली आहे.

दोन कुटुंबांनी जपले नाते

डॉ. गंगवाल आणि मस्के परिवाराने कौटुंबिक नाते जपले आहे. शेती विकासातील विविध बाबी, पायाभूत सुविधा, निविष्ठांसाठी डॉ. परितोष भांडवल गुंतवतात. नफ्यातील पन्नास टक्के भागीदारी दोन्ही कुटुंबांत विभागली जाते.

डॉ. परितोष गंगवाल ९८२२४०६०८२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Import : अफगाणिस्तानातून लसणाची आयात

Sharad Pawar : ईव्हीएम, पैशाने आमचा घात केला

Natural Farming : नैसर्गिक शेती राष्ट्रीय अभियानास मंजुरी

Sugarcane Crushing : सोलापुरातील ९ कारखान्यांत ३ लाख ४४ हजार टन गाळप

Soybean Procurement : सोयाबीन खरेदी १२ टक्के ओलाव्याच्या अटीनेच सुरू

SCROLL FOR NEXT