Sale of Farm Produce : शेतीमालाची थेट ग्राहकांना विक्री

Article by Santosh Mundhe : चाळीस वर्षांपासून त्या स्वतःच्या शेतीमधील भाजीपाल्याची गाव परिसरातील आठवडी बाजारात थेट विक्री करत आहेत. भाजीपाला विक्रीतून कुटुंबाची आर्थिक घडी बसवत त्यांनी शेतीला नवी दिशा दिली आहे.
Dhotre Family and Farm
Dhotre Family and FarmAgrowon

Agriculture Success Story of Dhotre Family : खिर्डी गावातील (ता. खुलताबाद, जि. छत्रपती संभाजीनगर) सखूबाई दत्तू धोतरे यांच्या कुटुंबाची दहा एकर शेती आहे. यामध्ये एक एकर आले, एक एकर हळद लागवड वगळता उर्वरित शेतामध्ये टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, बीट, काकडी, कारले, दोडका, घोसाळे, पालक, मेथी, कोथिंबीर, आंबट चुका यासह विविध हंगामी भाजीपाला पिकांची लागवड असते.

परिसरातील बाजारपेठेच्या मागणीनुसार भाजीपाला लागवडीचे नियोजन आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी त्यांची दोन मुले भाऊसाहेब, संदीप तसेच सौ. भीमाबाई, सौ. विमल या सुनांकडे असते.

सासूबाईंकडून घेतला वसा :

१९७८ मध्ये दत्तू यांच्याशी विवाह झाल्यानंतर सखूबाई या धोतरे कुटुंबात आल्या. १९७९ पासून सासूबाई व पतीसह त्यांनी शेतातील उत्पादित भाजीपाला विक्रीची जबाबदारी सांभाळण्यास सुरुवात केली. आजही त्या गाव शिवारातील चार आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करतात.

पूर्वी सखूबाई खुलताबाद, दौलताबाद येथील बाजारपेठेत सासूबाई स्व. गयाबाई सखाराम धोतरे यांच्या साथीने भाजीपाला विक्री करायच्या. त्या वेळी दोन एकर शेतीमध्ये वर्षभर भाजीपाला लागवड असायची. शक्यतो कोणत्याही व्यापाऱ्याला भाजीपाला विक्री न करता आठवडी बाजारात थेट भाजीपाला विक्रीवर दोघींचा भर होता.

Dhotre Family and Farm
Mango Farming : दुर्गम भातपट्ट्यात आंबा बागेचा प्रयोग

जेव्हा दत्तू धोत्रे पंधरा वर्षांचे होते, तेव्हापासून आई-वडिलांना भाजीपाला उत्पादन आणि विक्रीसाठी मदत करीत होते. आधी दत्तू भाऊ, सौ. सखूबाई आणि दत्तूभाऊंच्या आई स्व. गयाबाई हे एकाच बाजारात भाजीपाला विक्रीसाठी एक दुकान न लावता तीन दुकान लावायचे.

आई गेल्यानंतर दत्तू भाऊ आणि सखूबाई हे दोघे जण वेगवेगळ्या ठिकाणी भाजीपाला विक्री करायचे. जेव्हा दत्तू धोतरे आणि सखूबाई हे दांपत्य भाजीपाला विक्रीची जबाबदारी सांभाळत, त्याच वेळी दत्तू यांचे लहान बंधू शिवाजी आणि वहिनी सौ. अरुणाबाई या पीक नियोजन, व्यवस्थापन आणि उत्पादनाची जबाबदारी सांभाळत होत्या.

सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील रविवारचा बाजार, गुरुवारचा छावणी बाजार, रविवारचा मोंढा बाजार याशिवाय शनिवार, बुधवारी खुलताबाद बाजारामध्ये दत्तू धोतरे आणि सखूबाई भाजीपाला विक्री करतात. प्रत्येक बाजारात साधारणतः किमान पाच ते सात क्विंटल भाजीपाल्याची विक्री स्वतः सखूबाई करतात.

तेवढीच भाजीपाला विक्री दत्तू धोतरेही करतात. चाळीस वर्षांपासून या विक्री व्यवस्थेमध्ये कोणताही खंड नाही. थेट भाजीपाला विकला तर किमान दीड पट अधिकचे पैसे सहज मिळू शकतात, असा सखूबाई यांचा अनुभव आहे. दर आठवड्याला भाजीपाला विक्रीतून खर्च वजा जाता आठ हजारांची उलाढाल होते.

हळद प्रक्रियेवर भर

धोतरे कुटुंबीय हे साधारणतः २०१० पासून एक एकरावर हळदीचे पीक घेतात. केवळ हळकुंड तयार करून न विकता हळद पावडर तयार करून विविध बाजारपेठेत तसेच धान्य महोत्सव, कृषी महोत्सव, प्रदर्शनातून विक्री केली जाते.

हळद पावडर तयार करण्यापूर्वी उकडलेली हळकुंड महिनाभर वाळवणे, पावडर तयार करताना ती पॅकिंग करण्यापूर्वी गाळून घेण्याची जबाबदारी सखूबाई स्वतः आणि प्रसंगी मजुराच्या मदतीने सांभाळतात. दरवर्षी सरासरी २५ ते ३० क्विंटल हळद पावडरीची विक्री केली जाते. सरासरी २५० रुपये किलो दराने विक्री केली जाते.

Dhotre Family and Farm
Nanded APMC : हळदीसाठी प्रसिद्ध नांदेडची बाजार समिती

बांधले घर, वाढवली शेती

दत्तू आणि शिवाजी धोतरे या दोन्ही भावंडांना त्यांच्या पत्नी सखूबाई आणि अरुणाबाई यांनी समर्थ साथ मिळाली आहे. वडिलांच्या कारकिर्दीतील कुटुंबाची सात एकर शेती सखूबाई, अरुणाबाईंच्या साथीमुळे धोतरे कुटुंबीयांची शेती वीस एकरांपर्यंत पोहोचली आहे. काटकसर, सचोटी आणि व्यावसायिकेमुळे शेती फायदेशीर झाली झाली आहे.

शेतीतून मिळालेल्या उत्पन्नातून मुलांच्या शिक्षणासह, चरितार्थ भागवून उरलेल्या पैशातून धोतरे कुटुंबीयांनी टुमदार घर उभे केले आहे. शेतीला शाश्‍वत पाणी पुरवठ्यासाठी सात हजार फुटांवरून दोन पाइपलाइन केल्या आहेत. दोन विहिरींच्या माध्यमातून वीस एकर शेतीला ठिबक सिंचनाच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. एकत्र कुटुंब तसेच आताही शेती पीक नियोजनात शिवाजी धोतरे कायम मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.

मिळाली शेतकऱ्यांची साथ...
दत्तू धोत्रे व त्यांच्या पत्नी सखूबाई चाळीस वर्षे सातत्याने उत्पादित शेतीमाल थेट शहरी बाजारपेठेत विकत असल्याने त्यांच्या पदरात अधिकची रक्कम पडत असल्याची बाब गावातील शेतकऱ्यांच्या लक्षात आली.

धोतरे दांपत्याने थेट शेतीमाल विक्री केल्यास तुमचे अर्थकारणही सुधारण्यास मदत होईल ही बाब शेतकऱ्यांना पटवून दिली. त्यामुळे सध्या खिर्डी शिवारातील ४० शेतकरी आपल्या शेतात उत्पादित होणारा भाजीपाला धोतरे दांपत्यासह विविध बाजारात जाऊन थेट विक्री करत आहेत.

दत्तूभाऊ ठरले शेतीनिष्ठ शेतकरी

सखूबाई धोतरे यांचे पती दत्तू सखाराम धोतरे यांना २०२०-२१ साठीचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार अलीकडेच जाहीर झाला आहे. दत्तू धोतरे यांचे वडील स्व. सखाराम धोतरे यांनाही १९८३ मध्ये शासनाचा शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार मिळाला होता.

दत्तू व शिवाजी या दोन्ही भावंडांना त्यांच्या पत्नींनी दिलेल्या साथीमुळे नियोजनपूर्वक शेती करणे आणि त्यातून कुटुंबाचा अर्थकारण सक्षम करणे शक्य झाले. शेतीमधील प्रगतीमुळे वडिलांपाठोपाठ दत्तू धोतरेही शेतीनिष्ठ शेतकरी ठरले.

महिलांकडे शेतीची जबाबदारी

दत्तू आणि शिवाजी हे दोघे भाऊ सध्या विभक्त झाले असले तरी त्यांच्या कुटुंबातील शेतीची अर्धी अधिक जबाबदारी घरातील महिलाच सांभाळतात. शेतातील निंदणी, खुरपणीसह भाजीपाला काढणी व प्रक्रियेच्या कामात धोतरे कुटुंबातील महिलांचा सहभाग महत्त्वाचा ठरला आहे. दत्तू धोतरे यांच्या कुटुंबाच्या दहा एकर शेतीमध्ये पत्नी सखूबाई आणि त्यांच्या सुनांचा सहभाग महत्त्वाचा आहे.

शिवाजी धोतरे यांच्या पत्नी अरुणाबाई आजही त्यांच्याकडे असलेल्या दहा एकर शेतीचे व्यवस्थापन मुलगा निखिल आणि सून शीतल यांच्या मदतीने सांभाळतात. अरुणाबाईंचा दुसरा मुलगा नीलेश पुण्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहे.

दहापैकी सात एकरावर वर्षभर भाजीपाला लागवड.

टोमॅटो, मिरचीसह काही भाजीपाला पिकांसाठी आच्छादनाचा वापर.

कीड नियंत्रणासाठी आधुनिक सापळ्यांचा वापर.

तंत्रज्ञानावर आधारित शेती व्यवस्थापन.

सोयाबीन लागवडीत बीबीएफ तंत्राचा वापर, एकरी १४ क्विंटलपर्यंत उत्पादन.

संपर्क : सखूबाई दत्तू धोतरे, ९५१८३८२८८४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com