Success Story : आदिवासी, दुर्गम भागात विकासाची उभारली गुढी

Article by Shantaram Kale : नगर जिल्ह्यातील अकोले हा निसर्गाचे वरदान लाभलेला, दुर्गम व आदिवासी बहुल तालुका आहे. तालुक्यातील शेतकरी नवे प्रयोग, पीक बदल, सुधारित तंत्रज्ञान, थेट विक्रीतून बाजारपेठ विकसित करणे आदी प्रयोगांमधून आपल्या शेतीचे व कुटुंबाचे अर्थकारण उंचावत आहेत. प्रतिकूलतेतून कष्ट, जिद्द व अभ्यासातून त्यांनी विकासाची गुढी उभी केली आहे.
Tribal Agriculture Development
Tribal Agriculture DevelopmentAgrowon
Published on
Updated on

शांताराम काळे

Agriculture Development in Tribal Areas : नगर जिल्ह्यात अकोले या निसर्गसंपन्न आदिवासी बहुल तालुक्यातील अतिदुर्गम भागातील शिरपुंजे येथील गंगाराम धिंदळे यांची प्रयोगशील शेतकरी अशी ओळख आहे. त्यांची वडिलोपार्जित १८ एकर शेती आहे. भात शेतीत चारसूत्री, एसआरटी पद्धत, श्री आदी पध्दतीचे तसेच विविध वाणांचे प्रयोग त्यांनी केले आहेत.

इंद्रायणीचे एकरी २४ क्विंटलपर्यंत तर काळभाताचे २० क्विंटलपर्यंत उत्पादन ते घेतात. ऑनलाइन पद्धतीने तसेच विविध सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी आपल्या शेतीचे व्हिडिओ सर्वत्र शेअर केले आहेत. त्यातून थेट ग्राहकांना विक्री करून त्यांनी आपली बाजारपेठ निर्माण केली आहे. इंद्रायणी भाताची किलोला ६० रुपये तर काळभाताची १०० रुपये दराने ते विक्री करतात. पत्नी पूजा देखील पतीच्या खांद्याला खांदा लावून शेतीत राबतात.

Tribal Agriculture Development
Success Story : गाजर पिकातून नांदतेय समृद्धी

सेंद्रिय बचत गटाची निर्मिती

सुमारे ५० शेतकऱ्यांना एकत्र करून प्रेरणा सेंद्रिय शेतीचा बचत गट धिंदळे यांनी तयार केला आहे. सामुहिक स्वरूपाचे पीजीएस प्रमाणपत्र त्यांना मिळाले आहे. मागील वर्षी आपल्यासह सर्व शेतकऱ्यांच्या मिळून दहा लाख रुपयांच्या तांदळाची विक्री त्यांनी पुरंदर तालुक्यातील एका सेंद्रिय क्षेत्रातील कंपनीला यशस्वी केली आहे. याच पद्धतीने खुरासणीची ते विक्री करतात. मागील वर्षी दोन अमेरिकन महिलांनीही त्यांच्या सेंद्रिय शेतीला भेट दिली आहे.

स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन

मागील वर्षी धिंदळे यांनी चार गुंठ्यात स्ट्रॉबेरीचा प्रयोग करून थेट ग्राहकांना २०० रुपये प्रति किलो दराने विक्री केली. त्यातून ५० हजारांचे उत्पन्न मिळवले. शेतीतील उत्पन्नातून शेततळेही उभारले आहे. बोटिंगची सुविधा उभारून कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला आहे. मुलगा पदवीचे शिक्षण घेत आहे.

Tribal Agriculture Development
Success Story : संकटे भेदली, उमेद जागविली कष्टाची गोड फळे मिळाली

बारामते यांचे शेतीतील प्रयोग

धामणवण येथील शांताराम व गिरजाबाई या बारामते दांपत्याचे चार हेक्टर क्षेत्र आहे. पुरेशा भांडवलाअभावी त्यांना या संपूर्ण क्षेत्रावर शेती करणे शक्य नव्हते. त्यामुळे पीक पध्दतीचे सुयोग्य नियोजन, घरच्या सर्व सदस्यांचे कष्ट, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर व कृषी विभागाचे मार्गदर्शन यातून त्यांनी शेतीत चांगली प्रगती केली. त्यातील उत्पन्नातूनच टप्प्याटप्प्याने तीन हेक्टरपर्यंत क्षेत्र शेतीखाली आणण्यात त्यांना यश मिळाले आहे.

दांपत्याची सुधारित शेती

बारामते इंद्रायणी, काळभात, निळाभात आदी विविध वाणांची लागवड करतात. मागील वर्षी एक हेक्टरमध्ये ७६ क्विंटल उत्पादन घेऊन त्यांनी जिल्ह्यात भातपिकात पहिला क्रमांक मिळवला आहे. भाताची काढणी झाल्यानंतर ते दरवर्षी सुमारे २० गुंठे ते एक एकरात कलिंगडाची लागवड करतात. व्यापाऱ्यांना न देता रस्त्याच्या बाजूल स्टॉल उभारून थेट ग्राहकांना ७० ते ८० रुपयांना चार किलो या दराने ते कलिंगडाची विक्री करतात. मुलगा रवींद्र यांची साथ त्यासाठी होते.

शेततळ्याची उभारणी

उन्हाळ्यात पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. दूर अंतरावरून पाइपलाइन करण्याचा खर्च परवडण्याजोगा नाही. त्यामुळे पाण्याची शाश्‍वती तयार करण्यासाठी बारामते यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून शेततळे उभारले आहे. पावसाळ्यात विहिरींतील पाण्यातून ते भरून घेण्यात येते. त्यावर उन्हाळी पिके घेण्यात येतात.

शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा वापर बारामते दांपत्य करू लागले आहे. शेडनेट, गादीवाफा, पॉली मल्चिंग पेपर, ठिबकच्या साह्याने ते ढोबळी मिरची, काकडी, फरसबी आदी भाजीपाला पिके घेतात. मागील वर्षी शेडनेटमध्ये उन्हाळ्यात काकडीचे यशस्वी उत्पादन घेऊन दोन लाखांच्या दरम्यान उत्पन्न कमावले. गांडूळ खत, जीवामृत, दशपणी अर्क यांचा अधिकाधिक वापर करून शेती सेंद्रिय पद्धतीने करण्याचा प्रयत्न आहे. कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळते.

गंगाराम धिंदळे ९४२३१ ६२७४३

शांताराम बारामते ९५५२३ ७२९८४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com