Mango Farming Agrowon
यशोगाथा

Mango Orchard : केसर आंबा बागेतून जोपासली शेतीची आवड

माणिक रासवे

Mango Orchard Management : मूळचे हरियाना राज्यातील पानिपत जिल्ह्यातील शोधपूर येथील खुराणा कुटुंब सुमारे चाळीस वर्षांपूर्वी परभणी येथे वास्तव्यास आले. अशोककुमार, पुरुषोत्तमलाल व राकेशकुमार असे तीन बंधूंचे हे एकत्रित कुटुंब आहे. कापड व्यवसाय व सोबतच ट्रॅक्टरचलित व अन्य कृषी अवजारे निर्मितीचा त्यांचा व्यवसाय आहे. कुटुंबीयांची मूळ गावी शेती होती.

त्यामुळे शेतीशी नाळ कायम राहिली. व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यानंतर शेतीची ही आवड आपल्या वास्तव्याच्या भागात म्हणजे परभणी भागातही जोपासायचे ठरविले. परभणीपासून आठ किलोमीटर वरील पिंगळी व शेजारील तट्टूजवळा या गावाच्या शिवारात टप्प्याटप्प्याने जमीन खरेदी केली. आजमितीला १२५ एकर आहे. काही क्षेत्र चोपण आहे. पाच विहिरींची सुविधा आहे. जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्याचा सिंचनासाठी लाभ होतो.

पीक पद्धती

सध्या अशोककुमार खुराणा यांचे पुत्र अमनदीप शेतीचे व्यवस्थापन बघतात. लहानपणापासून शेतीची आवड असल्याने पूर्ण लक्ष त्यावरच केंद्रित करायचे असे त्यांनी ठरविले. काही वर्षांपूर्वी १० ते १५ एकरांवर ते ऊस लागवड करीत. परंतु आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्यामुळे त्यांनी हे पीक घेणे थांबवले. सध्या खरिपात सोयाबीन, रब्बीत हरभरा, गहू, ज्वारी ही पीक पद्धती त्यांना किफायतशीर वाटू लागली आहे.

केसर आंबा लागवड

काही वर्षांपूर्वी खुराणा यांच्याकडे विविध जाती असलेली दोन एकर आमराई होती. परंतु त्यातून व्यावसायिक उत्पन्न मिळत नव्हते. मग बाजारपेठेतील मागणी पाहून केसर आंब्याची लागवड करण्याचे निश्‍चित केले. सन २०१६ च्या दरम्यान गुजरातहून कलमे आणली. वीस बाय २० फूट अंतरावर लागवड केली.

सध्या एकरी शंभर तर एकूण क्षेत्रात बाराशे ते तेराशेपर्यंत झाडे असावीत. त्यात काही दशहरी तसेच गावरानही जात आहे. दरवर्षी जूनमध्ये बागेची छाटणी केली जाते. त्यामुळे झाड डेरेदार होते. वाढ नियंत्रक पॅक्लोब्युट्राझोलचा वापरही करून पाहिला आहे. आंब्या व्यतिरिक्त पेरू (एल ४९ वाण), दोन एकरांत साग तर बांधावर नारळाची लागवड आहे.

मागील तीन वर्षांपासून आंबा उत्पादन सुरू झाले आहे. बागेतील फळाचे वजन २०० ते ३०० ग्रॅम असते. दोन वर्षे एकरी एक ते दीड टन उत्पादन मिळत आहे. व्यापाऱ्यांना विक्री केल्यास प्रति किलो ५० ते ७० रुपये दर मिळतो. अमनदीप स्वतः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वसमत रस्त्यावरील प्रवेशद्वारासमोर बसून आंब्याची थेट विक्री करतात.

त्यास ११० ते १२० रुपये दर मिळतो. शहरापासून अवघ्या काही किलोमीटरवर असल्याने थेट बागेतून स्वतःच्या हाताने फळे तोडून घेता येतील अशी व्यवस्थाही त्यांनी केली आहे. त्यामुळे ग्राहक थेट बागेतूनही खरेदी करतात.

यांत्रिकीकरण व शेतीतील सुविधा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून यंदा मार्चमध्ये अमनदीप यांच्या बागेत ड्रोनद्वारे फवारणीची प्रात्याक्षिके घेण्यात आली. त्या वेळी कुलगुरू डॉ. इंद्र मणी देखील उपस्थित होते. क्षेत्र मोठे असल्याने अमनदीप यांनी यांत्रिकीकरणाचा अंगीकार केला आहे. त्यांच्याकडे दोन मोठे आणि दोन छोटे ट्रॅक्टर आहेत.

ट्रॅक्टरचलित विविध अवजारांचा संच आहे. पाण्याची मुबलकता असली, तरी गरजेनुसार ठिबक व तुषार संचाचा वापर करतात. नियमित शेतीकामांसाठी ७ ते ८ सालगडी असून, त्यांना राहण्यासाठी घरे आहेत. शेतीमाल साठवणुकीसाठी व्यवस्था आहे. पाच गाई व दोन म्हशी आहेत. दुधासह शेणखत उपलब्ध होते.

अमनदीप खुराणा ७७२१९५०६५६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

Fruit Crop Insurance : फळपीक विमा योजनेत नियमबाह्य सहभागाबाबत कारवाईसत्र

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

SCROLL FOR NEXT