Agri Tourism
Agri Tourism Agrowon
यशोगाथा

Agri Tourism : कोयनेच्या कुशीतील ‘आनंद सागर’

विकास जाधव 

सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर तालुक्यातील कोयना धरणाच्या (Koyana Dam) शिवसागर जलाशयाचा अनेक व्यावसायिकांनी बेटिंग तसेच हॅाटेल व्यवसायासाठी उपयोग करून घेतला आहे. वाळणे (तापोळा) येथील आनंद रामजी नलावडे यांनी मात्र ग्रामीण जीवनशैली (Rural Lifestyle) व त्यातील निसर्गाचा जिवंत अनुभव देणारे कृषी पर्यटन केंद्र (Agriculture Tourism Center) येथे आठ वर्षांच्या अथक प्रयत्नांतून विकसित केले आहे.

पर्यटन केंद्राची कल्पना

वडिलांचे लहानपणीच निधन झाल्याने कुटुंबाची जबाबदारी आनंद यांच्यावर आली. त्यामुळे दहावीनंतर शिक्षण घेता आले नाही. सुरवातीच्या काळात मजुरी, त्यानंतर सामाजिक संस्थेत नोकरी केली. आईच्या निधनानंतर घरी थांबणे गरजेचे झाले. उदरनिर्वाहाच्या दृष्टीने शेतीसह तंबू (टेंट) उभारण्यासह तापोळा परिसरात पुरातन देवराई, मंदिरे, पक्षी व निसर्गसौंदर्य, धबधबे दाखवण्याचे अर्थात गाइड चे काम ते करू लागले. दरम्यान तापोळासह महाबळेश्वर तालुक्यात कृषी पर्यटन विस्तार मोठ्या प्रमाणात सुरू झाला. आनंद यांनाही या व्यवसायात उतरावे असे वाटू लागले.

कल्पना प्रत्यक्षात आणली

आपल्या एक एकर जमिनीची विक्री करून भांडवल उभे केले. महाबळेश्वरहून गावात वाहनाने यायचे तर अंतर जास्त होते. बोट हा महत्त्वाचा पर्याय होता. अशा ठिकाणी केंद्र उभारणी करणे सोपी गोष्ट नव्हती. काही लोकांनी त्यांना वेड्यातही काढले. पण निश्‍चयावर ठाम राहात २०१४ मध्ये आनंद यांनी आनंदसागर कृषी पर्यटन केंद्राची उभारणी सुरू केली. गावाबाहेरील शेतात वीज, ‘डीपी’, पाणी, रस्ता, शेतीसाठी छोटे प्लॅाटस, तंबू निवास, भोजन कक्ष उभे केले. त्यासाठी दहा लाख रुपयांचा खर्च आला. अशा रीतीने नदीच्या पलीकडील पहिले पर्यटन केंद्र आनंद यांनी सुरू केले. सध्या चार केंद्रे सुरू झाली आहेत. त्यातून स्थानिकांना रोजगार मिळाला आहे.

बोटीतून पर्यटकांची सोय

महाबळेश्वर ते गाव अंतर जास्त असल्याने आनंद यांनी बोट खरेदी केली आहे. साताराहून येणाऱ्या पर्यटकांसाठी तेटली येथे चारचाकी ठेवण्याची सुविधा केली असून तेथून पर्यटकांना बोटीतून आणले जाते. महाबळेश्वरहून येणाऱ्या पर्यटकांना पाली वाळणे बंदर येथे वाहन ‘पार्क’ करता येते. तेथून बोटीतून त्यांना केंद्रात आणले जाते. त्याद्वारे पर्यटकांना जलविहाराचा आनंदही मिळतो. सन २०१५ नंतर ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला. आजमितीला वर्षभरात सातशेच्या आसपास पर्यटक भेटी देतात. परदेशी तसेच राज्याबाहेरील पर्यटकांचाही त्यात समावेश आहे. कोरोना काळात व्यवसाय दोन वर्षे बंद होता. मागील वर्षापासून व्यवसायाने पुन्हा गती घेतली आहे.

व्यवसायाला पूरक शेती

पर्यटन व्यवसायाला पूरक म्हणून सुमारे दीडशे देशी कोंबड्या, देशी गायी व म्हशींचे संगोपन केले जाते. आंबा, पेरू, नारळ, आवळा, चिकू, रामफळ, लिंबू आदी फळझाडे लावली आहेत. गांडूळखत निर्मिती युनिट आहे. चुलत बंधू चंद्रकांत यांच्यासोबत १५० मधपेट्या ठेवल्या आहेत. मधाची केंद्रात तसेच बाहेरही विक्री होते. दोन एकरांत मिश्र भाजीपाला घेण्यात येतो. त्याचा केंद्रावरील जेवणातही वापर होतो.

मदत व मार्गदर्शन

व्यवसायात संपूर्ण कुटुंब राबते. आनंद यांच्या पत्नी शीतल यांच्यावर अधिक जबाबदारी असते. मुलगी प्राजक्ता व मुलगा आयर्न देखील शक्य तेवढा हातभार लावतात. पांडुरंग तावरे, आनंद कृषी पर्यटन केंद्राचे अध्यक्ष आनंदराव शिंदे, विठ्ठल धनावडे, प्रगतशील शेतकरी गणेश भोसले, श्रीराम संस्थेचे अध्यक्ष गणपत पार्टे, बोरगाव ‘केव्हीके’चे शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार तसेच कृषी विभागाची मदत व मार्गदर्शन मिळते. आनंद यांना कृषी पर्यटन गौरव (२०१९), ‘आत्मा’चा उत्कृष्ट शेतकरी, महाबळेश्वर पंचायत समितीचा आदर्श कृषी पर्यटन व लघू उद्योग आदी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

सुसज्ज खोल्या. मुबलक वीज व पाणी उपलब्धता.

पर्यटकांचे स्वागत गूळ, शेंगदाणे देऊन होते.

गावफेरीत ग्रामीण जीवन पद्धती, जुन्या पद्धतीची घरे, सुतारकाम, लोहारकाम, बांबूकाम दाखवले जाते.

पक्षी निरिक्षण, उत्तेश्वर मंदिर, चकदेव, मधुमकरंद गड, जंगल सफर, ‘ट्रेकिंग’ सुविधा. त्यासाठी गाईडची सोय.

वासोटा, त्रिवेणी संगम, दत्त मंदिर, देवराईचे बोटीद्वारे पर्यटन

सुरक्षेच्या दृष्टीने पाण्यात जाताना लाइफ जॅकेट’ चा वापर. पोहण्याची सुविधा. मासे पकडण्याचा आनंद, शेकोटीची सुविधा.

चुलीवरील शाकाहारी, मांसाहारी जेवण.

स्वउत्पादीत तांदूळ, नाचणी, घेवडा, तूप, सेंद्रिय मध विक्री.

खेळाची विविध साधने.

आनंद नलावडे,

९४२१००२५९०, ९४२२३०९८६६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Productivity : परभणी जिल्ह्यात कापूस रुईचा उतारा हेक्टरी ३ क्विंटल ९८ किलो

Water Scarcity : करकंब परिसरात द्राक्षबागांना टँकरने पाणी

Dam Water Stock : देशातील मोठी ७ धरणे कोरडी

Agriculture Irrigation : भामा-आसखेडच्या आवर्तनाची प्रतीक्षा

Ethanol Production : इथेनॉल मिश्रणाला बळ देण्याची अमेरिकेची तयारी

SCROLL FOR NEXT