Dairy Farming  Agrowon
यशोगाथा

Dairy Farming : दुग्ध व्यवसाय, संकलन, प्रक्रियेतून भक्कम केले शेतीचे अर्थकारण

Agriculture Economy : नगर जिल्ह्यात रुई (ता. राहाता) येथील प्रवीण वाकचौरे कुटुंबाने आर्थिक उत्पन्नस्रोतांची वृद्धी करीत दुग्ध व्यवसायातून आर्थिक प्रगती साधली आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Agriculture Success Story : नगर जिल्ह्यातील राहाता हा बागायती तालुका म्हणून ओळखला जातो. पाणी उपलब्धता बऱ्यापैकी असल्याने या भागात शेतीसोबत दुग्ध व्यवसाय, पशुपालनाला अधिक महत्त्व दिले जाते. तालुक्यातील रुई येथील सोपानराव वाकचौरे यांचे तीन मुलांचे कुटुंब आहे. यात प्रदीप, प्रवीण, योगेश ही तिघे भावंडे आहेत. सुमारे २१ एकर शेती आहे.

प्रदीप यांचे परिसरात सावळी विहीरनजिक राज्यमार्गावर विक्री केंद्र असून योगेश पाथर्डी येथे वैद्यकीय व्यवसाय (बीएएमएस) करतात. प्रवीण पूर्णवेळ शेती व दुग्ध व्यवसायाची धुरा सांभाळतात. पदवीसह त्यांनी ‘डेअरी’ विषयातील पदविका लोणी, प्रवरा येथील महाविद्यालयातून घेतली आहे. वडील सोपानराव, आई ज्योती, पत्नी सुनीता यांची त्यांना मदत व भावांचे मोठे सहकार्य होते.

दुग्ध व्यवसायाचा विस्तार

वाकचौरे कुटुंब सुमारे चाळीस वर्षांपासून दुग्ध व्यवसाय करते. परिसरातील शेतकऱ्यांकडून दूध संकलन करण्याचा व्यवसाय त्यांनी पुढे कायम ठेवला आहे. पूर्वी कुटुंबाकडे एक-दोन गायींचे पालन केले जायचे.

मात्र प्रवीण यांनी सात वर्षांपासून दुग्ध व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरविले. व्यवसायातील नफा वाढला तरच शेती व घरचे अर्थकारण सुधारेल हे त्यांनी हेरले होते. त्यादृष्टीने उत्पन्नाचे स्रोत वाढवणे व त्या दृष्टीने आर्थिक नियोजन करण्यास सुरुवात केली. तीन ते चार वर्षांपूर्वी मुक्त संचार पद्धतीचा गोठा उभारला. चार गायी खरेदी केल्या. त्यांच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ करीत आजमितीला त्यांची संख्या १५ पर्यंत नेण्यात ते यशस्वी झाले आहेत.

दूध संकलन वृद्धी

घरच्या व्यवसायातून आजच्या घडीला दररोज १०० ते १२० लिटर दूध संकलन होते. पण अर्थकारण सक्षम करण्यास तेवढे पुरेसे होणार नव्हते. मग परिसरातील शेतकऱ्यांचे ‘नेटवर्क’ वाढवले. आज त्यातून १५० ते २०० शेतकऱ्यांकडून दुधाचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोजचे दूध संकलन तीनहजार लिटरपर्यंत झाले आहे. शिर्डी जवळील निघोज येथे आउटलेट उभारले असून तेथे अद्याप काम सुरू आहे. तेथून सुमारे २०० लिटर दुधाची किरकोळ विक्री होते. जवळील चांदे कसारा येथे एका आघाडीच्या कंपनीला दुधाचा पुरवठा होतो.

प्रक्रिया- मूल्यवर्धनातून उत्पन्नवृद्धी

केवळ दूध संकलनावर थांबूनही चालणार नाही. प्रक्रिया मूल्यवर्धनातून शेतीमालाची किंमत वाढते. आपण दुधावर प्रक्रिया करून पदार्थ केले तर नियमित मिळणाऱ्या दरांपेक्षा अधिक पैसे मिळू शकतात. शिवाय शिर्डी संस्थान जवळ असल्याने मागणीही चांगली राहील हे प्रवीण यांनी जाणले.

त्यादृष्टीने राही महिन्यांपूर्वीच खवा आणि तूप करण्याचा व्यवसाय सुरू केला. सध्या २०० ते ३०० लिटर दुधावर प्रक्रिया केली जाते. महिन्याला सुमारे शंभर किलो खवा व पाच ते त्याहून अधिक किलो तुपाचे उत्पादन केले जाते. दसरा, दिवाळी तसेच अन्य सणांवेळी या पदार्थांची मागणी लक्षात घेऊन त्यानुसार निर्मितीचे नियोजन होते.

यशस्वी उलाढाल

खव्याची प्रति किलो दोनशे सत्तर रुपये तर तुपाची प्रति लिटर ५८० रुपये दराने विक्री होते. अर्धा, एक व दोन किलो स्वरूपात तूप तर पाकिटांमधून खवा उपलब्ध केला आहे.शुभदा मिल्क असा उत्पादनांचा ब्रॅण्ड विकसित केला आहे.

महिव्याला २० ते २५ लाखांची उलाढाल होत आहे. केवळ दूध विक्रीपेक्षा खवा, तूप आदी पदार्थांची निर्मिती केल्याने साधारणपणे वीस ते पंचवीस टक्के अधिक रक्कम मिळते. तसेच दरांच्या चढ-उताराच्या काळातही नुकसान होत नाही हे प्रवीण यांच्या लक्षात आले. गुणवत्ता कायम जपल्याने ग्राहकांकडून उत्पादनांना चांगली पसंती असते.

यांत्रिकीकरण

व्यवसायात यांत्रिकीकरण केल्याने वेळ, कष्ट व मजुरी खर्चात बचत झाली आहे. दूध संकलन, साठवण, दुधावरील साय वेगळी करण्यासह खवा व तूप निर्मितीसाठी विविध यंत्रांचा वापर होतो. त्यासाठी क्रीम सेपरेटर, स्टीम केटल, बॉयलर, दूध थंड करण्याचे तसेच तीन हजार लिटर क्षमतेचे आधुनिक साठवण यंत्र घेतले आहे. ही सर्व यंत्रणा उभी करण्यासाठी दहा लाखांची गुंतवणूक केली आहे.

शेतीतील उत्पन्नाची साथ

शेती व दुग्ध व्यवसाय हे एकमेकांना आर्थिकदृष्ट्या पूरक ठरले आहेत. कुटुंबाकडे असलेल्या २१ एकर शेतीपैकी १० एकरांवर ऊस असतो. दरवर्षी चार ते पाच एकरांत कांदा असतो. गोदावरी नदीचा स्रोत जवळ असल्याने सुमारे साडेचार किलोमीटरवरून पाइपलाइन केली आहे. सत्तर टक्के शेती सेंद्रिय पद्धतीने केली जाते. जनावरांसाठी एक एकर चारा, मका आदींचे नियोजन असते.

दरवर्षी सुमारे पन्नास ते साठ टन शेणखताची उपलब्धता होते. संपूर्ण खताचा वापर स्वतःच्या शेतीतच होतो. त्यातून रासायनिक खतांवरील दोन ते अडीच लाख रुपये खर्च कमी केला आहे. शिवाय जमिनीचा पोतही सुधारला आहे. एकरी १३ क्विंटलपर्यंत सोयाबीन, पंधरा ते सतरा टनांपर्यंत कांदा उत्पादन मिळते. त्याची टिकवणक्षमताही वाढली आहे.

मुरघासातून चारा टंचाईवर मात

गोदावरी नदीमुळे राहाता, शिर्डी, सावळीविहीर, रुई, निघोज परिसरात फार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत नाही. तरीही पाऊस कमी झाल्यास चाराटंचाईला अनेक वेळा सामोरे जावे लागते. त्यामुळे वाकचौरे चार-पाच वर्षांपासून मक्यापासून मुरघास तयार करतात. यंदाही ४० टन निर्मिती केली आहे.

प्रवीण वाकचौरे, ९८५०९२६१७४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result : शरद पवार पश्चिम महाराष्ट्राचा गड राखणार; सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला चांगला आघाडी

Seed Certification System : बीज प्रमाणीकरण यंत्रणा करा गतिमान

Chandrakat Patil On Election Result : सत्ता आमचीच; १६० जागा येतील असा चंद्रकात पाटील दावा, माझा विजय होणारच!

Parali Election Update : मुंडे, सत्तार, महाजन, वळसे पाटील आणि विखे पाटील; कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

Maharashtra Election : मराठवाडा, विदर्भात भाजपची मुसंडी; सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची आघाडी

SCROLL FOR NEXT