Success Story Of Dairy Business : अभ्यासपूर्ण व्यवस्थापनातून दुग्ध व्यवसाय केला यशस्वी

Milk Management : कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे (ता. हातकणंगले) येथील प्रफुल्ल परीट या युवा शेतकऱ्याने गोठा व्यवस्थापनातील तांत्रिक ज्ञान मिळवत, दुग्ध व्यवसायाबरोबरच दुधापासून प्रक्रियायुक्त पदार्थ करत उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत विकसित केला आहे.
Milk Management
Milk ManagementAgrowon
Published on
Updated on

प्रफुल्ल परीट

Dairy Business : प्रफुल्ल पांडुरंग परीट यांची अडीच एकर शेती. त्यात दोन एकरांवर ऊस लागवड तर अर्धा एकर क्षेत्र जनावरांच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. प्रफुल्ल यांनी बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही छोटे मोठे व्यवसाय केले.

काही ठिकाणी नोकरीही केली. परंतु नोकरी किंवा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांनी शेतीला पशुपालनाची जोड द्यायचे ठरविले. सुरुवातीची एक दोन वर्ष त्यांनी वडिलोपार्जित गाई व म्हशीचे व्यवस्थापन केले.

२०१६ ला त्यांच्याकडे चार म्हशी होत्या. या वर्षी त्यांनी दोन एचएफ गाईंची खरेदी केली आहे. अशा सध्या त्यांच्या गोठ्यात एकूण १४ जनावरे आहेत. गोठ्यातील सर्व कामांमध्ये प्रफुल्ल यांनी पत्नी मेघा आणि आईवडिलांची मोलाची साथ मिळत आहे.

दुग्ध व्यवसाय सुरु करण्यापूर्वी त्याविषयी योग्य माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य माहितीच्या आधारे अभ्यासपूर्ण व्यवस्थापन केल्यास हा व्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरत असल्याचा श्री. परीट यांचा अनुभव आहे.

प्रशिक्षण ठरले दिशादर्शक

सुरुवातीच्या काळात गोठा व्यवस्थापनातील पुरेशी शास्त्रीय माहिती नसल्याने काही वेळा नुकसान झाले. त्यात अनेकांकडून मिळणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे भर पडली. या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी जनावरे आणि गोठा व्यवस्थापनातील शास्त्रीय माहिती घेण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी कृषी विज्ञान केंद्र तळसंदे येथे गोठा व्यवस्थापनाबाबत असलेला शासनमान्य डेअरी कोर्स पूर्ण केला.

केंद्रातील तज्ज्ञ सुधीर सुर्यगंध यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. परीट यांचा या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. प्रशिक्षणाच्या माध्यमातून जनावरांच्या आरोग्याबाबत अनेक छोटे-मोठे बारकावे समजून आले.

त्याचा त्यांना मोठा फायदा झाला.व्यवसायाची सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला जनावरांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न त्यांना भेडसावत होता. मात्र प्रशिक्षणानंतर त्यांना जनावरातील प्रत्येक आजाराविषयीचे बारकावे समजून आले. त्याविषयी शास्त्रीय माहिती मिळाली. त्यामुळे जनावरांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत झाली.

Milk Management
Takari Irrigation Scheme : पुणदीजवळ पोहोचले ताकारी योजनेचे पाणी

व्यवस्थापनातील बाबी

सध्या गोठ्यामध्ये एकूण १४ जनावरे आहेत. त्यामध्ये दहा एचएफ गाई, तीन म्हशी, एक खिल्लार गाय आहे. जनावरांसाठी मुक्त संचार आणि बंदिस्त असे दोन गोठे उभारण्यात आलेले आहेत. दूध देणाऱ्या जनावरांना बंदिस्त गोठ्यात तर दूध न देणाऱ्या जनावरांसाठी मुक्त संचार गोठ्यात ठेवले जाते. त्यामुळे स्वतंत्र व्यवस्थापन करणे शक्य झाल्याचे श्री. परीट सांगतात. दररोज पहाटे ५ वाजता गोठ्यातील कामांना सुरुवात होते. सुरुवातीला चारा दिला जातो.

वजनानुसार चारा व्यवस्थापन

साधारण ५०० किलो वजन असलेल्या गाई आणि म्हशीला सरासरी ३० किलो चारा दिला जातो. तर ५५० ते ६०० किलो वजन असणाऱ्या गाई, म्हशींना सरासरी ३५ किलो चारा दिला जातो. चाऱ्यामध्ये हत्ती घास, मका, ज्वारी याबरोबरच हरभऱ्याचे भुसकट यांचे मिश्रण करून दिले जाते.

दूध उत्पादनाच्या प्रमाणानुसार पशुखाद्याचे प्रमाण ठरवून त्यानुसार दिले जाते. प्रति १ लिटर दूध उत्पादन देणाऱ्या जनावरास ४०० ग्रॅम गोळी पेंड, एक किलो सरकी पेंड व अर्धा किलो गहू भुस्सा या प्रमाणात पशुखाद्य दिले जाते. दुधाच्या प्रमाणानुसार फक्त गोळी पेंड चे प्रमाण कमी जास्त होते. इतर पशुखाद्य आहे त्या प्रमाणात दिले जाते.

Milk Management
Crop Damage Compensation : ‘भुदरगड तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या’

दररोज शंभर लिटर दूध संकलन

श्री. परीट यांच्या गोठ्यातून दररोज १२० ते १५० दूध उत्पादन होते.

गाईच्या दुधाला सरासरी ३५ ते ४० रुपये तर म्हशीच्या दुधास ६५ ते ७० रुपये प्रति लिटर इतका दर मिळतो.

गोठ्यातील एक गाईपासून एका वेताला साडेचार हजार ते सहा हजार लिटर इतके दूध उत्पादन मिळते.

दूध काढण्यासाठी यंत्राचा वापर केला जातो.

दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती

श्री. परीट यांनी दुधापासून तयार होणाऱ्या विविध पदार्थाची प्रशिक्षणातून माहिती घेतली आहे. अद्याप पूर्ण क्षमतेने उत्पादन केले जात नाही. तरी सध्या आम्रखंड, श्रीखंड, पनीर अशा काही निवडक पदार्थांची ऑर्डरनुसार निर्मिती केली जाते.

सर्व पदार्थ गोठ्यातील दुधापासून तयार केले जातात. लग्न समारंभ व छोट्या कार्यक्रमासाठी ऑर्डरनुसार या पदार्थांची निर्मिती परीट कुटुंबीयांकडून केली जाते. भविष्यात दुग्धजन्य उत्पादनांचे व्यावसायिक पद्धतीने उत्पादन करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

- प्रफुल्ल परीट, ९९२३५५५००४ (शब्दांकन ः राजकुमार चौगुले)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com