Kathe Family and Chilli Farming Agrowon
यशोगाथा

Chilli Farming : व्यावसायिक ढोबळी मिरची उत्पादनातून साधली प्रगती

मुकुंद पिंगळे

Agriculture Success Story : गेली पाच दशके काठे कुटुंब प्रयोगशीलतेने शेती करत आहे. पूर्वी वडील दत्तू मारुती काठे व त्यांचे बंधू गंगाधर हे शेती करायचे. २५ वर्षांपूर्वी कुटुंब विभक्त झाल्यानंतर नव्या पिढीने पीक पद्धतीत बदल केले. बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे फलोत्पादनाची कास धरली. पूर्वी द्राक्ष लागवड होती.

मात्र वातावरणीय बदल व नैसर्गिक आपत्तीमुळे अशा वार्षिक पिकांऐवजी हंगामी भाजीपाला पिकांची वाट धरली. त्यात प्रवीण व दीपक ही दोन्ही मुले प्रयोगशीलतेने काम करत आहे. उन्हाळी हंगामात ढोबळी मिरची व खरीप हंगामात टोमॅटो लागवड असे वार्षिक नियोजन त्यांचे असते. त्यामध्ये गेल्या ६ वर्षांपासून ढोबळी मिरची उत्पादनातून त्यांनी ओळख निर्माण केली आहे.

नव्या पिकाकडे वळले

वार्षिक पिकाकडून हंगामी पिकाकडे शेती नेताना सुरुवातीला काहीसा त्रास झाला. कारण पीक पद्धती, व्यवस्थापन व नियोजन यात मोठा फरक होता. मात्र परिसरातील अभ्यासू शेतकरी व तज्ज्ञांची मदत घेत ढोबळी मिरचीचे अभ्यासपूर्ण पद्धतीने उत्पादन घेऊ लागले.

वाणांची निवड करताना वाढ, अधिक उत्पादनक्षमता, फळांचा गर्द हिरवा रंग, चार कप्पे असलेला आकार, चकाकी व लांब पल्ल्यासाठी टिकवणक्षमता या बाजू विचारात घेतात.

लागवडीपूर्वी भाजीपाला रोपवाटिकेत रोपांची आगाऊ मागणी नोंदवतात. त्यानुसार ४५ दिवसांच्या सशक्त व रोगमुक्त रोपांची पुनर्लागवड केली जाते. लागवडपूर्व नियोजन ते काढणीपश्‍चात विक्री व्यवस्थापन करताना ते दर्जेदार उत्पादनासोबत एकरी खर्च, उत्पादनातील व्यवहार्यता व बाजारपेठ या सर्व बाजू विचारात घेतात.

शेतीचा विस्तार

एकूण क्षेत्र : ९.५ एकर

त्यात तैवान पिंक पेरू : २ एकर, थॉमसन द्राक्ष : ३ एकर, ढोबळी मिरची : २.५ एकर, चारापिके : १ एकर.

कामकाजातील ठळक बाबी

लागवडपूर्व मशागतीनंतर सारे पाडून भरखते म्हणून कुजलेले शेणखत व सुपर फॉस्फेट, डीएपी, १०:२६:२६ यांचा वापर; माती परीक्षणानुसार खत नियोजनात योग्य ते बदल केले जातात.

ठिबक सिंचन, ३५ मायक्रॉन मल्चिंग पेपरवर लागवड. ढोबळी मिरची पिकाची काढणी झाल्यानंतर याच ठिकाणी दुबार पीक टोमॅटोचे पकी घेतले जाते. त्यामुळे खर्चात बचत.

चालू वर्षी २ टप्प्यांत लागवड. १९ फेब्रुवारी ला १५ हजार व १७ मार्च ला १३ हजार रोपाची लागवड.

फुलधारणा अवस्थेत संजीवके व कॅल्शिअम, झिंक, बोरॉनसारख्या अन्नद्रव्यांचा वापर करुन गुणवत्तापूर्ण उत्पादन घेण्यावर भर. आंतरमशागतीय कामाद्वारे खर्चात बचत.

वेळच्या वेळी झाडाची शाकीय वाढ मर्यादित ठेवली जाते. त्यामुळे फळांची संख्या वाढते. तसेच फवारणी कव्हरेज उत्तम मिळून फळांना चमक, आकार चांगला येतो.

किडीमध्ये लाल कोळीचा प्रादुर्भाव होतो. वेळीच सल्फर धुरळणीचा वापर केल्याने कमी खर्चात नियंत्रण होते.

एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा अवलंब. त्यात पांढरे चिकट सापळे, पिवळे चिकट सापळे, कामगंध सापळे यांचा वापर करतात.

मिरचीमध्ये मर रोगाच्या नियंत्रणासाठी लागवडीपासून ट्रायकोडर्मा व्हिरिडी, स्युडोमोनास फ्लुरोसन्स, बॅसिलस सबटीलीस आदी घटकांचा ठिबकद्वारे वापर केला जातो.

अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेसाठी स्फुरद विरघळवणाऱ्या जिवाणूंचा आणि पालाश उपलब्ध करून देणाऱ्या जैविक खतांचा वापर केला जातो.

पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी मायकोरायझाचा नियमितपणे वापर.

करंज, निम तेल व फिश ऑइलचा वापर करून रसशोषक किडींचे नियंत्रण.

फुलोरा अवस्था सुरू असताना जैविक व वनस्पतिजन्य कीडनाशकांचा वापर करून वेळीच रसशोषक किडींचा प्रतिबंध.

पावसाळ्यात काडी करपा नियंत्रणासाठी कॉपर धुरळणीचा पर्याय.

उत्पादन व बाजारपेठ

उत्पादन सुरू झाल्यानंतर दर चौथ्या दिवशी काढणी होते. प्रत्येक काढणीला एकरी सुमारे २०० क्रेट (प्रति क्रेट १० किलो) माल निघतो. काढणीनंतर शेतातच मालाची प्रतवारी केली जाते. या वर्षी मेपासून काढणी सुरू झाली. सुट्टीच्या काळात दर कमी होता. साधारण मेअखेरपासून दरात सुधारणा दिसून आली.

जुलैमध्ये मालाची आवक आणखी कमी होते. परिणामी, चांगले दर मिळत असल्याचे त्यांचा अनुभव आहे. प्रतवारी करून एकसारखी फळे बाजारात पाठवल्यास चांगले दर मिळतात. कारण हा माल व्यापारी पुढे अहमदाबाद, सुरत, बडोदा, मुंबई बाजारपेठेत पाठवतात.

‘एस के’ या नावाने शेतीमालाची विक्री

पूर्वी काठे कुटुंबीयांचे द्राक्ष हे मुख्य फळपीक होते. सध्या फक्त थॉमसन या वाणाचे ३ एकरांवर बाग आहे. पेरूमध्ये पिंक तैवान नव्याने लागवड केली आहे. प्रामख्याने ढोबळी मिरची व टॉमॅटो यावर त्यांचा भर असतो.

मात्र टोमॅटो पिकात जोखीम कमी असते, असा त्यांचा अनुभव आहे. ढोबळी मिरचीमध्ये रोग, झाडांची मर व फुलगळ अशी आव्हाने आहेत. पण काळजीपूर्वक व्यवस्थापनातून मार्ग काढला जातो.

कुटुंब विभक्त असले तरीही वडील दत्तू यांच्यासोबत चुलते गंगाधर यांचे मार्गदर्शन असते. शेतीकामांमध्ये चुलतभाऊ कुणाल हा मदतीला धावून येतो. या प्रयोगशील शेतीबद्दल नाशिक येथे झालेल्या एका प्रदर्शनात टोमॅटो व सिमला मिरची उत्पादक पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला आहे. त्यांच्या मुलांची नावे सार्थक व सक्षम यावरून ‘एस’ व आडनावाचा ‘के’ असा आद्याक्षरांचा ब्रॅण्ड तयार केला आहे.

या नावानेच द्राक्ष, ढोबळी मिरची या सारख्या शेतीमालाची विक्री होते. गुणवत्ता कायम राखल्याने व्यापारी वर्गात या नावाची ओळख निर्माण झाली आहे. बंधू प्रवीण हे प्रामुख्याने द्राक्ष बाग पाहतात. आई मंदाबाई, भावजय मनीषा व पत्नी आरती यांची शेतीकामात मोठी मदत होते. दीपक यांची मुले सार्थक (१२ वी) आणि सक्षम (७ वी) आहेत.

भावाची मुले रुचिका व रितेश हे शाळेत जातात. सर्व मुले सुट्टीवेळी आवडीने शेतीत मदत करतात. कारण शेती कुटुंबाच्या रक्तात भिनली आहे. फायदा, नुकसान चालूच असते, पण आमचे कुटुंब एकदिलाने प्रत्येक समस्येवर सकारात्मक मार्ग शोधते. शेतीसाठी प्रा. तुषार उगले यांचे तांत्रिक मार्गदर्शन मिळत असल्याचे दीपक सांगतात.

वर्ष एकरी उत्पादन (क्रेट १० किलो) दराची स्थिती (रुपये प्रति क्रेट)

किमान कमाल सरासरी

२०२१ ४,००० २०० ४५० २७५

२०२२ ३,०००(पावसाचा फटका बसल्याने घट) ३० ७० ४५(कोरोना काळ)

२०२३ ४,५०० ७० ५०० २५०

(शेडनेटसाठीचा भांडवली खर्च वगळता उत्पादन खर्च एकरी ः दोन लाख रुपये.)

दीपक काठे, ९९२२६२६६७४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT