Chilli Crop Farming : दुष्काळाचे आव्हान समजले; मिरची पीक यशस्वी केले

Article by Chandrakant Jadhav : कोठली (ता. जि. नंदुरबार) येथील सागर शांतिलाल पाटील यांनी ज्ञान, अभ्यासातून शेतीत सुधारणा घडविल्या. दुष्काळाचे आव्हान जाणून सिंचन व्यवस्था बळकट केली. बाजारपेठेतील मागणी ओळखून निर्यातक्षम दर्जाचे उत्पादन घेत मिरची या मुख्य पिकात ‘मास्टरी’ संपादन केली.
Sagar Patil
Sagar PatilAgrowon
Published on
Updated on

Success Story : नंदुरबार शहरापासून सुमारे १२ किलोमीटरवर असलेले कोठली गाव मिरची उत्पादनात आघाडीवर आहे. येथील शांतिलाल पाटील यांची ३५ एकर शेती आहे. ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ विषयातून पदविका घेतलेले त्यांचे पुत्र सागर सध्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीची जबाबदारी सांभाळतात. शेतीतील ज्ञान वाढावे, त्याचा उपयोग व्हावा यासाठी कृषी विषयातील पदवीही घेतली.

मिळविली पाण्याची शाश्‍वती

पूर्वी पाणीटंचाईग्रस्त परिसर म्हणून कोठली गावाची ओळख होती. सन २०१८ ते सन २०२० या दरम्यान दुष्काळात विहिरी आटल्या. सागर यांचे पपई, मिरचीचे पीक हातचे गेले. त्या तीन वर्षांत ऑक्टोबरमध्येच विहिरींची पातळी घटली. गावशिवारात तीन नाले आहेत. पाणीटंचाईवर शाश्‍वत उपाय शोधण्यासाठी सरकारी अनुदान व मदतीची वाट न पाहता गावातील लोकांनी एकत्र येत नाला खोली रुंदीकरणाचे काम यशस्वी केले.

त्यासाठी ४० लाख रुपये लोकवर्गणीतून उभे केले. सुलवाडे (ता. शहादा) येथील स्वप्नील पाटील, रोहिदास पवार, पाणी फाउंडेशन व नाम फाउंडेशन यांनी त्यासाठी मदत केली. या कामांमुळे शिवारातले पाणी शिवारातच मुरू लागले. पुढील तीन वर्षे चांगला पाऊस झाला. यंदा पाऊसमान कमी होते. परंतु जो काही पाऊस पडला तो जिरवण्यात आला. आज त्याचा ग्रामस्थांना फायदा होत आहे.

Sagar Patil
Medicinal Plants : शेतकऱ्यांनी टिकवलेय औषधी पानपिंपळीचे अस्तित्व

मिरचीची प्रयोगशील शेती

सन २०१५ मध्ये शेतीची सूत्रे सागर यांनी हाती घेतली. त्यानंतर गुजरातमधील मिरची उत्पादक- निर्यातदार योगेश पटेल यांच्या मार्गदर्शनातून सुधारणा करण्यास सुरुवात केली. दरवर्षी १० ते १२ एकर क्षेत्र मिरचीखाली असते. दुष्काळी स्थितीची जाणीव व संकटे लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच कमी पाण्यात उत्पादनाचा चंग बांधला. बहुतेक सर्व पिकांची लागवड प्लॅस्टिक मल्चिंगवर असते.

त्यातून पाण्याची किमान ५० टक्के बचत होते. सागर यांचा ८ ते १० मिरची उत्पादकांचा गट आहे. त्या माध्यमातून मल्चिंग पेपर व निविष्ठा कमी दरांत उपलब्ध करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पाच बाय सव्वा फूट अंतरावर गादीवाफा व मल्चिंग तंत्राधारे जूनच्या दरम्यान लागवड होते. हलकी, पाण्याचा निचरा करणारी जमीन निवडण्यात येते. अशी जमीन व त्यात पाण्याचा काटेकोर वापर यामुळे मर व अन्य बुरशीजन्य समस्या कमी येत असल्याचा सागर यांचा अनुभव आहे.

वाणनिवडीचा फायदा

बाजारात मागणी असलेल्या निर्यातक्षम, तीन इंची लांब, मध्यम, तिखट, चकाकी व आकर्षक रंग असलेल्या वाणाची निवड होते. गुजरात राज्यातील तापी जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून या मिरचीची आखाती देशांत निर्यात होते. त्यास प्रचलित दरांपेक्षा किलोमागे १५ ते २० रुपये अधिक दर तेजीच्या काळात मिळतो. या व्यापाऱ्यांच्या संपर्कात सागर नेहमी असतात.

Sagar Patil
Success Story : भाजीपाला,शेळीपालनातून आर्थिक समृद्धी

उत्पादन, दर व उत्पन्न

ऑगस्ट-सप्टेंबरच्या काळात फळहंगाम सुरू होऊन तो डिसेंबरपर्यंत चालतो. किमान १० एकर क्षेत्र असल्याने दर १५ दिवसांसाठी ६० मजुरांची व्यवस्था करावी लागते. जानेवारीनंतर लाल मिरचीचे उत्पादन घेण्यात येते. एकरी १७० ते १९० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. त्यसाठी उत्पादन खर्च दीड लाख रुपये येतो.

हिरव्या मिरचीस निर्यातीसाठी प्रति किलो ४० ते ४५ रुपये तर स्थानिक बाजारासाठी २० ते २२ रुपये दर मिळतो. लाल मिरचीस ६० ते ६५ रुपये दर मिळतो. मिरची, कारले आदींसाठी जवळच्या गुजरात, तसेच सुरतच्या बाजारपेठेचाही सागर पर्याय ठेवतात. लाल मिरचीची विक्री नंदुरबारच्या प्रसिद्ध बाजारपेठेत होते.

ज्ञान, अभ्यास व नियोजनातून प्रगती

सागर यांनी कोळदा (ता .नंदुरबार) येथील कृषी विज्ञान केंद्र तसेच अन्य तज्ज्ञांच्या संपर्कात राहून ज्ञान व अभ्यासातून शेतीत प्रगती साधली आहे. मिरची पिकातील नावीन्य, जोखीम, बाजारपेठा, बदल यांचा अभ्यास करण्यासाठी नाशिक, नंदुरबार, गुजरातमधील तापी जिल्ह्यात ते सतत दौरे करतात. सर्व ताळेबंद व नोंदी सातत्याने ठेवतात. त्यातूनच आर्थिक नियोजन सुकर होऊन नफ्याचे प्रमाण वाढवणे शक्य होते.

मिरचीच्या जोडीला केळी, टोमॅटो, कारली, पपईची शेतीही होते. दिल्ली, शहादा येथील खरेदीदारांशी संपर्क वाढवून बाजारपेठा हस्तगत करण्याचा प्रयत्न केला आहे. जमीन सुपीकतेवर भर आहे. सर्व पिकांचे अवशेष जमिनीत गाडण्यात येतात. तीन कूपनलिका, एक विहीर, मोठा ट्रॅक्टर व चार बारमाही मजूर अशी यंत्रणा आहे. सन २०१९ मध्ये कूपनलिकेला मुबलक पाणी उपलब्ध झाले. त्यानंतर १०० टक्के क्षेत्र ओलिताखाली आणले. सागर व गटातील शेतकऱ्यांनी मिळून समसिद्धी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली आहे. त्या माध्यमातून गावातच मिरची प्रक्रिया प्रकल्प करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. सागर कंपनीचे अध्यक्ष आहेत.

सागर पाटील ८८८८१९८८४५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com