Chilli Crop Disease : मिरची पिकातील ‘ॲन्थ्रॅकनोज’

Anthracnose Crop Disease : मिरची पिकामध्ये मररोग, ॲन्थ्रॅकनोज, सरकोस्पोरा आणि जिवाणूजन्य या महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
Chilli Crop Disease
Chilli Crop DiseaseAgrowon

राहुल वडघुले

Anthracnose in chilli crop : मिरची पिकामध्ये मररोग, ॲन्थ्रॅकनोज, सरकोस्पोरा आणि जिवाणूजन्य या महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यापैकीच ॲन्थ्रकनोज हा महत्त्वाचा रोग आहे. हा रोग प्रामुख्याने पाने, पिकलेली फळे आणि फांद्यांवर येतो. यामुळे पाने, फळे व फांद्यावर परिणाम होतो. फळांचे प्रत्यक्ष नुकसान होत असल्याने उत्पादनात घट येते. या रोगाविषयी आजच्या लेखामध्ये माहिती घेऊ.

या रोगाचा नमुना भाऊसाहेबनगर (ता. निफाड, जि. नाशिक) येथून मिळाला होता. डोळ्यांना दिसणारी लक्षणे व सूक्ष्मदर्शकाखाली नमुना तपासणी केली असता सदर रोग हा ‘ॲन्थ्रॅकनोज’ असल्याचे स्पष्ट झाले. परंतु पाने व फळांवर वेगळ्यावेगळ्या प्रजाती आढळून आल्या.

रोगाची माहिती

रोगाचे नाव : चिली ॲन्थ्रॅकनोज

रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव ः कोलेटोट्रीकम कॅपसिकी (Colletotrichum capsici) किंवा कोलेटोट्रीकम ग्लोईओस्पोरीऑईड्स (Colletotrichum gloeosporioides) असे आहे. या दोन्ही प्रजातीचे बीजाणू वेगळ्या प्रकारचे दिसतात. तसेच अन्य प्रकारच्या कोलेट्रोटीकम स्पे. प्रादुर्भाव दिसतो.

आढळ : सर्व मिरची उत्पादक देशांमध्ये आढळ.

नुकसान : या रोगामुळे मिरची पिकाचे ५० ते १०० टक्क्यांपर्यंत नुकसान होते.

यजमान पिके ः या बुरशीचा प्रादुर्भाव जवळपास १२१ प्रकारच्या वनस्पतींवर दिसून येतो. यामध्ये मिरची, टोमॅटो, बटाटा, कांदा, कपाशी, झेंडू, नागलीची पाने, चवळी, आले, गवार इत्यादी.

Chilli Crop Disease
Chilli Crop Farming : दुष्काळाचे आव्हान समजले; मिरची पीक यशस्वी केले

लक्षणे

या रोगाची लक्षणे पाने, खोड, व फळांवर दिसून येतात. कोणत्याही अवस्थेत प्रादुर्भाव होतो.

नवीन रोपांवर रोगाची लक्षणे दिसून येतात. यामुळे रोपाची पहिली पाने रोगग्रस्त होऊन रोपमर होते.

फांद्यांवर ‘डायबॅक’ची लक्षणे दिसून पाने व फुले गळून फांद्या वाळतात. सुरुवातीला फांद्यांची टोके जळालेली दिसतात. नंतर पूर्ण फांदी वाळते.

पानांवर सुरुवातीला तुरळक तपकिरी रंगाचा लहान ठिपका दिसतो. हे ठिपके अर्धा ते १ सें.मी.पर्यंत वाढू शकतात. ठिपक्याच्या भाग राखाडी, तर कडा गर्द काळ्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात.

हिरव्या फळांवर देखील प्रादुर्भाव होतो. जोपर्यंत फळ पिकत नाही तोवर लक्षणे दिसत नाहीत. फळांवर गोलाकार वलये निर्माण होतात. याला Concentric Rings म्हणतात. मध्यभागी एक पांढरट ठिपका दिसतो. त्याभोवती वलये दिसतात.

वातावरणात आर्द्रता असेल तर गुलाबी किंवा भगव्या रंगाची बीजाणू दिसतात.

अनुकुल हवामान

रोगाचे बीजाणू शेतातील जुने पीक अवशेष व इतर यजमान पिकांवर किंवा बियाण्यांवर जिवंत राहतात. बीजाणूमार्फत सुरुवातीला रोप मर होते.

उष्ण व आर्द्रतायुक्त वातावरणात पिकावर रोगाची निर्मिती होते. साधारण ८० ते ९० टक्के आर्द्रता व २० ते २७ अंश सेल्सिअस तापमानात पाने किंवा फळे ओली राहत असतील तर या रोगाची लागण होते.

दव, धुके असे वातावरण रोगास अत्यंत अनुकूल असते.

रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर रोगाचे बीजाणू, रोगग्रस्त फळे व पानांवर झपाट्याने तयार होतात. त्यांच्यामार्फत पुढे रोगाचा प्रसार होतो.

Chilli Crop Disease
Chilli Cultivation : धाड परिसरात शेकडो हेक्टरवर यंदा झाली मिरचीची लागवड

सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?

सूक्ष्मदर्शकाखाली आपण रोगाचे बीजाणू अतिशय स्पष्टपणे पाहून रोग निश्‍चिती करू शकतो. सूक्ष्मदर्शकाखाली कोलेटोट्रीकम ग्लोईओस्पोरायोडीस आणि कोलेटोट्रीकम कॅपसिकी या दोनही प्रजातींचे बीजाणू अतिशय स्पष्टपणे पाहू शकतो. या बिजाणूंना ‘कोनिडिया’ असे म्हणतात.

कोलेटोट्रीकम ग्लोईओस्पोरीऑइड्स : या प्रजातीचे ‘कोनिडिया’ रंगहीन, लंबगोलाकार असतात. त्यांचा टोकाचा भाग गोलाकार असतो.

कोलेटोट्रीकम कॅपसिकी : या प्रजातीचे कोनिडीया हे आकाराला विळ्यासारखे असतात. यामध्ये २ किंवा ३ पेशी भित्तीका दिसून येतात.

नियंत्रणाचे उपाय

लागवडीसाठी रोगमुक्त बियाण्यांचा वापर करावा.

बियाण्यास शिफारशीप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. दोन ओळींतील अंतर जास्त ठेवावे.

पीक फेरपालट करावी. दुसरे किंवा आधीचे पीक हे यजमान पिकांपैकी नसावे.

योग्यवेळी फळ काढणी पूर्ण करावी. पिकलेली फळे लवकर काढून नष्ट करावीत.

प्रादुर्भावग्रस्त पाने, फळे व इतर भाग त्वरित तोडून नष्ट करावेत.

शिफारशीत बुरशीनाशकांचा वापर करावा.

जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी. स्युडोमोनस बॅसिलस सारख्या

जैविक घटकांचा दर १५ ते २० दिवसांनी वापर करावा.

शिफारशीत बुरशीनाशके (लेबलक्लेम युक्त)

ॲझॉक्सिस्ट्रोबीन (१८.२ टक्के) अधिक डायफेनोकोनॅझोल (११.४ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी)

क्लोरोथॅलोनील ( ७५ टक्के डब्ल्यूपी)

कॉपर ऑक्सिक्लोराइड (५० टक्के डब्ल्यूपी)

डायफेनोकोनॅझोल (२५ टक्के इसी)

हेक्झाकोनॅझोल (७५ टक्के डब्ल्यूजी)

क्रिसॉक्सिम-मिथाईल (४४.३ टक्के एससी)

टेब्युकोनॅझोल (२५.९ टक्के इसी)

थायोफॅनेट मिथाईल (४१.७ टक्के एससी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com