Ashish Arunrao Sadafale Agrowon
यशोगाथा

Success Story : शाळेसह फळबागेमध्येही उपक्रमशीलता

Article by Gopal Hage : उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळख असलेले आशिष अरुणराव सदाफळे यांनी वडिलोपार्जित शेतीमध्ये संत्रा फळबागेसह विविध हंगामी पीकपद्धतीचा अवलंब करून वेगळेपण जपले आहे. आंतरपीक पद्धती, काटेकोर पाणी वापर, शेततळ्यात मत्स्यसंवर्धन आणि जमिनीची सुपीकता जपत, दर्जेदार संत्रा उत्पादनावर त्यांचा भर आहे.

 गोपाल हागे

Orange Orchard Management : बेलखेड (ता. तेल्हारा, जि.अकोला) येथील आशिष अरुणराव सदाफळे हे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक म्हणून तळेगाव बाजार येथे कार्यरत आहेत. बरीच वर्षे ते बुलडाणा जिल्ह्यामध्ये कार्यरत होते. दीड वर्षापूर्वी त्यांची अकोला जिल्ह्यात बदली झाली. सध्या ते कुटुंबीयांसह अकोला शहरात राहतात.

त्यांची वडिलोपार्जित १२ एकर शेती आहे. आठ वर्षांपूर्वी त्यांनी हिंगणी बुद्रुक शिवारातील वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये नागपुरी संत्र्यांची बाग लावली. दोन वर्षांपूर्वी त्यांनी नव्याने दोन एकरात संत्रा लागवड केली आहे. उर्वरित चार एकर क्षेत्रात हंगामानुसार सोयाबीन, तूर, गहू लागवड असते.

दैनंदिन शेतीच्या व्यवस्थापनासाठी त्यांच्याकडे एक मजूर कुटुंब आहे. त्याचबरोबरीने गरजेनुसार शेतीकामासाठी मजूर घेतले जातात. शाळेतील नोकरी सांभाळून त्यांनी फळबागेकडे चांगले लक्ष दिले आहे. प्रयोगशील शेतकरी, कृषी विभागातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी पिकाचे चांगले व्यवस्थापन ठेवले आहे. जुन्या संत्रा बागेतून त्यांना आतापर्यंत तीन बहर मिळाले आहेत. दरवर्षी व्यापारी बागेमध्ये संत्रा फळांची खरेदी करतात.

संत्रा बागेचे नियोजन :

हिंगणी बुद्रुक शिवारात आशिष सदाफळे यांची शेती आहे. शेतामध्ये काळ्या मातीचा स्तर आहे. आशिष यांनी योग्य व्यवस्थापनातून संत्रा बाग चांगल्या पद्धतीने उभी केली. जमीन काळी असल्याने काटेकोर पाणी व्यवस्थापनावर भर दिला आहे. जमीन पाणी धरून ठेवणारी असल्याने गरजे इतकेच पाणी झाडांना दिले जाते. १८ फूट बाय १८ फूट अंतरावर लागवड असलेल्या झाडांना दोन तासांच्या मध्यभागी सरीद्वारे पाणी दिले जाते.

तसेच ठिबक सिंचनातूनही गरजेइतके पाणी दिले जाते. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी पुरेसे शेणखत, लेंडी खत, सेंद्रिय खतांच्या वापरावर त्यांचा भर आहे. कीड, रोग नियंत्रणासाठी जैविक घटकांचा नियमितपणे वापर केला जातो. नवीन फळबागेत आंतरपीक घेण्यावर त्यांचा भर असतो.

आशिष यांनी दोन किलोमीटर अंतरावरून पाइपलाइन करून शेतीमध्ये पाणी आणले आहे. पाण्याचे काटेकोर व्यवस्थापन करीत त्यांनी चांगल्या प्रकारे बाग जगवली. नंतर हे पाणी कमी पडू लागल्याने बागेशेजारी ३४ मीटर बाय ३४ मीटर बाय २५ फूट खोल आकाराचे सामूहिक शेततळे खोदले. यामुळे सुमारे ८० लाख लिटर पाण्याची उपलब्धता झाली आहे. या शेततळ्यासाठी कृषी विभागाचे अनुदान मिळाले आहे.

तत्कालीन तालुका कृषी अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी शेततळे खोदाई, प्‍लॅस्टिक अस्तरीकरण करताना स्वतः हजर राहत काम करून घेतल्याने चांगल्या प्रकारे शेततळे तयार झाले आहे. आता शेततळ्यातील पाण्यावर बागेचे सिंचन केले जाते. दरवर्षी फळबागेचे योग्य व्यवस्थापन ठेवत दर्जेदार फळांचे उत्पादन ते घेतात. खर्च वजा जाता सरासरी एकरी दोन लाखांचे उत्पन्न त्यांना फळबागेतून मिळते.आशिष यांनी वडील अरुण यांच्या नावावरून संत्रा बागेला ‘अरुणोदय’ असे नाव दिले आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन :

शाळेत शिकविण्याचे कार्य जोपासत असतानाच स्वतःच्या शेतीतही आशिष सदाफळे यांनी प्रयोगशीलता जोपासली आहे. त्यांची प्रयोगशीलता लक्षात घेऊन तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर, गटविकास अधिकारी अमितकुमार मुंडे, तालुका कृषी अधिकारी गौरव राऊत, नायब तहसीलदार विकास राणे, पंचायत समिती कृषी अधिकारी भरतसिंग चव्हाण,

विद्युत अभियंता राठोड यांनी भेट देऊन संत्रा बाग आणि शेतीतील आंतरपीक पीक पद्धती, शेततळे तसेच इतर उपक्रमांची पाहणी केली आहे. तसेच प्रयोगशील शेतकरी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांचेही आशिष यांना सतत मार्गदर्शन मिळत असते.

शेततळ्यात तरंगता पंप :

शेततळ्यातील पाणी पिकांना देण्यासाठी विद्युत पंपाचा वापर केला जातो. मात्र काही वर्षांनी शेततळ्यात शेवाळ तयार होऊन अनेकदा पंपात अडकते. गाळ, काडीकचराही त्रासदायक बनतो. अशावेळी तळ्यात टाकलेला पंप हाताळणे अवघड होते. सदाफळे यांनी यावर उपाय म्हणून पंप तरंगता राहाण्यासाठी तराफा तयार केला आहे.

पाच अश्‍वशक्तीचा पंप तराफ्यामुळे पाण्यावर तरंगतो. पंपाची गरजेनुसार जागा बदलणे सोपे झाले आहे. तराफ्यासाठी लोखंडी फ्रेम तयार करून त्यावर २०० लिटर क्षमतेचे दोन रिकामे ड्रम बसविले आहेत. खालच्या बाजूने टायर बांधलेले आहे. त्यावर हा पंप बांधलेला आहे. तळ्यातील पाणी जसजसे कमी होईल तसा पंप खाली जातो. जमिनीलगत पंप राहात नसल्याने त्यात केरकचरा अडकत नाही. अवघ्या साडेचार हजारात त्यांनी हा तराफा तयार केला आहे.

शेततळ्यात मत्स्यपालन :
शेततळे खोदल्यामुळे शेतीसाठी सिंचनाची समस्या मिटली आहे. या शेततळ्यात सदाफळे यांनी गेल्या वर्षी सुमारे एक लाख रुपयांचे मत्स्योत्पादन घेतले. आता दुसरी बॅच लवकरच या तळ्यात सोडणार असल्याचे ते सांगतात. शेततळ्याचा फायदा लक्षात आल्याने या तळ्याचा आणखी विस्तार करण्याचे प्रयोजन त्यांनी केले आहे.

शिक्षणामध्येही प्रयोगशीलता :

आशिष सदाफळे हे उपक्रमशील शिक्षक म्हणून परिचित आहेत. ज्या शाळेत ते नोकरी करतात तेथे नवनवीन शैक्षणिक प्रयोग करीत असतात. मुलांमधील सर्जनशीलता ओळखून ते शिक्षण देतात. शाळेत संत महात्म्यांची जयंती-पुण्यतिथी, राष्ट्रीय सण-उत्सव राबवतात. शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे सामूहिक पद्धतीने वाढदिवस साजरे करण्याची परंपरा त्यांनी सुरू केली.

विद्यार्थ्यांचे लेखन, वाचन कौशल्य वाढीसाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. मोबाइलचा वापर शिक्षणासाठी कसा करता येऊ शकतो यावर त्यांचा भर आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना नियमितपणे वाचनाच्या सवयीसाठी मोबाइलवर ऑडिओ क्लिप तयार करून पाठवायला सांगितले जाते. त्यानंतर त्यापैकी दोघांकडून दुसऱ्या दिवशी प्रत्यक्ष वाचन करून घेतले जाते. व्याकरण, गणित, वाचन, निरीक्षण, भाषा अशा विविध पातळ्यांवर विद्यार्थी घडवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते.

संपर्क : आशिष सदाफळे, ९९७०२१६२९६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Hawaman Andaj : राज्यातील गारठा कायम; राज्यातील काही भागातील किमान तापमानात काहिशी वाढ

Maharashtra Assembly Election Result 2024 : राज्यात महायुती सुसाट; भाजप १२, शिंदेसेना ८ आणि अजित पवार गटाचे ८ उमेदवार विजयी

Jowar Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील ज्वारी पेरणीला गती

Goat Farming : आग्रा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात अकोल्यातील शेळी उत्पादकाचा सन्मान

Fadnavis, Girish Mahajan, Aditi Tatkare and Rane win : महाराष्ट्रात महायुतीची लाट; फडणवीस, मुंडे, गिरीश महाजन, अदिती तटकरेंसह राणे विजय

SCROLL FOR NEXT