Orange Processing
Orange Processing Agrowon

Orange Processing : मोर्शीत होणार संत्रा प्रक्रिया प्रकल्प

Orange Import Duty : बांगलादेशकडून आयात शुल्कात करण्यात आलेली वाढ त्यासोबतच प्रक्रिया उद्योगाचा अभाव यामुळे संत्रापट्ट्यात दरात घसरणीचे शुक्‍लकाष्ठ सुरूच आहे.
Published on

Amravati News : बांगलादेशकडून आयात शुल्कात करण्यात आलेली वाढ त्यासोबतच प्रक्रिया उद्योगाचा अभाव यामुळे संत्रापट्ट्यात दरात घसरणीचे शुक्‍लकाष्ठ सुरूच आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर संत्रा प्रक्रिया प्रकल्पाला गती देण्यात आली असून, येत्या तीन वर्षांत मोर्शी तालुक्‍यातील पार्डी गावात हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

विदर्भाचे मुख्य फळपीक असलेल्या संत्र्याखाली अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक एक लाख हेक्‍टर क्षेत्र आहे. १७ हजार शेतकऱ्यांकडे संत्रा बागा आहेत. त्यापासून दरवर्षी सरासरी सहा लाख टन संत्र्याचे उत्पादन होते. यातील २० ते २५ टक्‍के संत्रा फळे ही चुरी (लहान आकाराची) राहतात. याचे प्रमाण एकूण उत्पादनाच्या १.२५ लाख टन इतके राहते.

Orange Processing
Orange Processing : तासाला होणार पाच टन सत्र्यांवर प्रक्रिया

खरेदीदारांकडून याला अगदी किरकोळ दर दिला जातो. त्यामुळे अशी फळे विकण्याऐवजी ती फेकून दिली जातात. मात्र संत्रा फळांवर आधारित प्रक्रिया उद्योग असल्यास या फळांपासून देखील चांगला पैसा शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्यामुळे संत्रा उत्पादकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची ही मागणी आहे.

दरम्यान, २०२१ मध्ये महाविकास आघाडीकडून संत्र्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाला मान्यता देण्यात आली होती. मात्र त्यानंतरच्या राजकीय घडामोडीत हा प्रकल्प रखडला. त्यानंतर नव्या सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनीच या प्रकल्पाला गती दिली आहे. १५ फेब्रुवारी रोजी मुंबईत या विषयावर बैठक पार पडली.

Orange Processing
Orange Processing : संत्रा प्रक्रिया प्रकल्प गेमचेंजर ठरेल ः पवार

या प्रकल्पासाठी फिजिबिलिटी रिपोर्ट तयार करण्यात आला असून, ७२ कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पासाठी केली जाणार आहे. दरदिवशी सुमारे २०० टन संत्रा फळांवर प्रक्रिया होईल, अशी क्षमता या प्रकल्पाची आहे. तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देशित असले तरी दोन वर्षांतच त्याचे कार्यान्वयन होईल, अशी शक्‍यता श्रमजीवी शेतकरी उत्पादक कंपनीचे रमेश जिचकार यांनी व्यक्‍त केली.

...असे आहे लागवड क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

महाराष्ट्र ः दीड लाख

अमरावती ः एक लाख

नागपूर ः २५ हजार

उर्वरित महाराष्ट्र ः २५ हजार

विदर्भ ॲग्रोव्हिजन प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. त्याकरिता कंपनीची मोर्शी तालुक्‍यातील पार्डी गावातील जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
- देवेंद्र भुयार, आमदार, वरुड-मोर्शी मतदार संघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com