Agriculture Entrepreneurs : परभणी- वसमत राष्ट्रीय महामार्गावर पूर्णा नदीकाठी वसलेल्या रहाटी (ता. जि. परभणी) जवळील आलापूर पांढरी येथे तरुण अल्पभूधारक शेतकरी नारायण बाभणराव धस यांची तीन एकर शेती आहे.
धारणाक्षेत्र कमी असल्याने पर्यायी उत्पन्नाचा स्रोत म्हणून दोन दशकांपासून ते भारतीय आयुर्विमा महामंडळाचे प्रतिनिधी म्हणूनही कार्यरत आहेत. पंचक्रोशीत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. संघटन कौशल्यातून त्यांनी शेतकरी व महिला बचत गटाच्या माध्यमातून जाळे तयार केले आहे.
सन २०१० ते २०१५ या कालावधीत त्यांनी आलापूर पांढरी गावचे सरपंचपद भूषविले. या काळात लोकाभिमुख उपक्रम राबविले. फेब्रुवारी २०१४ मध्ये जळगाव येथे झालेल्या ‘ॲग्रोवन’ सरपंच महापरिषदेतही ते सहभागी झाले होते. त्यानंतर त्यांनी कृषी केंद्रित ग्रामविकासावर लक्ष केंद्रित केले.
गटाच्या माध्यमातून कृतिशीलता
सन २०१४ मध्ये धस यांच्या पुढाकारातून आत्मा अंतर्गत कृषी विकास शेतकरी बचत गटाची स्थापना झाली. दर महिन्याला प्रति सदस्य ५०० रुपये बचत होऊ लागली. गरजू सदस्यांना खते, बियाणे आदी निविष्ठा खरेदीसाठी एक टक्के दराने कर्जसुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे गावातील सावकारी बंद झाली.
कालांतराने गटाची उलाढाल ३५ ते ४० लाख रुपयांवर पोहोचली. गटाच्या माध्यमातून सोयाबीन, तूर, हरभरा यांचे बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात आले. ‘आत्मा’चे तत्कालीन प्रकल्प संचालक के. आर. सराफ यांच्या मार्गदर्शनातून गट बंद करून श्री. धस यांना शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याची दिशा मिळाली. त्या वेळी प्रत्येक सदस्याला सव्वा लाख रुपये लाभांश वाटप करण्यात आला.
कंपनी स्थापना, प्रशिक्षणातून वाटचाल
दहा शेतकरी व प्रत्येकी १० हजार रुपये भागभांडवलातून २४ ऑगस्ट, २०२० रोजी धनसंचय ॲग्रो प्रोड्यूसर्स नावाने शेतकरी कंपनीची रहाटी येथे स्थापन करण्यात आली. अध्यक्षपदी नारायण धस, तर सचिवपदी विनायक धस यांनी जबाबदारी स्वीकारली. संचालक मंडळात गोरखनाथ गाढवे, छाया भगवानराव धस, सोपान पाटील तर कंपनी प्रवर्तकांमध्ये निवृत्ती धस, घनश्याम धस, पंडित धस, अप्पाराव धस, जीवन पवार यांचा समावेश झाला.
सुमारे ११ गावांतील मिळून चौदाशे दहा शेतकरी कंपनीचे सभासद आहेत. सध्या भागभांडवल १५ लाख रुपये आहे. धस यांच्यासह कंपनीच्या पाच संचालकांनी नाशिक येथील सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीत व्यवस्थापनाचे तर पुणे येथील वैकुंठभाई मेहता सहकार संस्थेत गोदाम व्यवस्थापन विषयावर प्रशिक्षण घेतले. इंदूर येथील सोयाबीन संशोधन संचालनालयातही संचालकांनी अलीकडेच प्रशिक्षण घेतले.
शेतीमाल खरेदी केंद्राची सुविधा
केंद्रशासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने महाएफपीसी अंतर्गत ‘धनसंचय’ कंपनीचे हमीभाव खरेदी केंद्र आहे. त्या माध्यमातून २०२१-२२ मध्ये साडेचौदा हजार क्विंटल तर २०२२-२३ मध्ये साडेपंधरा हजार क्विटंल हरभरा खरेदी करण्यात आला. यंदा तूर विक्रीसाठी १२०, तर हरभरा विक्रीसाठी ५०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.
या हमीभाव केंद्रामुळे परिसरातील शेतकऱ्यांना विक्रीची नजीकची सुविधा उपलब्ध झाली आहे. कंपनीचे सभासद तसेच परिसरातील गावांमधील शेतकऱ्यांकडून सोयाबीन, तूर, हरभरा यांची बाजारभावानुसार खरेदी होते. कटती घेतली जात नाही. रक्कम शेतकऱ्यांना रोखीने किंवा बँक खात्यावर अदा केली जाते. गंगाखेड येथील महाराष्ट्र ऑइल मिलसोबत केलेल्या करारानुसारही सोयाबीन खरेदी व त्याचा पुरवठा होतो.
तंत्रज्ञान प्रसार
तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे, आत्माचे विद्यमान प्रकल्प संचालक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे, ‘आत्मा’चे प्रमोद रेंगे, स्वाती घोडके, कृषी सहायक एस. ए. भालेराव, मित्र भूषण रेंगे यांचे मार्गदर्शन कंपनीला मिळते. त्यातून विविध गावांमध्ये उपक्रम राबविले जातात.
पाचशे शेतकऱ्यांकडे माती परीक्षण करून आरोग्य पत्रिका वितरित करण्यात आल्या आहेत. मेळावे, प्रशिक्षणे, शेतीशाळा, सोयाबीन, हरभरा, गहू आदींचे बीजोत्पादन कार्यक्रम कंपनीने घेतले आहेत. महिला बचत गटाच्या सदस्यांना सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले.
कंपनी राबवत असलेले ठळक उपक्रम
‘नाबार्ड’च्या सहकार्याने कोळप्यांचे वाटप.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे मार्गदर्शन. ड्रोनद्वारे फवारणी प्रात्यक्षिक.
डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत पाचशे शेतकऱ्यांकडे प्रत्येकी एक हेक्टरनुसार एकूण पाचशे हेक्टरवर सोयाबीन, तूर, हरभरा यांची नैसर्गिक शेती होणार.
सहा गावांमध्ये १० गटांची स्थापना. प्रत्येक गटामध्ये ५० शेतकरी.
कृषी निविष्ठा केंद्राची सुविधा. त्याद्वारे रास्त दरात बियाणे, खते, कीडनाशके, ठिबक- तुषार संच आदी साहित्याची उपलब्धता. दीडशे तुषार संचाची विक्री. सुमारे २० हेक्टरवर ठिबक सिंचन यंत्रणा कार्यान्वित.
‘स्मार्ट’ प्रकल्पातून दोन कोटींचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. त्या अंतर्गत ११ हजार चौरस फूट जागेत एकहजार ८०० टन क्षमतेचे गोदाम बांधले आहे. त्याशेजारी धान्य स्वच्छता, प्रतवारी केंद्राची उभारणी केली आहे.
ऊस रसवंती, शेतकरी ते ग्राहक फळे-भाजीपाला विक्री केंद्र.
अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा तसेच सदस्यांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव कंपनी करते.
मागील वर्षी कंपनीने एकूण उपक्रमांमधून साडेतीन कोटींची, त्या मागील वर्षी पावणेदोन कोटींची उलाढाल केली. यंदाच्या आर्थिक वर्षी दहा कोटी उलाढालीचे उद्दिष्ट ठेवले आहे.
नारायण धस ९४२१३८८५४५
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.