FPC Success Story : शेतकरी कंपनीने उभारली कोल्ड स्टोअरेज यंत्रणा

Pre-Cooling Units : सोलापूर जिल्ह्यातील उळे (ता. दक्षिण सोलापूर) येथील उळे शेतकरी उत्पादक कंपनीने प्रीकूलिंग, कोल्ड स्टोअरेज व पॅकेजिंग अशी काढणीपश्‍चात साखळी यंत्रणा उभारली आहे.
Cold Storage
Cold StorageAgrowon
Published on
Updated on

Post Harvesting Value Chain : सोलापूर-तुळजापूर महामार्गावर सोलापूरपासून सुमारे १२ किलोमीटरवर उळे (ता. दक्षिण सोलापूर) गाव आहे. उळे, कासेगाव, उळेवाडी परिसरात पूर्वीपासून द्राक्षाची शेती होते. मध्यम प्रकल्प असलेला हिप्परगा तलावाचा काठ येथील काही गावांना लाभला आहे. अर्थात तो मर्यादित आहे.

त्यामुळे पाण्याचा अन्य खात्रीचा स्रोत नसताना केवळ विहीर आणि बोअरच्या पाण्यावर या भागात शेती होते. त्यात द्राक्षाचे क्षेत्र लक्षणीय आहे. पाणीटंचाईमुळे क्षेत्रात घट झाली असली तरीही आजघडीला या भागात पाचशे एकरांवर द्राक्ष क्षेत्र टिकून आहे. सोलापूर बाजार समिती देखील १२ किलोमीटरवर असल्याने कांदा, भाजीपाला देखील या भागात होतो.

शेतकरी कंपनीची स्थापना

अप्पासाहेब धनके हे उळेतील प्रगतिशील शेतकरी आहेत. सामाजिक, राजकीय क्षेत्रातही त्यांचे कार्य आहे. पंचायत समितीचे दोन वेळा उपसभापती म्हणून पद त्यांनी भूषविले आहे. सहकारी बाळासाहेब शिंदे, लक्ष्मण माने, रतिलाल राठोड यांना एकत्र घेऊन त्यांनी २०१७ मध्ये उळे शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केली. त्या माध्यमातून खते, बियाणे, कीडनाशके आदी निविष्ठांची विक्री सुरू केली.

सन २००८ मध्ये वैयक्तिक पातळीवर प्रीकूलिंग-कोल्ड स्टोअरेज प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. त्या वेळी तो शक्य झाला नव्हता. मात्र शेतकरी कंपनीच्या माध्यमातून त्यास मूर्त स्वरूप देण्याचे ठरवले. परिसरातील शेतकऱ्यांची ती गरज देखील होती. कृषी विभागाच्या स्मार्ट प्रकल्पांतर्गत २०२१-२२ मध्ये प्रीकूलिंग-कोल्ड स्टोअरेज प्रकल्प देखील मिळाल्याने पुढे जाण्यासाठी बळ मिळाले. प्रकल्पाचे तत्कालीन संचालक मदन मुकणे यांचे सहकार्य लाभले.

कंपनीचे स्वरूप, कार्यपद्धती

दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर (सोलापूर), तुळजापूर, लोहारा (धाराशिव), औसा, निलंगा (लातूर), बार्शी अशा सुमारे पाच -सहा तालुक्यांत किंवा विभागात कंपनीने कार्यक्षेत्र निश्‍चित केले आहे. याच परिसरातील ११२३ शेतकरी हे कंपनीचे सभासद आहेत. सध्या कंपनी केवळ द्राक्ष पिकात कार्यरत आहे. मात्र येत्या काळात केळी व अन्य पिकांमध्येही उतरण्याचा कंपनीचा मानस आहे.

धनके यांनीच आपली स्वतःची एक एकर जागा कंपनीसाठी भाडेतत्त्वावर दिली आहे. येथे प्रत्येकी १२ टनांची तीन अशी एकूण ३६ टन क्षमता असलेली तीन प्रीकूलिंग युनिट्स, प्रत्येकी २५० टन क्षमतेची अशी एकूण एक हजार टन क्षमता असलेली तीन कोल्ड स्टोअरेज आहेत. प्रति दिन ५० टन क्षमता असलेले पॅक हाउस अशा सर्व सुविधा येथे उभारण्यात आली आहे. सुमारे साडेसहा कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून त्यातील बहुतांश रक्कम कर्जाऊ स्वरूपात व शेअर्स स्वरूपात उभारण्यात आली आहे.

Cold Storage
Agriculture Success Story : कुटुंबाची एकी, फुलवली बहुविध पीक पद्धती

शेतकरी- निर्यातदारांमधील दुवा

आज ही शेतकरी कंपनी शेतकरी आणि खरेदीदार किंवा निर्यातदार यांच्यातील दुवा म्हणून कार्यरत आहे. पूर्वी द्राक्ष किंवा अन्य फळे- भाज्या ठेवण्यासाठी कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था नसल्याने या भागात अगदी बोटावर मोजण्याइतपत खरेदीदार- व्यापारी यायचे. त्यामुळे बऱ्याचदा दर पाडून मागितले जायचे. शेतकरीही ते नाइलाजाने मान्य करीत. आता कंपनीची प्रीकूलिंग व कोल्ड स्टोअरेजची व्यवस्था निर्माण झाल्याने व्यापाऱ्यांना ताजा, दर्जेदार व मोठ्या प्रमाणात माल एकाच ठिकाणी मिळण्याची सोय झाली आहे.

कंपनीने व्यापारी थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आणून दिले. शेतकऱ्यांनाही या काढणी पश्‍चात तंत्रासाठी सांगली किंवा नाशिकला जाण्याची गरज उरलेली नाही. कंपनीचे अध्यक्ष धनके म्हणाले, की आता पाच ते सहा खरेदीदारांचे नेटवर्क आम्ही तयार केले आहे. त्यामुळे त्यांच्यामध्येही स्पर्धा निर्माण होऊन त्याचा फायदा म्हणून शेतकऱ्यांना किलोमागे चांगले दर मिळत आहे.

पूर्वी किलोला ५० ते ६० रुपये मिळणारा दर आता ९० रुपयांपासून ते ११० रुपयांपर्यंत मिळू लागला आहे. सन २०२२ मध्ये कंपनीच्या प्रकल्पाची उभारणी सुरू झाली. त्यात दोन वर्षे गेली. त्यानंतर मागील वर्षी म्हणजे २०२४ मध्ये कंपनीच्या तयार झालेल्या नेटवर्कमधून आखाती देशात सुमारे ८० कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली. यंदा जवळपास १२७ कंटेनरपर्यंत निर्यातीची मजल गेली.

Cold Storage
Agriculture Success Story: फळपिकांसह माती, पर्यावरणाचेही जपले आरोग्य

स्थानिकांना रोजगार

कंपनीने उभारलेल्या यंत्रणेसाठी शेतकऱ्यांना कोणतेही भाडेशुल्क द्यावे लागत नाही. तर प्रति किलो साडेपाच रुपये दराने व्यापाऱ्यांना हे शुल्क भरावे लागते. मुख्यतः शेतकरी कंपनीचा हाच व्यावसायिक नफा आहे. त्याशिवाय द्राक्षांची काढणी ते पॅकिंगपर्यंतच्या कामांसाठी लागणारे कुशल मजूरही कंपनीकडून व्यापाऱ्यांना पुरवले जातात. काढणी हंगामापासून ते विक्रीच्या टप्प्यापर्यंत तीन ते चार महिन्यांच्या काळात ५०० ते १००० मजुरांच्या हाताला दररोज काम मिळते.

मागील वर्षी आमची यंत्रणा कार्यरत होण्यापूर्वी द्राक्षांना किलोला ६८ रुपये दर सुरू होता. कोल्ड स्टोअरेजची यंत्रणा सुरू झाल्यानंतर पुढे पुढे हा दर किलोला ८५ रुपये ते १०० रुपयांवर पोचला. त्याचा द्राक्ष उत्पादकांना फायदा होऊ लागला आहे. येत्या काळात व्यापाऱ्यांचे नेटवर्क वाढवण्याचा प्रयत्न आहे. पुढील वर्षापासून स्वतःच द्राक्षखरेदी आणि निर्यातीमध्ये उतरण्याचा विचार आहे. द्राक्ष हंगामाशिवाय वर्षभर युनिटचा उपयोग कसा करून घेता येईल याचाही प्रयत्न असेल.
अप्पासाहेब धनके ९१६८९१९६९६ अध्यक्ष, उळे शेतकरी उत्पादक कंपनी
माझी आठ एकर द्राक्ष बाग आहे. निर्यातक्षम उत्पादन घेत असूनही मनासारखा दर मिळत नव्हता. काही व्यापाऱ्यांकडून अडवणूक होत होती. आता शेतकरी कंपनीच्या माध्यमातून ही समस्या दूर होऊन चांगले दर बांधावरच मिळायला सुरुवात झाली आहे.
वसिख अहमद मतीन काझी, द्राक्ष उत्पादक, काटी, ता. तुळजापूर, जि. धाराशिव
माझे ४० एकर द्राक्षक्षेत्र आहे. शेतकरी कंपनीमुळे आमच्या भागात चांगल्या खरेदीदार कंपन्या आल्या. त्यातून दरही चांगला मिळू लागला. यंदा सर्वाधिक म्हणजे किलोला १६१ रुपयांचा दर मला मिळाला.
-राजाराम प्रकाश जाधव, येळवट-किल्लारी, ता. औस-ा, जि. लातूर-

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com