Sunil Kolpe 'Milk ATM' Concept Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology : कोळपे यांनी राबविली ‘मिल्क एटीएम’ संकल्पना

Success Story of Farmer : कृषिपूरक म्हणून दुग्ध व्यवसाय करताना महागाव (जि. यवतमाळ) येथील सुनील कोळपे यांनी काळानुरुप आधुनिकतेची जोड दिली आहे. बॅंकेच्या ‘एटीएम’च्या धर्तीवर त्यांनी ‘मिल्क एटीएम’ ही संकल्पना राबवली असून, त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

विनोद इंगोले

'Milk ATM' Concept : सुनील कोळपे यांच्याकडे फुलसावंगी येथे २४ एकर शेती असून, त्यात सोयाबीन, ऊस, कापूस अशी पिके घेतली जातात. जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण व पोत कमी झाल्यामुळे या पिकांपासून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे त्यांचा लक्षात आले.

त्या बाबत चर्चा करताना रासायनिक खतांच्या जोडीला शेणखतांचा वापर करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून मिळाला. पण घरी मोजकीच जनावरे असल्याने २४ एकर शेतीला पुरेसे शेणखत उपलब्ध होत नव्हते.

सुरुवातीला अडीच लाखांचे शेणखत विकत घेऊन त्याचा वापर केला. मात्र अधिक विचार केला असता केवळ शेणखतासाठी इतका खर्च परवडणारा नसल्याचे लक्षात आले. त्याऐवजी दुधाळ जनावरे घेऊन पशुपालन केल्यास दूध आणि शेणखत असा दुहेरी फायदा मिळेल, असा विचार करून वर्षभरापूर्वी दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली.

व्यवसायाला सुरुवात...

सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथील डेअरी फार्ममधून सुनील यांनी तीन दिवसांचे ऑनलाइन प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणातून मिळालेली माहिती आणि जातिवंत जनावरांची उपलब्धता यानुसार त्यांनी घोडेगाव (जि. नगर) येथून सहा मुऱ्हा म्हशी खरेदी केल्या.

तसेच थेट हिस्सार (हरियाना) येथून दहा मुऱ्हा जातीच्या म्हशींची खरेदी केली. वाहतुकीसह प्रति म्हैस १ लाख ३१ हजार रुपये खर्च आला. एका म्हशींपासून प्रति दिन १० ते १२ लिटर दूध मिळते. हे दूध सुरुवातीला खासगी संकलन केंद्रावर देत असत.

...असे आहे शेड

जनावरांसाठी साडेपाच ते सहा लाख रुपये खर्चून ३३ बाय ६० फूट आकाराचा गोठा अनेक शास्त्रीय बाबी विचारात घेऊन उभारला आहे.

जनावरांना नियमित शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेसाठी खास वॉटर बाउल वापरले आहे. ते चंडीगड येथून ऑनलाइन मागवले आहेत.

चाऱ्याकरिता सिमेंटच्या गव्हाणी बांधून घेतल्या आहेत. त्यामुळे शास्त्रोक्‍त पद्धतीने गोठा उभारणीवर भर देण्यात आला आहे.

उन्हाळ्यात वातावरण थंड राहावे याकरिता गोठ्याच्या आत फॅन, कूलरची सोय केली आहे.

दूध काढण्यासाठी ‘डबल बकेट’ असलेल्या मिल्किंग मशिनचा वापर केला जातो.

गोठ्यातील जमिनीची रचना व उतार योग्य प्रकारे केलेला असल्याने शेण, मूत्र गोठ्याबाहेर सहजतेने काढता येते. स्वच्छतेकरिता फारसे श्रम करावे लागत नाहीत.

जनावरांच्या व्यवस्थापनासाठी परराज्यातील कुशल कामगारांची नियुक्‍ती केली आहे.

शेत आणि गोठ्याच्या परिसरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

चाऱ्याचे नियोजन

तीन एकर शेतीमध्ये मका, सुपर नेपियर, मेगा स्वीट या जातीच्या चाऱ्याची लागवड केली आहे. एका जनावराच्या चाऱ्यासाठी पाच गुंठे क्षेत्र असे प्रमाण ठेवले आहे.

दूध देण्याच्या क्षमतेनुसार जनावरांच्या खुराकामध्ये ओला व वाळलेला चाऱ्यासोबत मिनरल मिश्रण, कॅल्शिअम याचाही वापर केला जातो.

...असे आहे अर्थकारण

सुनील कोळपे यांच्याकडे एकूण १९ म्हशी आहेत. त्यातील आठ ते दहा म्हशी दुधामध्ये असतात. त्या पासून १०० ते १२० लिटर दूध मिळते. ७० रुपये दरानुसार प्रति दिन ७ हजार रुपयांचे उत्पन्न हाती येते. त्यातील साडेतीन हजार रुपये रोज पशुखाद्य, मजुरी व इतर बाबींवर खर्च होत असल्याचे सुनील कोळपे सांगतात.

दुधाची गुणवत्ता उत्तम (६.५ फॅट) असल्याने त्यांच्या दुधाला ग्राहकांकडून पसंती मिळत आहे. दुधासाठी ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता लवकरच आणखी दहा म्हशी खरेदी करण्याचे नियोजन असल्याचेही ते म्हणाले. शिल्लक दुधावर प्रक्रिया करून पनीर, दही, ताक, तूप असे पदार्थ तयार केले जातात. पनीर ४४० रु., क्रीम दही ८० रु., ताक २५ रुपये लिटर, तर तूप १००० रुपये प्रति किलोने विकले जाते. महागाव बाजार समितीत त्यांचा आडत्याचा व्यवसाय असल्याने आर्थिक बाजू भक्कम राहण्यासोबत ओळखीचाही फायदा होतो.

मिल्क एटीएमची साकारली संकल्पना

पुणे, नाशिक भागांत मिल्क एटीएम संकल्पना असल्याची माहिती त्यांना सामाजिक माध्यमातून मिळाली. असे एटीएम तयार करणाऱ्या उद्योजकाचा शोध घेऊन त्यांच्याकडून हे मशिन मागवले. १५० लिटर क्षमतेच्या संयंत्रासाठी २.५ लाख रुपये खर्च आला. महागाव येथे हे मशिन बसवले आहे. त्यात वरील बाजूला टाकी असून, त्याचे तापमान ४ अंश सेल्सिअसपर्यंत राखले जाते. त्यामुळे दूध खराब होत नाही. या यंत्राद्वारे रोखीने, स्मार्ट कार्ड आणि क्‍यूआर कोड याच्या वापर केल्यानंतर ग्राहक स्वतःच्या भांड्यामध्ये किंवा प्लॅस्टिक पिशवीमध्ये दूध घेऊ शकतात.

२०० रुपये भरून नोंदणी केलेल्या ग्राहकांना एटीएमसारखे कार्ड दिले जाते. ते ग्राहकाच्या नावे कार्यरत केल्यानंतर त्यात पैसे रिचार्ज करावे लागतात. मशिनवरच रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. सध्या त्यांच्या या कार्डचा वापर करणारे १३७ ग्राहक असून, ते प्रति दिन १०० ते १२० लिटर दुधाची खरेदी करतात. दूध एटीएम यंत्राच्या खरेदीवेळी कंपनीकडून १०० कार्ड मिळाले होते. आता आणखी कार्डची मागणी केली आहे. कार्डमध्ये असलेल्या चिपवर ग्राहकाची व त्याने खरेदी केलेल्या दुधाची नोंद होत राहते.

- सुनील कोळपे, ९८५००५२९९३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT