Success Story of Banana Production : धुळे जिल्ह्यात तरडी (ता. शिरपूर) हे गाव कापूस, भुईमूग, उन्हाळी बाजरी, ज्वारीसाठी ओळखले जाते. अलीकडे शिवारात केळीची शेती वाढली आहे. शिरपूरपासून २३ किलोमीटरवर तरडी हे अनेर धरणाच्या लाभक्षेत्रातील गाव आहे. शिवारात मोठी नदी नाही. परंतु लगतच उत्तरेला सातपुडा पर्वत असल्याने तेथून येणारे नाले, नद्यांची पात्रे आहेत.
जलसंधारणाची कामेही झाली आहेत. गावातील पद्माकर पाटील हे केळी व पपई पिकातील प्रगतिशील शेतकरी असे व्यक्तिमत्त्व आहे. ‘डी फार्मसी’ची पदविका घेतल्यानंतर त्यानंतर काही वर्षे त्यांनी मार्केटिंगची नोकरी केली. सन २०१६ मध्ये घरच्या वडिलधाऱ्या व्यक्तींनी त्यांच्यावर शेतीची जबाबदारी सोपविली.
त्या वेळी शेतीचा काहीच अनुभव किंवा माहिती पद्माकर यांना नव्हती. अशा वेळी सोपविलेली जबाबदारी यशस्वी करणे व शेती नफ्यात ठेवणे हे मोठे आव्हान त्यांच्यापुढे होते. अर्थात, वडील जगन्नाथ आणि बंधू संदीप व जितेंद्र यांची समर्थ साथ त्यांना मिळाली.
शेतीतील व्यवस्थापन
पद्माकर आज घरची ३० एकर काळी कसदार शेती सांभाळत आहेत. पपई व केळी ही मुख्य फळपिके आहेत. पाण्यासाठी तीन कूपनलिका आहेत. मध्यवर्ती पद्धतीने ठिबक यंत्रणा उभारली आहे. त्यासाठी देविदास अहिरे यांचे मार्गदर्शन होते. पपई घेताना पद्माकर यांनी हवामान, बाजारपेठ असा सर्व अभ्यास केला.
पपईचे १० एकरांपर्यंत क्षेत्र असते. तैवान ७८६ या वाणाची निवड केली जाते. एकरी ६०० ते ७०० रोपे असतात. जळगाव व घाडवेल (ता. चोपडा, जि. जळगाव) येथून रोपे आणतात. या वाणाला बाजारात मोठी मागणी असते. मात्र हा वाण संवेदनशील व विषाणूजन्य रोगांना बळी पडणारा आहे. ही जोखीम दूर करण्यासाठी तंत्रशुद्ध व्यवस्थापन केले जाते.
उष्णतेच्या वेळी ‘क्रॉप कव्हर’ लावण्यात येते. ठिबकमधून जिवामृताचा वापर होतो. अतिपावसात पीक खराब होत असल्याने हलक्या जमिनीत लागवड केली जाते. गादीवाफ्यामुळे अति पावसाची जोखीम दूर होते. लागवडीच्या क्षेत्राभोवती कापूस, भेंडी व वेलवर्गीय पिके शक्यतो घेतली जात नाहीत.
सुरुवातीला दरांचा लाभ
पपईचे एकरी ३५ ते ४० टन उत्पादन मिळते. एकरी उत्पादन ८० हजार रुपयांपर्यंत आहे. ऑक्टोबरच्या अखेरीस काढणीचे नियोजन सुरू होते. या काळात पपईचे दर चांगले व टिकून असतात. नोव्हेंबरमध्ये दिल्ली, राजस्थान येथील व्यापारी खरेदीसाठी दाखल होतात. फळाची गुणवत्ता असल्याने सुरुवातीपासून मागणी असते.
मागील तीन वर्षे सुरुवातीला किंवा नोव्हेंबरमध्ये जागेवर ८ ते १० रुपये प्रति किलोचा दर पद्माकर यांना मिळाला आहे. उत्तरेकडे थंडी वाढताच किंवा धुके येताच दर कमी होण्यास सुरवात होते. तरीही जानेवारी, फेब्रुवारीत दर सात रुपयांपर्यंत अनेकदा मिळाले आहेत. मार्चच्या काळात सात ते तीन रुपयांपर्यंत दर मिळतात.
पपई बाजाराचा लाभ
पपईसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा, तळोदा येथील बाजार प्रसिद्ध आहे. खानदेशातील पपई राजस्थान, दिल्ली व अन्य भागांत प्रसिद्ध असून, तेथील खरेदीदार नोव्हेंबर काळात धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शहादा, तळोदा व गुजरातमधील निझर भागात येतात.
नोव्हेंबर ते जानेवारी या काळात खानदेशात प्रति दिन सरासरी ९५ ट्रक (प्रति ट्रक १६ टन क्षमता) पपईची आवक सुरू असते. पपईला दिल्ली, राजस्थान, पंजाब, हरियाना या भागांत नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत मोठा उठाव असतो. या कालावधीत सर्वाधिक दर ऑक्टोबरअखेर ते नोव्हेंबरच्या पहिल्या सात ते १० दिवसांत मिळतात, असे बाजारपेठ विश्लेषकांचे मत आहे.
निर्यातक्षम केळीचे उत्पादन
पाटील यांच्या घरी पूर्वी केळीची शेती नव्हती. पद्माकर यांनी अभ्यासू वृत्तीने या पिकातही हातखंडा तयार केला आहे. सन २०१८ पासून ते ग्रॅंडनैन वाणाच्या निर्यातक्षम केळीचे सुमारे दहा एकरांत उत्पादन घेत आहेत. निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी ‘फ्रूटकेअर’ तंत्राचा अवलंब होतो.
निसवणीनंतर केळफुलात फुलकिडीची समस्या रोखण्यासाठी ‘बड इंजेक्शन’ दिले जाते. पूर्ण निसवणीनंतर केळफुलाच्या खालील बाजूला असलेले ‘फ्लोरेट’ काढले जातात. घडास ‘स्कर्टिंग बॅग’ लावण्यात येते. झाडांना वेगवेगळ्या रंगांचे ‘टॅगिंग’ ही केले जाते. त्यामुळे काढणीच्या वेळेसची कार्यवाही सुकर होते.
युरोपला निर्यात :
केळीचे एकरी ३५ टनांपर्यंत उत्पादन मिळते. नाशिक- मोहाडी येथील सह्याद्री या प्रसिद्ध शेतकरी कंपनीच्या माध्यमातून २०२१ मध्ये पद्माकर यांच्या केळीची युरोपात निर्यात झाली. याच कंपनीमार्फत आखाती देशांतही त्यांची केळी पोहोचली आहेत. पपईचे बेवड केळीसाठी अनुकूल मानले जाते. त्यामुळे या दोन पिकांची फेरपालट केली जाते. केळीला अलीकडील काळात प्रति किलो १७ ते १८ रुपये दर मिळाला आहे. मागील वर्षी हा दर २७ ते ३० रुपयांपर्यंत मिळाला होता.
ज्ञानवृद्धीतून झाला फायदा
पद्माकर यांनी कै. एम. डब्ल्यू. पाटील, केळीतज्ज्ञ के. बी. पाटील, ‘सह्याद्री फार्म्स’चे अध्यक्ष विलास शिंदे, सचिन तिडके, नितीन काळे, प्रवीण ठाकरे, प्रवीण पवार यांचे मार्गदर्शन घेतले. कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभागाशी संपर्क वाढविला. प्रशिक्षण घेतले. अनुभवी शेतकऱ्यांच्या शेतांना भेटी दिल्या. या सर्व प्रयत्नांमधून लागवडीपासून ते काढणी, काढणी पश्चात तंत्रज्ञान विषयापर्यंत ज्ञान अवगत केले.
पद्माकर पाटील ९३७१७२२१००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.