Agriculture Technology : शेतीला होईल उपग्रहांची लक्षणीय मदत

Satellite and Drones For Agriculture : या लेखामध्ये आपल्या जमिनीवर केल्या जाणाऱ्या शेतीला अवकाशातून फिरणारे उपग्रह आणि शेतावरून फिरणारे ड्रोन कसे उपयोगी पडू शकतील, याची माहिती घेऊ.
Agriculture Satellite
Agriculture Satellite Agrowon
Published on
Updated on

डॉ. सुनील गोरंटीवार

Benefits of Satellites and Drones for Agriculture : पारंपरिकपणे केली जाणारी सध्याची शेती आणि भविष्यातील शेती याबाबत आपल्याला अनेक गोष्टींचा विचार करावा लागणार आहे. वाढत चाललेल्या लोकसंख्येसाठी अधिक उत्पादन करण्यासाठी हवामान बदलामुळे उद्‌भवणाऱ्या समस्यांचा वेध घेत शेतीमध्ये योग्य ते बदल करावे लागणार आहेत.

मागील भागामध्ये आपण भविष्यातील शेती कशी असेल, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. या लेखामध्ये आपल्या जमिनीवर केल्या जाणाऱ्या शेतीला अवकाशातून फिरणारे उपग्रह आणि शेतावरून फिरणारे ड्रोन कसे उपयोगी पडू शकतील, याची माहिती घेऊ.

आपली शेती शाश्वतपणे कार्यक्षम, उत्पादनक्षम, किफायतशीर, हवामान लवचिक, पर्यावरणीय अनुकूल व सर्वसमावेशक करण्याची गरज सातत्याने व्यक्त होत आहे. त्यासाठी अन्य क्षेत्रांमध्ये सध्या वापरले जात असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतीमध्ये वापरण्यायोग्य बनविण्याची आवश्यकता आहे.

मागील लेखामध्ये माहिती तंत्रज्ञान, संवेदके, आंतरजाल (Internet), इंटरनेटद्वारे विविध उपकरणांची जोडणी (Internet of Things- IoT), हवेतून उडणारे मानव विरहित वाहन (Unmanned Aerial Vehicle- Drone ), यंत्रमानव (Robots), कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), संगणकीय प्रारूपे (Computer Program), संगणकीय निर्णय समर्थन प्रणाली (Decision Support System) इ. ची तोंडओळख करून घेतली. या लेखामध्ये अवकाशात भ्रमण करणारे उपग्रह व हवेत उडणारे ड्रोन यांच्या साह्याने अवकाशातून शेती करण्यासंदर्भात माहिती घेऊ.

Agriculture Satellite
Agriculture Technology : ट्रॅक्टर : शेती विकासातील अष्टपैलू यंत्र

‘अवकाशामध्ये शेती’ व ‘अवकाशातून शेती’ यामध्ये मूलभूत एक फरक आहे.

अवकाशामध्ये शेती करून अन्नधान्य निर्मिती करण्याचा प्रमुख उद्देश म्हणजे अवकाशयानामध्ये कित्येक महिने प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांच्या अन्नधान्याच्या गरजा भागविणे हा आहे. अवकाश यानातील मोजक्या व्यक्तींच्या आहाराची सोय इतकाच माफक उद्देश सध्यातरी आहे.

आपल्या जमिनीवर केल्या जाणाऱ्या शेतीमध्ये अवकाशातील विविध यंत्रणांचा कार्यक्षमपणे वापर करणे शक्य आहे. त्याला अवकाशातून शेती म्हणता येईल. लेखामध्ये दिलेल्या कल्पनाचित्रामध्ये आपल्या शेतीमध्ये अवकाशातील घटकांचा कशा प्रकारे वापर करता येईल, याचा अंदाज येऊ शकेल.

अवकाशातून शेतीच्या विविध कार्यांचे नियोजन, नियंत्रण व अंमलबजावणी करण्यासाठी सामान्यतः पुढील चार प्रणाली उपयोगी ठरतात.

अंतराळस्थित संसाधनांच्या साह्याने माहिती संग्रह प्रणाली (Data/Information Collection System) : या प्रणालीद्वारे शेतीतील विविध कार्ये पार पाडण्यासाठी आवश्यक माहिती उदा. शेताचे स्थान, पिकाचा प्रकार व परिस्थिती, हवामान, जमीन व मृदा इ. प्रत्यक्ष वेळेनुसार व स्थानानुसार माहिती गोळा केली जाते. एकदा नोंदणी केल्यानंतर ती नियमितपणे संकलित केली जाते.

माहिती आदान प्रदान प्रणाली (Data/Information Communication/Transmission System) : संकलित केलेल्या माहितीचे पृथ:क्करण करून त्याद्वारे निर्णय घेणे, निर्णयाची अंमलबजावणी करणे इ. साठी विविध प्रणालींमध्ये माहितीची देवाणघेवाण केली जाते.

माहिती विश्लेषण व निर्णय प्रक्रिया प्रणाली (Data Analytics and Decision-Making System) : संकलित केलेल्या माहितीचे संगणकीय प्रारूपाद्वारे पृथ:क्करण करणे, तसेच त्याआधारे निर्माण झालेल्या ज्ञान किंवा माहितीच्या साह्याने ‘संगणकीय निर्णय समर्थन प्रणाली’ चालवली जाते. त्याद्वारे शेतीतील

एखाद्या प्रक्रियेसंदर्भात विशिष्ट परिस्थितीमध्ये आवश्यक ते निर्णय घेण्याचे कार्य ही प्रणाली करते.

कार्य सक्रियकरण प्रणाली (Task Activation System) : निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयाची स्वायत्तपणे अंमलबजावणी करण्याचे कार्य या प्रणालीद्वारे केले जाते.

Agriculture Satellite
Agriculture Drone Scheme : ड्रोन तंत्रज्ञान योजनेस कमी प्रतिसाद

अंतराळ स्थित संसाधनांच्या साह्याने माहिती संग्रह प्रणाली

या प्रणालीमध्ये अवकाशात भ्रमण करणारे उपग्रह किंवा शेतीवरून फिरणारे ड्रोन्स व त्यावर स्थापित संसाधने उदा. उपकरणे, कॅमेरे व संवेदके यांचा अंतर्भाव होतो. कार्य व उद्दिष्ट यांच्या आधारे उपग्रहाचे विविध प्रकार आहेत. परंतु अवकाशातून करावयाच्या शेतीसाठी पुढे नमूद केलेले चार प्रकारचे उपग्रह महत्त्वाचे आहे.

दळणवळण उपग्रह (Communication Satellite) : या प्रकारच्या उपग्रहाद्वारे जमिनीवरील लांब अंतराचे, जमीन व अवकाश तसेच अवकाश व अवकाश यामधील दळणवळण म्हणजेच माहितीची देवाणघेवाण सक्षमपणे होते. या प्रकारच्या उपग्रहांद्वारे आंतरजाल (Internet), टेलिकम्युनिकेशन (Telecommunication) इ. सुविधा उपलब्ध होतात. या सुविधांद्वारे उपकरणे, मनुष्य, वस्तू व प्रणाली एकमेकांशी जोडून माहितीचे आदान प्रदान केले जाते.

या प्रकारच्या उपग्रहांच्या विविध सेवा व सुविधांमुळे आधुनिक शेती संदर्भात आवश्यक असणाऱ्या हवामान, जमीन, मृदा, पीक व पीक परिस्थिती, व्यवस्थापन प्रणाली इत्यादींच्या माहितीची देवाण-घेवाण केली जाते. भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारे (Indian Space Research Organisation- ISRO) प्रक्षेपित इन्सॅट (INSAT) व जीसॅट (GSAT) मालिकेचे उपग्रह या प्रकारामध्ये येतात.

नेव्हिगेशन उपग्रह (Navigation Satellite) : नेव्हिगेशन उपग्रहाद्वारे आपणास पृथ्वीवरील विविध स्थिर किंवा चलित वस्तूंची वेळ परत्वे किंवा वर्तमानातील सध्याच्या स्थळाबाबत (Position) अचूक माहिती मिळते. उदा. आपण अथवा आपल्या वाहनाचे नेमके स्थान. दोन वस्तूंच्या तुलनात्मक स्थळांच्या माहितीद्वारे आपणास अनेक गोष्टी साध्य होतात.

म्हणजे आपल्याला इच्छित ठिकाणी जायचे असल्यास सध्याच्या ठिकाणापासून अपेक्षित स्थळांचे अंतर व सध्याच्या वेगाने गेल्यास किती वेळ लागेल, ते समजू शकते. आपण पुढे जात जाऊ, त्याप्रमाणे ते कमी होत जाते.

आपल्या शेतामध्ये आपल्याला एखादा ड्रोन, यंत्रमानव किंवा स्वयंचलित यंत्र वापरून अपेक्षित क्रिया करावयाच्या आहेत, त्यावेळी या नेव्हिगेशन उपग्रहाद्वारे मिळालेली माहिती उपयुक्त ठरते. सध्या अमेरिकाद्वारा संचलित ‘वैश्विक स्थान निश्चितीकरण प्रणाली (जी.पी.एस.- GPS)’ चा उपयोग जागतिक पातळीवर मोठ्या प्रमाणात केला जातो. यामध्ये ३१ उपग्रहांचा समूह आहे.

सुदूर संवेदन उपग्रह (Remote Sensing Satellite) : या प्रकारच्या उपग्रहांद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे निरीक्षण करून या संदर्भात माहिती संकलित केली जाते. यासाठी वेगवेगळ्या संवेदकांचा वापर केला जातो.

उपग्रहाद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागाची (उदा. शेतजमीन, पीक, जलस्रोत इ.) माहिती संकलित केली जाते. त्या माहितीचे पृथ:क्करण करून शेतीसाठी अतिशय उपयुक्त ठरते. भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारे प्रक्षेपित केलेली आय.आर.एस. (IRS), CARTOSAT, RESOURCESAT रिसोर्ससेट या मालिकेमधील उपग्रह या प्रकारात येतात.

हवामान उपग्रह : या उपग्रहांद्वारे पृथ्वीच्या वातावरणाचे निरीक्षण व त्याचा अभ्यास केला जातो. या प्रकारच्या उपग्रहांवर वेगवेगळ्या प्रकारची उपकरणे स्थापित केली असतात. त्याद्वारे वर्तमान काळातील हवामान तसेच भविष्यातील हवामानाचा अंदाज वर्तविण्यात या प्रकारच्या उपग्रहाची भूमिका महत्त्वाची आहे.

आपली शेती ही प्रामुख्याने हवामानातील अनेक घटकांवर अवलंबून असते. तिचा मोठा परिणाम पिकांच्या उत्पादन प्रक्रियेमध्ये होत असतो. भारतीय अवकाश संशोधन संस्थेद्वारे प्रक्षेपित केलेली इन्सॅट (INSAT), जीसॅट (GSAT), मेघा-ट्रॉपिक्स (Megha-Tropiques) या मालिकेमधील उपग्रह या प्रकारात येतात.

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर येथे संशोधन संचालक म्हणून कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com