Paddy Harvesting Agrowon
टेक्नोवन

Paddy Harvesting Implements : भात कापणी, काढणीपश्‍चात कामांसाठी यंत्रे

Paddy Harvesting : भात पिकामध्ये रोवणी आणि कापणी या दोन कामांसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागते. सध्या मजुरांची उपलब्धता होत नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अशा वेळी कापणी व काढणीपश्‍चात विविध कामांसाठीची यंत्रे उपयुक्त ठरू शकतात.

Team Agrowon

ज्ञानेश्‍वर ताथोड, डॉ. संदीप कऱ्हाळे

Paddy Cutting : १) स्वयंचलित भात कापणी यंत्र (रिपर) - भाताची (धान) कापणी रिपर या यंत्राद्वारे व्यवस्थितपणे जमिनीलगत करता येते. कापलेले पीक एक सरळ रेषेत यंत्राच्या उजव्या बाजूला अंथरले जाते. अशा प्रकारे सरळ पट्ट्यात अंथरलेल्या पिकाच्या पेंढ्या बांधण्याचे काम मजुरांकरवी सहजपणे शक्य होते. सुलभपणे होऊ शकते. हे ५ ते ६ एचपी क्षमतेच्या इंजिनवर चालणारे रिपर बाजारात उपलब्ध आहेत.

यंत्राची वैशिष्ट्ये ः
१) भात सरळ रेषेत पेरले नसेल किंवा फोकून पेरलेले असले तरीही व्यवस्थित कापणी करता येते.
२) सव्वा ते दीड हेक्‍टर क्षेत्र एका दिवसात कापून होते.
३) कापणीच्या खर्चात, श्रमात आणि वेळेचीही बचत होते.
४) या यंत्राने भात कापणी केल्यास पिकाच्या नुकसानीचे प्रमाण पारंपरिक पद्धतीच्या तुलनेमध्ये अत्यंत कमी राहते.

२) स्वयंचलित कापणी व बांधणी यंत्र (रिपर बाइंडर)
भात, गहू, तेलबिया आणि कडधान्य पिकांच्या कापणी आणि गठ्ठे (बंडल) तयार करण्यासाठी हे यंत्र वापर करतात. सदर यंत्र ९ किलोवॉट डिझेल इंजिनद्वारे स्वयंचलित पद्धतीने चालवले जाते. या यंत्राला एकूण ४ चाके असून, पुढील दोन ड्रायव्हिंग चाकांसाठी मोठे टायर वापरले आहेत, तर मागील बाजूस ऑटोमोटिव्ह टायर असलेली दोन स्टिअरिंग व्हील आहेत.
कापणी प्रणालीमध्ये क्रॉप रो डिव्हायडर, स्टार व्हील, कटर बार, उभ्या कन्व्हेअर बेल्ट आणि वायर स्प्रिंग्स यांचा समावेश होतो.

प्रभावी कटर बारची रुंदी १.२ मीटर आहे. क्रॉप रो डिव्हायडर उभ्या पिकात कापल्यानंतर किंचित उचलण्यात मदत करतात आणि कन्व्हेअर बेल्टद्वारे पोहोचतात. सर्व कापलेले पीक मशिनच्या मध्यभागी पोहोचवतात. एका प्लॅटफॉर्मवर परत जातात, जिथे ते प्रत्येकी ५ किलोचे बंडल बनवतात. शेवटी, पीक मागील बाजूस जमिनीवर सोडले जाते. रिपर बाइंडरची कार्य क्षमता ०.३ ते ०.४ हेक्टर प्रति तास आहे.

३) ट्रॅक्टरचलित कापणी यंत्र
ट्रॅक्टर पीटीओ ऑपरेटेड अशा या यंत्रामध्ये १.५ मीटर लांबीचा कटर बारला ड्राइव्ह दिलेला असतो. ट्रॅक्टरचलित कापणी यंत्रामध्ये एकतर कटर बार ट्रॅक्टरच्या बाजूने असतो किंवा ट्रॅक्टरच्या समोर असतो. त्यावरून त्याचे दोन प्रकार पडतात.

कापलेले पीक एक सरळ रेषेत यंत्राच्या उजव्या बाजूला अंथरले जाते. अशा प्रकारे सरळ पट्ट्यात अंथरलेल्या पिकाच्या पेंढ्या बांधण्याचे काम मजुरांकरवी सहजपणे करता येते. ८५ टक्क्यांच्या प्रत्यक्ष कार्यक्षमतेसह एका दिवसात सुमारे ३ हेक्टर कापणी शक्य होते.

४) कम्बाइन हार्वेस्टर
कम्बाइन हार्वेस्टर हे यंत्र भात, गहू, हरभरा, सोयाबीन, सूर्यफूल, मूग अशा अनेक पिकांच्या कापणी व मळणीसाठी वापरले जात आहेत. या यंत्रामुळे श्रम, वेळ आणि खर्चात मोठी बचत होते. बाजारामध्ये विविध कंपन्यांच्या हार्वेस्टर मशिन उपलब्ध आहेत. त्यात २ ते ६ मीटर लांबीचे कटर बार असतात. त्याला जोडलेला मशिन रील हे उभे पीक यंत्रातील कापण्याच्या कटरबारपर्यंत पोहोचविण्याचे कम करतो.

कटर बारला जोडलेल्या धारदार ब्लेड्समुळे पिकाची कापणी होते. पिकाच्या ओंब्या, धान्य हे कन्व्हेअर बेल्टद्वारे रेसिंग युनिटपर्यंत पोहोचवले जाते.

तिथे ड्रेसिंग ड्रम आणि काँक्रीट क्लीअरन्समध्ये रगडले जाऊन वेगळे केले जाते. हे मळणीचे काम पूर्ण झाल्यानंतर हलका भुस्सा वेगळा करण्याची प्रक्रिया (विनोइंग) होते. धान्यासाठी पुढे चाळण्या जोडलेल्या असतात. त्यातून धान्य साफ केले जाते. तिथे बसविलेल्या स्टोन ट्रॅप युनिटमध्ये धान्यात आलेले माती, दगड, बारीक खडे वेगळे केले जातात.


कम्बाईन हार्वेस्टर मशिनचे सामान्यतः तीन प्रकार पडतात.
अ) ट्रॅक्‍टरचलित कम्बाइन हार्वेस्टर ः या प्रकारच्या कम्बाइन हार्वेस्टर मशिनला ट्रॅक्टरसोबत जोडून चालवले जाते. या हार्वेस्टरला ट्रॅक्टरच्या पीटीओद्वारे ऊर्जा दिली जाते.

ब) स्वयंचलित कम्बाइन हार्वेस्टर ः या प्रकारच्या हार्वेस्टरमध्ये स्वतःचे एक वेगळे इंजिन बसवलेले असून, त्याद्वारे हार्वेस्टरमधील सर्व यंत्रणांना ऊर्जा पुरवली जाते.

क) ट्रॅक टाइप कम्बाइन हार्वेस्टर्स ः यात चाकांऐवजी ट्रॅक बसवलेले असतात. ही उच्च ग्राउंड क्लीअरन्स, टिकाऊ ड्रायव्हर्स, हेवी-ड्यूटी चॅसिस आणि पंप असलेली एक टिकाऊ रचना आहे. चाकांवर आधारित हार्वेस्टर चालू न शकणाऱ्या, पाणथळ किंवा अत्यंत चढ-उताराच्या शेतांमध्येही ते उपयुक्त ठरतात. विशेषतः भातासारख्या पिकामध्ये अनेक वेळा शेवटपर्यंत पाणी असू शकते, अशा ठिकाणी ट्रॅक टाइप कम्बाइन हार्वेस्टर उपयोगी ठरतात.

५) पिकाचे अवशेष जमा करण्याचे यंत्र (रेकर)
बहुतांश शेतकरी हे पिकाच्या कापणीसाठी कम्बाइन हार्वेस्टर यंत्राचा वापर करू लागले आहे. या यंत्राने कापणी केल्यानंतर पिकांचे अवशेष शेतात विखुरले जातात. गहू, भात, ऊस आणि मका व इ. पिकाचे अवशेष किंवा तणीस व्यवस्थितरीत्या एकत्रित सरीमध्ये आणण्यासाठी रेकर यंत्र विकसित केले आहे. हे ट्रॅक्टरचलित यंत्र २५ एचपी व त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या ट्रॅक्टरद्वारे चालवले जातात. गोलाकार असलेल्या या यंत्रावर दातऱ्या असतात.

२० फूट परिसरातील पीक अवशेष हे ४ ते ५ फूट सरीमध्ये जमा केले जाते. त्याची किंमत दोन लाख असून, प्रति तास सुमारे ६ एकर पिकांचे अवशेष सरीमध्ये गोळा करते. त्यानंतर चौरस पेंढ्या बांधणाऱ्या बेलर (Square Baler) यंत्राने दाबून त्याचे चौकोनी गठ्ठे बांधले जातात. चौकोनी गठ्ठ्यांमुळे कमी जागेमध्ये अधिक अवशेष साठवता येतात. किंवा वाहतूक सोपी होते.

६) चौरस पेंढी बांधणारे यंत्र (बेलर)
पेंढ्या बांधणी यंत्राद्वारे लहान आणि मोठे चौरस आकारात (१५ ते २५ किलो ) पीक अवशेषाच्या पेंढ्या तयार करता येतात. हे यंत्र ट्रॅक्टर चालत असून, हिचिंग पॅाइंट हा ट्रॅक्टरला व मशिनचा शाफ्ट हा ट्रॅक्टर पीटीओला जोडलेला असतो. शेतात यंत्र चालताना जमिनीवर पडलेल्या अवशेषाचे संकलन दातेऱ्यांच्या साह्याने कॉम्प्रेसर चेंबरकडे पाठवले जाते.

चेंबरमध्ये ७ इंची ६ ते ८ पट्टे (बेल्ट) लावलेले असतात. या मध्ये ६०० ते ८०० प्रति मिनिट वेगाने पीक अवशेषावर दाब निर्माण केला जातो. त्यातून पीक अवशेष चौरस पेंढ्याच्या स्वरूपात बांधले जातात. ३० ते ४५ सेकंद इतक्या कालावधीमध्ये सुमारे २५ किलो वजनाची पेंढी तयार होऊन मागे टाकली जाते. प्रति तासाला २.५ एकरातील पीक अवशेषापासून ९० ते १०० पेंढ्या तयार करणाऱ्या यंत्राची किंमत ९ लाख रुपयांपर्यंत आहे.

वैशिष्ट्ये ः
१) या यंत्राने गहू, भात, ऊस, कापूस, ज्वारी आणि मका अशा अनेक पिकांच्या अवशेषांच्या पेंढ्या बांधल्या जातात.
२) या पेंढ्यांचा उपयोग जनावराचा चारा, बायोमास, पेपर किंवा कोळसा बनविण्यासाठी होतो.
३) बहुतांश सर्व शेतकरी पीक अवशेष जाळत असल्यामुळे पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो. हे अशा यंत्रामुळे टाळता येते.
४) पेंढ्या बांधल्यामुळे उचलणे, वाहून नेणे, अन्य शेतामध्ये सेंद्रिय खत म्हणून वापरणे असे अनेक पर्याय सोपे व कमी खर्चिक होतात.
५) या पेंढ्याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना आर्थिक लाभही होऊ शकतो.

ज्ञानेश्‍वर ताथोड, ९६०४८१८२२०
(कृषी अभियांत्रिकी विशेषज्ज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, गडचिरोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT