Satara News : येथील आकाश दत्तात्रेय काळंगे हा तरुण पदवीधर शेतकरी आहे. कुटुंबाची अकरा एकर बागायत शेती असून, त्यामध्ये ऊस, आले यांसह हंगामी पिकांची शेती केली जाते. शिक्षण घेत असतानाच शेतीचे धडे घेण्यास आकाश यांनी सुरुवात केली. पदवीधर झाल्यावर नोकरी न करता शेतीची जबाबदारी त्यांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली.
शेतीला आर्थिक आधार असावा यासाठी कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचा सल्ला भाऊजी संतोष घाडगे यांनी दिला. गावात तसेच शेजारी कामेरी गावात काही शेतकरी करार पद्धतीने ब्रॉयलर पद्धतीने पोल्ट्री व्यवसाय करीत होते. आकाश यांनी त्यांचा अभ्यास केला. बाजारपेठ सर्वेक्षण व सल्लामसलत केली. त्यातून लेयर कोंबडीपालनाला (अंडी उत्पादन) चांगला वाव असल्याचे कळले.
मात्र व्यावसायिक पातळीवर यश मिळवायचे, तर पोल्ट्रीला आधुनिक तंत्रज्ञानाचे रूप देणे गरजेचे होते. त्यातून मजूरबळ, वेळ, श्रम, खर्च आदींची बचत होऊन नफ्याचे प्रमाण वाढण्यासही मदत होणार होती. त्यानुसार सांगली व विटा येथे या व्यवसायातील स्वयंचलित (ऑटोमेशन) युनिटची पाहणी केली. हे युनिट खर्चिक होते. पण त्याचे फायदेही तसेच मिळणार असल्याने त्याच पद्धतीने पोल्ट्रीची उभारणी करण्याचे ठरविले.
पोल्ट्री युनिटची उभारणी
अत्याधुनिक युनिट उभारणीसाठी बँकेचे कर्ज घेतले. त्या आधारे २०१७- १८ मध्ये २३० बाय ३३ फूट आकाराचे शेड शेतात उभारले. प्रत्येकी सुमारे १३ हजार ते १४ हजार पक्षिक्षमतेची तीन अशी एकूण ४२ हजार पक्षिक्षमता असलेल्या युनिटची निर्मिती केली. शेड, यंत्रे व पक्षी मिळून सुरवातीला सुमारे पावणेदोन कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागली. सध्या ती सात कोटींच्या आसपास आहे.
('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दर्जेदार खाद्यासाठी फीडमिल
पक्ष्यांना चांगल्या कंपन्यांचे खाद्य द्यायचे तर त्याच्या व्यवस्थापनावरील खर्चही अधिक होता. तो कमी करण्यासाठी स्वतःची फीडमिल उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मुख्य युनिटच्या बाजूला ४० बाय ३० फूट आकाराचे शेड उभे केले. त्यासाठी सुमारे १२ लाख रुपये खर्च केला. खाद्यासाठी लागणारा कच्चा माल स्वतःच खरेदी करत असल्यामुळे गुणवत्तापूर्ण खाद्य तयार होते. त्यातून पैशांची बचतही झाली आहे. या यंत्राची दिवसाला चार टन खाद्यनिर्मितीची क्षमता आहे. सध्या दोन टनांपर्यंत निर्मिती होते.
कोरोनात नुकसान
व्यवसायाची सुरुवात चांगली झाली. पण कोरोना काळात लॉकडाउनमध्ये कोंबड्या व अंडी यांच्याबाबत अप्रचार झाल्याचा फटका बसला, अंड्यांची मागणी कमी झाली. पक्षी सांभाळणे मुश्कील होऊन ० ते ३० रुपये प्रति नग एवढ्या अल्प दरात स्थानिकांना विक्री करावी लागली. कर्जाचे हप्तेही थकले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर भाऊजी व जिल्हा परिषद सदस्य माजी सदस्य मनोज घोरपडे यांच्या मदतीने तसेच उसाचे बिल व कर्ज यांच्याद्वारे पुन्हा नव्या उमेदीने सुरुवात केली.
मार्केटिंग व विक्री
दररोज १५ हजार ते २५ हजार अंडी मिळतात. आकाश एग्ज या नावाने पुणे, मुंबई, सातारा येथील व्यापाऱ्यांना जागेवर विक्री होते. सण, उत्सवाच्या कालावधीत दरांवर परिणाम होतो. प्रति नग सरासरी साडेतीन ते साडेचार रुपयांच्या आसपास खर्च येतो. वर्षभराचा विचार केल्यास प्रति अंडे साडेचार ते पाच रुपये दर मिळतो. सुमारे १५ ते २० टक्के नफा मिळतो. व्यवसायात दैनंदिन कामांवर विशेष लक्ष द्यावे लागते. अंडी वेळेवर पोहोच करता यावी यासाठी छोटा टेंपो घेतला आहे. व्यवसायातील समस्या सोडविण्यासाठी चांगले मार्गदर्शक भेटल्याने अनेक संकटांमधून बाहेर पडणे शक्य झाल्याचे आकाश सांगतात.
व्यवस्थापनातील ठळक बाबी
परिसरातील शेतकऱ्यांकडून १२ आठवडे वयाचे पक्षी आणले जातात. ते युनिटमध्ये वाढविले जातात.
वीस आठवड्यांनंतर ८० आठवड्यांपर्यंत पक्षी अंडी देतात. त्यानंतर त्यांची विक्री केली जाते.त्यातून पुढील बॅचसाठी भांडवल उपलब्ध होते.
पहाटे चारपासून कामास सुरुवात होते. सकाळी युनिटची स्वच्छता होते. त्यांनतर यंत्रणेत असलेल्या
शीट बेल्टद्वारे पक्ष्यांची विष्ठा बाहेर काढली जाते.
दुपारी तीन ते पाच यावेळेत बेल्ट व ‘एलेव्हेटर’च्या साह्याने अंडी बाहेर काढली जातात. त्यानंतर ट्रेमध्ये भरून विक्रीसाठी सज्ज केली जातात.
स्वयंचलित पद्धतीच्या रचनेत कोंबड्यांना पिण्याच्या पाण्यासाठी निपल यंत्रणा आहे. गरजेनुसार त्यातून पाणी उपलब्ध होते.
प्रत्येक ४० दिवसांनी लासोटा लस व त्यानंतर चार दिवसांनी दोन औषधे दिली जातात. यामुळे पक्षी ताजेतवाने व निरोगी राहतात. फीडमध्ये उत्पादित केलेले खाद्य साठवण्यासाठी सायलोची सुविधा उभारली आहे. त्याची १८ टन क्षमता आहे.
त्या त्या हंगामानुसार पक्ष्यांची विशेष काळजी घेतली जाते. पावसाळ्यात पक्षी व खाद्य भिजणार नाही याची दक्षता घेतली जाते. थंडीत युनिट बंदिस्त ठेवण्यात येते. उन्हाळ्यात गारव्यासाठी पत्र्यावर उसाच्या पाल्याचे आच्छादन तसेच त्यावर ठिबक सिंचन व पंख्यांचा वापर केला जातो.
पहाटे चार ते रात्री साडेदहापर्यंत लाइट सुरू ठेवली जाते. आवश्यक वेळी जनरेटरचा वापर होतो.
स्वयंचलित यंत्रणा व यांत्रिकीकरणामुळे केवळ एका जोडप्याच्या आधारे बहुतांश कामे केली जातात. त्यातून खर्चही नियंत्रणात राहिला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.