Rural Entrepreneurship in Agriculture: सातारा जिल्ह्यातील वळसे (ता. सातारा) हे पुणे- बंगळूर महामार्गालगत व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्यालगत असलेले गाव आहे. गावातील विलास कदम हे प्रगतिशील शेतकरी आहेत. पूर्वी पाण्याची उपलब्धता कमी असल्याने कोरडवाहू शेती जास्त होती. त्यांचे मोठे चिरंजीव अमोल सातारा येथील खासगी कंपनीत, द्वितीय क्रमांकाचे चिरंजीव विजय अजिंक्यतारा कारखान्यात नोकरीस आहेत. सर्वांत लहान चिरंजीव तुकाराम देखील पूर्वी खासगी कंपनीत नोकरी करायचे.
तीनही मुले नोकरी सांभाळून वडिलांना शेतीत मदत करायची. शेतीला पूरक म्हणून २०१४ मध्ये ट्रॅक्टर घेतला. सन २०२० च्या दरम्यान तुकाराम नोकरी सोडून पूर्णवेळ शेतीत उतरले. विहिरीचे पाणी कमी पडत असल्याने नदीवरून पाइपलाइन केली. त्यातून मालकीची सर्व पाच एकर शेती बागायती केली. शिवाय तीन एकर शेती वाट्याने देखील करण्यास सुरुवात केली. मजूरटंचाई ही सर्वात भीषण समस्या जाणवत होती. अशावेळी तुकाराम यांच्या मामांचे चिरंजीव शरद मांडवे यांनी यांत्रिकीकरण करण्यास सुचवले. त्यांच्याच मार्गदर्शनातून आर्थिक नियोजन करून टप्प्याटप्प्याने यंत्रे खरेदी करण्यास सुरुवात केली.
शेतीत यंत्रांचा वापर
गावासह परिसरात सर्वाधिक उसाचे पीक घेतले जात असल्याने पाचट ठेवण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला होता. तुकारामही दोन वर्षे बाहेरून पाचट कुट्टी करून घेत होते. यंत्रांबाबत स्वयंपूर्ण व्हावे या हेतूने त्यांनी २०२८ आणखी एक ट्रॅक्टर घेतला. त्याचबरोबर दोन लाख ३५ हजार रुपये खर्च करून पाचट कुट्टी यंत्र खरेदी केले. घरी दोन ट्रॅक्टर व आता हे यंत्रही असल्याने अन्य शेतकऱ्यांनाही त्याची सेवा देण्यास सुरवात केली. चोख, तत्पर व खात्रीशीर सेवेतून ग्राहक म्हणून शेतकऱ्यांची संख्या वाढू लागली. आज दरवर्षी सरासरी ३० ते ३५ शेतकऱ्यांना यंत्राद्वारे पाचट कुट्टी करून दिली जाते. एकरी ३४०० रुपये त्याचे शुल्क आकारले जाते.
खोडकी कटरचा वापर
तुकाराम यांना स्वतः ऊसशेतीतही अनेक समस्या जाणवायच्या. आडसाली किंवा सुरू हंगामातील ऊस काहीवेळा खाली वर असमान पद्धतीने तोडला जायचा. त्यामुळे उगवणीवर परिणाम व्हायचा. खोडकी एकसारखी करण्याचे काम मजुरांच्या साह्याने केले जायचे. मात्र त्यांची कमी उपलब्धता होती. शिवाय कामाचा दर्जाही समाधानकारक नव्हता. मग तुकाराम यांनी २०१८ मध्ये ८० हजार रुपये किमतीचे ट्रॅक्टरचलित खोडकी कटर घेतले. शेतकऱ्यांकडूनही त्यास मागणी येऊ लागली. आज या यंत्राद्वारे काम करण्यासाठी एकरी २४०० रुपये घेतले जात असून, वर्षाकाठी ३५ ते ४० शेतकरी व २५ ते ३० एकरांवर व्यवसायाला चालना मिळाली आहे.
बगला फोडणारे, खत पेरणारे यंत्र
खांडवा ऊस तुटून गेल्यानंतर बगला फोडणे व खत पेरणे ही कामे एकाचवेळा करणारे यंत्रही कदम कुटुंबाने आपल्या यंत्रांच्या ताफ्यात समाविष्ट केले आहे. ऊस तुटल्यावर सरीच्या दोन्ही बाजूंस हे यंत्र चालते. या यंत्रामुळे बाहेर पडणारी माती पाचट कुट्टीवर पडते. पेरलेले खत मातीआड होत असल्याने वाया जात नाही. पाचटावर माती पडत असल्याने पाचट लवकर कुजण्यास मदत होते. या कामासाठी एकरी २४०० रुपये घेतले जात असून, २५ ते ३० एकरांवर यंत्राची सेवा देण्यात येते.
धान्य स्वच्छ करणारे यंत्र
सोयाबीन, ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांच्या काढणीनंतर त्यात काडीकचरा शिल्लक राहत असतो. कदम यांनी ही समस्या ओळखून २०२२ मध्ये ९८ हजार रुपये किमतीचे धान्य स्वच्छ करणारे यंत्र घेतले आहे. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामांत त्यास मागणी चांगली राहते. प्रति गोणीस (अंदाजे १०० किलो) स्वच्छ करण्यास शंभर रुपये शुल्क आकारले जाते. या यंत्रामुळे वेळ व श्रमांचीही बचत होते.
मळीपाण्यासाठी टँकर
मुरमाड शेतात मळीपाण्याला मागणी जास्त असते. यासाठी तुकाराम यांनी पाच हजार लिटर क्षमतेचे दोन टँकर खरेदी केले आहेत. अजिंक्यतारा कारखाना जवळ असल्याने येथून मळीपाणी खरेदी करून शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे ते शेतात पसरून देण्यात येते. कारखान्यापासून गावच्या अंतरानुसार वाहतूक खर्च घेतला जातो. प्रत्येक हंगामात सरासरी चार महिने हा व्यवसाय केला जातो.
शेतीत केली प्रगती
कदम यांनीही यंत्रांच्या आधारे आपली शेती चांगल्या प्रकारे विकसित केली आहे. मशागतीपासून ते काढणीपर्यंतची अशा सुमारे १० अवजारे त्यांच्याकडे आहेत. लागवडीच्या आडसाली उसाचे एकरी ७० ते ७५ तर खोडव्याचे ५० ते ५५ टन उत्पादन मिळते. आल्याचे २५ ते ३० गाड्या (प्रति ५०० किलोची गाडी) उत्पादन मिळते. आले पिकांच्या बेवडावर ऊस लागवड असते. पाचट व्यवस्थापनासह हिरवळीच्या खतांचाही वापर होतो. दूध व शेणखातासाठी दोन म्हशींचे पालन केले जाते. यांत्रिकीकरणावर भर असल्याने शेतीतील श्रम, वेळ यांची बचत होऊन व्यवस्थापन सुधारले आहे.
यांत्रिकीकरणाच्या व्यवसायातून सुमारे १०० शेतकऱ्यांचे नेटवर्क तयार केले आहे. टुमदार बंगला, पाइपलाइन, अवजारे खरेदी, मुलांचे शिक्षण, घरातील लग्नसोहळा आदी सर्व बाबी शेतीमुळे शक्य झाल्या. आई वडिलांच्या मार्गदर्शनाखाली शेतीचा गाडा हाकला जात असून तीन भावांचे कुटुंब एका विचाराने एकत्र नांदते आहे. दोन्ही बंधू नोकरी सांभाळून घरी व शेतीला हातभार लावतात. तर तुकाराम शेती व यंत्र व्यवसाय पाहतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.