
Agriculture Success Story : जिरायती पिके हाती आली तर ठीक, अन्यथा दोन वेळची भाकरही पोटाला मिळत नव्हती. जगण्याचा संघर्ष मोठा होता. असा स्थितीत रंगनाथ परशराम पताडे आपले गाव धाऊर (ता.दिंडोरी. जि. नाशिक) येथून पत्नी भीमाबाई यांच्यासमवेत पिंपळनारे येथे नातेवाइकांच्या गावी स्थलांतरित झाले. त्यावेळी मोठा मुलगा भाऊसाहेब अवघ्या तीन महिन्याचा होता.
गावात गवत कापणी, धरण बांधणी, विहिरी खोदणे अशी कामे त्यांनी केलीय. दरम्यान विलास, श्याम या मुलांचा जन्म झाला. भाऊसाहेब १९९३ मध्ये दहावी उत्तीर्ण झाले. नाशिक येथे बारावी, त्यानंतर पदवीला प्रवेश घेतला. मात्र आर्थिक गरिबी आडवी आली. नाशिकमध्ये चार वर्षे हमाली व्यवसाय करावा लागली. धाकट्या दोन्ही मुलांचे शिक्षणही अर्धवट सुटले.
शेतीतील सुधारणा
पताडे कुटुंबाने १९९१-९२ पासून बटाईने शेतीला सुरवात केली. सर्व मुले मोठी झाल्यानंतर २००१ मध्ये कुटुंबीय मूळ गावी धाऊर येथे परतले. वडिलोपार्जित अर्धा एकर जमीन कुटुंबाच्या वाट्याला आली होती. दरम्यान कमावलेल्या पुंजीतून दीड एकर शेती घेतली. कूपनलिका, पाइपलाइन करून सिंचन सुविधा तयार केली.
सन २००४ पासून खऱ्या अर्थाने शेतीत बदल सुरू झाले. वडिलांनी शेती मुलांकडे सोपविली. व्यावसायिक दृष्टिकोन जपत त्यांनी टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, कोबी घेण्यास सुरवात केली. तिन्ही भावांचा संसार एकत्रित असल्याने अजून पुरेशा उत्पन्नाचा मेळ जुळत नव्हता. मग २०१० मध्ये जोडधंदा म्हणून भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर खरेदी केला.
त्यातून पुरेसे उत्पन्न घेत २०१४ मध्ये तो थांबविला. मग शेतीचाच विस्तार सुरू झाला. पूर्वी द्राक्षशेतीचा अनुभव घेतला होता. मात्र गारपिटीने बागेचे होत्याचं नव्हतं केलं होतं. मग बागेच्या सांगाड्याचा वापर करून दोडका, काकडी, वालपापडी, घेवडा अशी वेलवर्गीय पिके व टोमॅटो अशी भाजीपाला प्रधान शेती सुरू झाली.
अपयशाने कुटुंब खचले नाही
सन २००१ च्या सुमाराचा काळ अत्यंत अडचणीचा होता. भांडवल नसल्याने कर्ज, उसनवारीद्वारे सर्व भावंडांनी जमीन खणून विकसित केली. बाजारपेठा व बारमाही पीक पद्धतीचा अभ्यास करून वेलवर्गीय पिकांना पसंती दिली. सन २०१४ च्या दरम्यान भोपळ्याचा प्रयोग केला. सुकव्यामुळे नुकसान झाले.
त्यानंतर काकडी, दोडका, घेवडा, टोमॅटो, वालपापडी, कांदा अशी पद्धती कायम ठेवली. आज कांदा पाच एकर, काकडी दीड एकर, वालपापडी तीन एकर, उन्हाळी बाजरी दीड एकर अशी पद्धती आहे. जून ते जुलै दरम्यान शेतीला विश्रांती देऊन पुढे १० महिने वर्षभर भाजीपाला सुरू असतो. उच्च निरोगी दर्जाच्या रोपांची मागणी नोंदवून लागवड होते.
शेती व्यवस्थापनातील ठळक बाबी
शाश्वत सिंचनासाठी कूपनलिका, दोन विहिरी. पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धतीचा अवलंब
तणनियंत्रण, बाष्पीभवन रोखण्यासाठी मल्चिंग पेपर वापर
एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब; चिकट, कामगंध, फळमाशी सापळे यांचा वापर
माती, पाणी परीक्षणातून खतांचा वापर. जमिनीचे आरोग्य
टिकविण्यासाठी रासायनिक खतांचा मर्यादित वापर. सेंद्रिय खतांवर अधिक भर.
कृषी प्रदर्शन, चर्चासत्रे यात सहभाग; अभ्यास करून सुधारित पद्धतीचा अवलंब
दर्जेदार उत्पादनावर भर
प्रातिनिधिक सांगायचे तर कांदा, काकडीचे एकरी १५ टन तर वालपापडीचे १० टनांच्या आसपास उत्पादन मिळते. कांद्याला किलोला साडेआठ रुपयांपासून ते १८ रुपये, काकडीला साडेसात ते १२ रुपये तर वालपापडीला १०, पंधरा ते वीस रुपयांपर्यंत दर मिळतो. पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये दरांचा अंदाज घेऊन कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री होते.
भाजीपाल्याची नाशिक बाजारात तर टोमॅटोची गिरणारे येथे विक्री होते. शेतीमाल वाहतुकीसाठी स्वमालकीचे वाहन आहे. प्रतवारी करूनच विक्री होत असल्याने दर चांगले मिळतात असा अनुभव आहे.
गुणवत्तापूर्ण उत्पादनावर भर दिला असून त्यातून आर्थिक प्रगती साधत कुटुंबाच्या मालकीची १२ एकर शेती झाली आहे. जवळच्या काही शेतकऱ्यांची सुमारे सात एकर शेती बटईने केली जाते. काही ठिकाणी रस्त्यांची अडचण आहे. मात्र अडचणींवर मात करीत पुढे जाण्याची सवय लागलेल्या या कुटुंबाने प्रगती सुरू ठेवली आहे.
प्रगतीची बलस्थाने
कुटुंबाने शेतीत आर्थिक शिस्तही जपली आहे. योग्य गुंतवणूक, वातावरणीय बदलांच्या धर्तीवर पीक व वाण निवड, काटेकोर व्यवस्थापन व उत्पादकता ही कुटुंबाच्या प्रगतीची बलस्थाने ठरली आहेत. उत्पादन, दर यात चढ उतार होत असतात. मात्र शेतीत सातत्य व टिकून राहिले पाहिजे अशा कुटुंबाची विचारसरणी आहे. उच्च विचार व साधी राहणीमान असे शेतीत रमलेले हे जिद्दी कुटुंब आहे.वडील रंगनाथ व आई भीमाबाई यांचे परिवाराला मार्गदर्शन लाभते.
कामांच्या जबाबदाऱ्या
थोरले भाऊसाहेब, मधले विलास व धाकटे श्याम या तिघाही बंधूंनी शेतीतील आपापल्या जबाबदाऱ्या . वाटून घेतल्या आहेत. कुटुंबातील महिला सदस्यांचाही तेवढाच मोठा वाटा आहे. परिवारातील मोठा मुलगा योगेश अभियांत्रिकी पदविकाधारक असून मुलगी स्नेहल विवाहित आहे.
पुतणी नेहा, रिया व पुतणे मनीष, यश हे शाळेत शिकताहेत. मजूर टंचाईवर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाची कास धरली आहे. शेती विकास व मुलांच्या शिक्षणावर प्रामुख्याने गुंतवणूक केली आहे. प्रयोगशील शेतकरी सदाशिव खांदवे, कृषी प्राध्यापक तुषार उगले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
भाऊसाहेब पताडे ९५२७४७१४६१
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.