Silage Making Agrowon
टेक्नोवन

Agriculture Technology: उत्तम मुरघास निर्मितीसाठी यंत्रे

Silage Making: पावसाळ्यासारख्या हिरवा चारा अधिक उपलब्ध असलेल्या काळातच साठवणीच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असते. त्या दृष्टीने शेतकऱ्यांचा मुरघास निर्मितीकडे कल वाढत आहे. या प्रक्रियेचे नेमके तंत्र व यंत्रे जाणून घेऊ.

डॉ. सचिन नलावडे

Green Fodder Management: पशुपालनामध्ये आहाराचे व्यवस्थापन सर्वांत महत्त्वाचे असते. त्यातही ओल्या, सुक्या चाऱ्याचे व पोषक अशा पशुखाद्याचे प्रमाण योग्य ठेवणे आवश्यक असते. सिंचनाच्या कमतरतेमुळे पावसावर आधारीत शेतीमध्ये चाऱ्याचे नियमित उत्पादन घेण्यात अनेक मर्यादा येतात. अशा स्थितीत पावसाळ्यासारख्या हिरवा चारा अधिक उपलब्ध असलेल्या काळातच साठवणीच्या दृष्टीने प्रयत्न करणे गरजेचे असते. त्या अभावी भारतीय दुग्धव्यवसायावर बऱ्यापैकी नकारात्मक परिणाम होतो. भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत अभ्यासामध्ये ही चाऱ्याची कमतरता ३५ टक्के आहे. त्यातही पाण्याची तीव्र कमतरता असलेल्या दुष्काळग्रस्त भागात पशुपालन टिकविणे अत्यंत कठीण होत आहे.

पूर्वीपासून शेतकरी आपल्या दुभत्या जनावरांना ‘आंबवण’ खाऊ घालत आले आहेत. आंबवण म्हणजेच आंबवलेला चारा. अलीकडे त्यासाठी मुरघास (सायलेज) हा शब्द वापरला जातो. कोणताही हिरवा रसाळ चारा कुट्टी करून बंदिस्त जागेत दाबून भरला जातो. तिथे हवारहित स्थितीमध्ये योग्य प्रमाणात आंबवला जातो. या प्रक्रियेत त्यातील पोषक घटक फारसे कमी होत नाही. त्यानंतर मुरघास काढून जनावरांना खाण्यास दिला जातो. या मुरघासामध्ये २५ ते ३५ टक्के कोरडे घटक (डीएम) असतात. मुरण्याच्या प्रक्रियेमध्ये चाऱ्यातील शर्करा आंबल्यामुळे काही उपयुक्त आम्ले तयार होतात. पचण्यास कठीण अशा काही प्रथिनांचे साध्या पचनीय संयुगांमध्ये परिवर्तन होते. त्यात काही प्रमाणात अमोनियाही असतो.

फायदे

चाऱ्याची उपलब्धता अधिक असलेल्या काळातील चाऱ्याची साठवण दीर्घकाळ करून त्याचा कमतरतेच्या काळातही वापर करता येतो.

साठविण्याच्या प्रक्रियेत त्याची पचनीयताही वाढते.

शेतातील पशुखाद्ययोग्य हिरव्या तणांपासूनही मुरघास बनवता येते. या एन्सायलिंग प्रक्रियेमुळे तणांच्या बियाही नष्ट होतात. परिणामी शेणखताद्वारे शेतामध्ये त्यांचा प्रसार कमी राहतो.

नुसत्या कोरड्या चाऱ्यापेक्षाही कमी जागेत मुरघास तयार करता येतो.

मुरघासासाठी योग्य पिके

विद्राव्य साखर/कर्बोदकांचे प्रमाण भरपूर असलेली चारापिके मुरघासासाठी योग्य मानली जातात. उदा. मका, ज्वारी, बाजरी.

लागवड केलेले (सुपर नेपियर) आणि नैसर्गिक गवत ३ ते ३.५% मोलॅसेस मिसळून मुरघास करण्यासाठी वापरता येते.

चारा पिके फुलोरा आणि दुधाच्या अवस्थेत कापावीत. सर्वसाधारणपणे जाड देठ असलेली पिके मुरघासाच्या स्वरूपात जतन केली जातात, तर पातळ देठ असलेली पिके वाळवून सुक्या गवताच्या स्वरूपात जतन केली जातात.

सायलो

उच्च आर्द्रतायुक्त चारा साठवून मुरघास करण्यासाठी खास तयार केलेल्या हवाबंद रचनेला ‘सायलो’ म्हणतात.

पावसाचे प्रमाण कमी असलेल्या ठिकाणी मुरघास खड्डे (पीट सायलो) वापरले जातात. आपल्याकडील चाऱ्याची उपलब्धता आणि एकूण जनावरांची संख्या यानुसार खड्ड्यांचा आकार ठरवता येतो. मात्र त्याची खोली २.४ ते ३ मीटर इतकी असावी. साधारण ४०० किलो चाऱ्यासाठी १ घनमीटर जागा आवश्यक असते.

मुरघास निर्मितीसाठी हवाबंद करण्यायोग्य कंटेनर वापरले जातात. तसेच मुरघास साठवण्यासाठी ताडपत्रीच्या विशेष उंच पिशव्याही बाजारात उपलब्ध आहेत.

मुरघास करण्याची तयारी

३० ते ३५ टक्के कोरडे पदार्थ असलेल्या चारा पिकाची निवड करावी. मक्यासारख्या पिकात कणसे येऊ लागल्यावर साधारणपणे खालील तीन - चार पाने सुकतात तेव्हा पिकाची कापणी करावी. चाऱ्याची चांगल्या प्रकारे कुट्टी करून खड्ड्यामध्ये समान थरांमध्ये पसरावे.

चाराचे संपूर्ण खड्ड्यात समान वितरण करावे. एकेक थर टाकत धुम्मसने चांगले दाबून घ्यावे. म्हणजे त्यातील हवा बाहेर पडेल. चव आणि नायट्रोजनचे प्रमाण सुधारण्यासाठी धान्ये आणि गवतांमध्ये ०.५ टक्का मीठ, १ टक्का युरिया मिसळला जातो. अशा प्रकारे एकेक थर दाबून भरत खड्ड्यांच्यावर ३ ते ४ फूट उंचीपर्यंत भरल्यानंतर सायलो हवाबंद करायचे आहे. त्यासाठी प्रथम लांब गवत किंवा भाताच्या पेंढ्याने सर्व बाजूंने झाकून घ्यावे. त्यानंतर माती आणि शेण यांच्या चिखलाने ४ ते ५ इंच जाडीच्या थराने लिंपत हवाबंद करावे. आतील तापमान सुमारे २७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढते. त्यात किण्वन प्रक्रियेमुळे हिरव्या पिकांचे मुरघासामध्ये रूपांतर होण्यास सुरुवात होते. २ महिन्यांत चांगला मुरघास तयार होईल.

किण्वन

यात किण्वनाची प्रक्रिया लॅक्टिक अॅसिड किण्वन आणि ब्युटीरिक अॅसिड किण्वन अशा दोन प्रकारे होऊ शकते.

जेव्हा चाऱ्यामध्ये ६५ टक्के ते ७५ टक्के आर्द्रता आणि पुरेशी साखर असते, तेव्हा हवारहित वातावरणातील ‘अनॲरोबिक लॅक्टिक अॅसिड बॅक्टेरिया’ सक्रिय होतात. त्यामुळे उच्च दर्जाचे स्वच्छ, चांगला वास असलेले मुरघास (पीएच ४) तयार होते.

जर चारा प्रथिनेयुक्त पदार्थांनी समृद्ध असेल, तर ब्युटीरिक अॅसिड किण्वन वर्चस्व गाजवेल. मात्र या ब्युटीरिक अॅसिडला तीक्ष्ण, अप्रिय वास असतो. असा मुरघास जनावरांना आवडत नाही.

हे सर्व घटक हवा विरहित वातावरणात वनस्पती घटक ६५ ते ७५% आर्द्रतेवर साठवणे गरजेचे असते. त्यामुळे हिरव्या वनस्पती घटकांच्या श्वसनामुळे पोषक तत्त्वांचे नुकसान कमी होते. तसेच लॅक्टिक अॅसिड जिवाणूंची वेगाने वाढते. हानिकारक बुरशींची वाढ होत नाही. हवेच्या सांनिध्यात वाढणारे जिवाणूंचा विकास होत नाही.

मुरघासाचा रंग

जेव्हा सायलोमधील तापमान मध्यम असते, तेव्हा मुरघास पिवळसर किंवा तपकिरी हिरवा आणि कधी कधी सोनेरी रंगाचा असतो. हे हरितद्रव्यांवर सेंद्रिय

आम्लांच्या प्रक्रिया होऊन मॅग्नेशिअम मुक्त रंगद्रव्यात (फेओफायटिन) रूपांतर होते. त्यामुळे त्याला पिवळसर, तपकिरी हिरवा किंवा सोनेरी रंग येतो. मात्र सायलोमधील तापमान जास्त असताना मुरघास गडद तपकिरी किंवा काळा होतो.

गुणवत्ता

उत्तम मुरघासाला आम्लयुक्त चव आणि चांगला वास असतो.

मुरघास ब्युटीरिक आम्ल, बुरशीपासून मुक्त असतो.

त्याचा सामू ३.५ ते ४.२ श्रेणीत असतो.

त्यात १ टक्का ते २ टक्के लॅक्टिक आम्ल आणि अमोनिकल नायट्रोजन हे एकूण नायट्रोजनच्या १० टक्क्यांपेक्षा कमी असतो.

चांगल्या मुरघासामध्ये काही ब्युटीरिक आम्ल, किंचित प्रोटीओलिसिस, काही प्रमाणात बुरशी, सामू ४.८ आणि त्याहून अधिक आणि २० टक्के अमोनिकल नायट्रोजन असलेले एन्साइल केलेले पदार्थ असतात.

मुरघास पॅकिंग यंत्राची तांत्रिक वैशिष्ट्ये

९% प्रथिनेयुक्त मुरघासासाठी ‘कॉर्न क्रॅकिंग’ तंत्रज्ञान

कापलेले आकार : गायी, शेळ्या आणि म्हशींसाठी योग्य ५ मिमी आणि १३ मिमी.

कापणीसाठी वापरले जाणारे पाते सहज धार लावता येण्याजोगे असते.

फायदे

६०/३० किलो पिशव्या भरता येतात.

भारतीय परिस्थितीनुसार हाताळणी आणि वाहतुकीसाठी सोपी यंत्रणा.

मुरघास निर्मितीची प्रक्रिया संपूर्ण सेंद्रिय असून त्यात शक्यतो कोणत्याही रासायनिक बाह्य घटकाची (अ‍ॅडिटीव्ह) आवश्यकता नसते.

दुधाचे उत्पादन ३० टक्क्यांने वाढत असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे.

उच्च डीएम सेवनामुळे प्रथिने आणि चरबी वाढून मिळणाऱ्या दुधाची गुणवत्ता चांगली मिळते.

मुरघास निर्मितीसाठी चारा कापणीचे यंत्र हे खास अल्पभूधारकांसाठी तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे हिरवी चारा पिके (उदा. गवत, मका किंवा अल्फाअल्फा इ.) कार्यक्षमतेने कापले जाते. ते उच्च दबावाखाली दाबून मुरघास करण्यायोग्य गाठी बनवते. त्यासाठी वीजही अल्प प्रमाणात लागते. या यंत्रामध्ये कटिंग यंत्रणा, कॉम्प्रेशन चेंबर आणि काही वेळेस रॅपिंग यंत्रणा यांचा समावेश असतो.

या यंत्राची प्रमुख वैशिष्ट्ये

छोटा आकार : लहान शेतात सहजपणे हाताळणी व वाहतुकीसाठी आरेखन केले आहे.

याचे विजेवरील, डिझेल इंजिनचलित किंवा लहान ट्रॅक्टरचलित असे प्रकार उपलब्ध आहेत.

चाराची कुट्टी जनावरांच्या गरजेनुसार वेगवेगळ्या आकारामध्ये ठेवणे शक्य आहे. त्यासाठी समायोजनाची व्यवस्था केलेली आहे.

गाठीचा आकार लहान ५० ते १०० किलो वजनादरम्यान ठेवता येतो. त्यामुळे हाताळणी व साठवणूक सोपी होते.

काही मॉडेल्समध्ये साठवणुकीची गुणवत्ता सुधारण्यासाठी गाठींना प्लास्टिक फिल्म आपोआप गुंडाळण्याची योजना केलेली असते.

मुख्य घटक

फीडिंग यंत्रणा : कटिंग चेंबरमध्ये चारा भरण्यासाठी कन्व्हेअर बेल्ट किंवा रोलर्स.

कटिंग ब्लेड : चारा इच्छित आकारामध्ये कापण्यासाठी फिरणारे ब्लेड असतात.

कॉम्प्रेशन चेंबर : या कक्षामध्ये कापलेल्या चाऱ्यातील दाब देत सर्व हवा काढून टाकली जाते. उच्च दाबाखाली तो अधिक घट्ट केला जातो.

इजेक्शन यंत्रणा : तयार झालेला मुरघास गाठी आपोआप डिस्चार्ज करण्याची प्रणाली असते.

फायदे

सुधारित खाद्य गुणवत्ता : पशुधनाच्या आहारासाठी सुसंगत आणि उच्च-गुणवत्तेचा मुरघास सुनिश्चित करते.

खाद्यावरील खर्चात बचत शक्य. कारण उपलब्ध असताना किंवा दर स्वस्त असताना हिरवा चारा मिळवून दर अधिक असलेल्या कमतरतेच्या काळात वापरण्यामध्ये खर्चात मोठी बचत साधते. स्वतःच्या चारा पिकांचाही योग्य कार्यक्षमतेने वापर करणे शक्य होते.

कार्यक्षम साठवण : योग्यरीत्या बनवलेले मुरघास दीर्घकाळ साठवता येतात.

लवचिकता : अल्पभूधारकांनाही कमी अधिक प्रमाणात पशुधन जोपासणे शक्य होते.

चांगल्या मुरघास निर्मितीसाठी चेकलिस्ट

कापणीच्या वेळी खराब हवामान टाळा.

कापणी करायच्या पिकातील आर्द्रतेचे प्रमाण मोजा.

सायलोची स्थिती तपासा.

पिकाच्या वाढीचा टप्पा तपासा

गरजेनुसार मोलॅसेस, युरिया, मीठ इ, घटकांचा समावेश करा.

सायलो भरताना दाबून आतील हवा काढून टाकली जाईल, यावर लक्ष देणे.

सायलोचे बाहेरून संपूर्णपणे हवाबंद होईल अशा प्रकारे आवरण आणि सील करणे.

मुरघास बनविण्याच्या आवश्यक, महत्त्वाची यंत्रे

मागील एका लेखामध्ये आपण गवत कापणी यंत्रांबाबत माहिती घेतली आहे.

मुरघास चाफ कटरचे ऊर्जेच्या वापरानुसार (उदा. इलेक्ट्रिक मोटर, ट्रॅक्टर, डिझेल इंजिन इ.) असे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

पॅकिंग यंत्राचेही विविध प्रकार उपलब्ध आहेत. एकाच वेळी पॉवरफुल हायड्रॉलिक यंत्रणेवर चालणारे कुट्टी, लोडर आणि उच्च दाबाखाली कुट्टी दाबणारे कॉम्पॅक्टर यंत्र उपलब्ध आहे. लहान सिलोपॅक यंत्रासाठी १५ एचपी पेक्षा जास्त ऊर्जा लागते. तर मोठ्या प्रमाणात पॅकिंग करण्यासाठी ३५ एचपीपेक्षा जास्त ऊर्जेची आवश्यकता असते. ही दोन्ही ३० किलो किंवा ६० किलो बॅग पकिंगमध्ये उपलब्ध आहेत. ही दोन्ही मॉडेल्स एकात्मिक बॅगर आणि कटर मॉडेल्स आहेत.

डॉ. सचिन नलावडे, ९४२२३८२०४९,

(प्रमुख, कृषी यंत्रे आणि शक्ती विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT