Silage Production : यांत्रिक मुरघास निर्मितीत ‘ऑरगॅनिका’ कंपनीची ओळख

Animal Feed : आधुनिक यंत्रांचा वापर करून कंपनीने मागील वर्षी १० हजार टन मुरघास तयार केला. जिल्ह्यातील ५० गावांसह तीन राज्यांत पुरवठा करून कंपनी थांबलेली नाही. तर आरोग्यदायी दूध निर्मितीचे पुढील उद्दिष्ट ठेवून कंपनी त्या दिशेने वाटचाल करीत आहे.
Silage Production
Silage ProductionAgrowon
Published on
Updated on

Agriculture Success Story : नेवासा - श्रीरामपूर रस्त्यावरील पुनदगावचा (ता. नेवासा) परिसर प्रवरा नदीमुळे कायम बागायती झाला आहे. या भागातील बहुतांश शेतकरी ऊस उत्पादक आहेत. शेतीला जोड म्हणून नेवासा, श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी दूधव्यवसाय करतात. पुनदगावचे सुनील पवार यांची प्रगतिशील आणि प्रयोगशील शेतकरी अशी ओळख आहे. वडील कृषिभूषण ज्ञानेश्वर माऊली पवार यांचे मार्गदर्शन त्यांना लाभते आहे.

पशुपालन व दुग्धव्यवसाय विषयात उच्च ध्येय ठेवून काहीतरी वेगळे करायचे व स्वतःबरोबर परिसरातील शेतकऱ्यांचीही उन्नती साधायची हे ध्येय त्यांनी ठेवले. त्यातून काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन २०१४ पासून मुरघास तयार करुण विक्री सुरू केली. तर ऑक्टोबर २०१९ मध्ये त्याचेच पुढील पाऊल म्हणून ऑरगॅनिका शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना त्यांनी केली.

ऑरगॅनिका कंपनीची स्थापना

सुनील कंपनीचे अध्यक्ष आहेत. तर वर्षा जाधव, सागर पवार (दोघेही आयटी इंजिनिअर), भगवान तागड, रमेश जाधव, नीलेश पवार (बीएस्सी बायोटेक) हे संचालक तर ३७५ सभासद आहेत. कंपनीच्या स्थापनेमागील पार्श्‍वभूमी सांगायची तर पुनदगाव परिसरातील दुग्धोत्पादकांनी २०१४ मध्ये ला पंजाबमध्ये अभ्यासदौरा काढला होता.

तेथे उच्च दूध उत्पादन क्षमता असलेल्या गायी त्यांनी पाहिल्या. तेथील दुधाची गुणवत्ताही उच्च असल्याने उच्चांकी दर देऊन नामांकित कंपन्या हे दूध खरेदी करतात ही बाब लक्षात आली. सन २०१५ मध्ये पवार यांना इस्राईल अभ्यासदौरा अनुभवण्याची संधी मिळाली. या दोन्ही दौऱ्यांमधून व्हीजन मिळाल्याने पवार यांनी त्या दृष्टीने महत्वाकांक्षी पावले टाकण्यास सुरवात केली.

Silage Production
Silage Making : मुरघास कसा बनवायचा?

यांत्रिकीकरण व मुरघास निर्मिती

सन २०२० मध्ये मध्य प्रदेश व तेलंगणातून मुरघासाचे बेल्स (गाठी) तयार करणारी अत्याधुनिक यंत्रे भाडेतत्त्वावर आणली. त्यातून वर्षाला आठ हजार टनांपर्यंत गाठी तयार करता येऊ लागल्या. आता तीन बेलर मशिन्स, तीन ट्रॅक्टर्स, एक प्रेस मशिन, क्रेन आदी सामग्री घेतली आहे. शंभर, चारशे व पाचशे किलो क्षमतेपर्यंतच्या गाठी त्यामुळे तयार करता येत आहेत. प्रति तासाला अधिक गाठी तयार करणारे नवे यंत्र कंपनीने पहिल्यांदाच या भागात आणले आहे. एकूण चार कोटींची गुंतवणूक केली आहे.

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत ५० लाखांचे अनुदान मिळाले आहे. मुरघास निर्मितीसाठी पुनदगावसह नेवासा आणि श्रीरामपूर तालुक्यातील सुमारे पन्नास गावांतील मका उत्पादकांकडून १८०० ते २५०० रुपये प्रति टन दराने मका खरेदी केला जातो. कंपनीच्या यंत्राद्वारे जागेवर कुट्टी करून तो मका वाहनात भरला जातो. काट्यावर वजन करुण त्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. हा मका कंपनीच्या प्रक्रिया केंद्रात आणून मुरघास बनविण्याच्या दृष्टीने त्यावर प्रक्रिया केली जाते. बेल्स अर्थात गाठी स्वरूपात तो विक्रीसाठी तयार केला जातो.

Silage Production
Silage Production : यांत्रिक मुरघास निर्मितीतील ‘पेंडगाव आकाश’ कंपनी

विक्री, उलाढाल

यांत्रिकीकरण होण्यापूर्वीच्या काळात मनुष्यबळाकरवी दोनहजार ते तीन हजार टनांपर्यंत मुरघास तयार व्हायचा. यांत्रिकीरणानंतर त्यात वाढ झाली आहे. मागील आर्थिक वर्षात कंपनीने १० हजार टन मुरघास निर्मिती केली. यंदाच्या वर्षी २० हजार टन निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. महाराष्ट्रासह गोवा, गुजरातेत मुरघासाची विक्री होते. शिवाय जालना येथील गोशाळेला सहाहजार टन व एका प्रसिद्ध खाजही कंपनीस चार हजार टन मुरघासाचा पुरवठा होतो.

जागेवर प्रति किलो सहा रुपये तर घरपोच असल्यास साडेसहा रुपये दराने विक्री होते. कंपनी स्थापन केल्यावर मुरघास विक्रीतून पहिल्या वर्षी २० लाखांची उलाढाल झाली होती. आर्थिक वर्ष मार्च २०२४ पर्यंत कंपनीची १५ कोटीपर्यंत उलाढाल पोचली आहे. पुढील मार्च २०२५ पर्यंत ती पंचवीस कोटींपर्यंत पोचेल जाईल असा अंदाज कंपनीचे अध्यक्ष सुनील पवार व्यक्त करतात.

मका क्षेत्रात वाढ

दर्जेदार मुरघासाचा पुरवठा होत असल्याने पुनदगावसह बेलपिंपळगाव, पाचेगाव, नेवासा बुद्रूक, टाकळीभान, साईनाथनगर, घोरगरगाव आदींसह परिसरातील गावांत पशुपालन वाढीला मोठी मदत झाली आहे. मक्याची शाश्वत खरेदी आणि दर मिळत असल्याने या भागातील अनेक शेतकरी मका उत्पादनाकडे वळले आहेत. या उद्योगातून यंत्रचालकांसह सुमारे ५० कामगारांना कायमस्वरूपी रोजगार कंपनीकडून मिळाला आहे.

आरोग्यदायी दूधनिर्मिती करणार

कंपनीच्या सभासदांसोबत करार करुण पुढील काळात आरोग्यदायी दूध निर्मिती करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टीने हानिकारक बुरशीमुक्त मुरघास निर्मितीवर देखील भर आहे. दूध उत्पादकांनी स्वतः मूरघास निर्मिती केल्याने वेळ व कष्ट दोन्हीही खर्च होतात. त्याऐवजी कंपनीकडून त्यांना सातत्याने पुरवठा केल्याने या दोन्ही बाबींत बचत होईल हे कंपनीचे उद्दिष्ट आहे असे पवार म्हणतात. शासनाच्या ‘स्मार्ट’ योजनेतून टीएमआर’ तंत्रज्ञानातून पशुखाद्य निर्मिती व पुरवठा करण्यासाठीच्या कंपनीच्या प्रकल्प उभारणीला प्राथमिक मान्यता मिळाली आहे. त्यामुळे गाईंना दर्जेदार आहार मिळून दूधही दर्जेदार मिळेल असा हेतू आहे. दुधापासून प्रक्रिया करण्याचाही कंपनीचा संकल्प आहे.

सुनील पवार ९०४९१०८८७१

(अध्यक्ष, ‘आरगॅनिका’ शेतकरी उत्पादक कंपनी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com