Silage Making : तंत्र दर्जेदार मुरघास निर्मितीचे

Murghas Making : मुरघास निर्मितीमुळे जनावरांना चाराटंचाईच्या काळात दर्जेदार चारा उपलब्ध होतो. हा चारा पचनास सोपा, तसेच चवीला उत्तम असल्याने जनावरे आवडीने खातात.
Silage Making
Silage MakingAgrowon
Published on
Updated on


डॉ. अजित पाटील, डॉ. गणेश गादेगांवकर, डॉ. संदीप ढेंगे

Silage : सध्याच्या अनियमित पावसामुळे येत्या काळात हिरव्या चाऱ्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. या समस्येवर मात करण्यासाठी मुरघास निर्मिती योग्य ठरते. त्यामुळे जनावरांना योग्य गुणवत्तेचा आणि चांगला आहार मिळण्यास मदत होते.
पावसाळ्याच्या शेवटच्या काळात अतिरिक्त उपलब्ध असलेला हिरवा चारा योग्य वेळी कापून काही कालावधी करता विशिष्ट पद्धतीने साठवून ठेवल्यावर त्यावर किण्वन प्रक्रिया होऊन लुसलुशीत व चवदार चारा मिळतो त्याला मुरघास असे म्हणतात. हिरवा चारा साठवून ठेवण्याची ही अत्यंत उत्कृष्ट पद्धत आहे. मुरघास केल्याने हिरव्या चाऱ्याची गुणवत्ता वाढते. टंचाईच्या काळात जनावरांना मुरघासरूपाने हिरवा चारा मिळतो. मुरघास तयार करण्याची पद्धती खालील प्रमाणे ः

मुरघासासाठी उपयुक्त चारा पिके ः
- कोणत्याही प्रकारच्या हिरव्या चाऱ्यापासून मुरघास बनवता येतो. परंतु मुरघास निर्मितीसाठी एकदल चारा पिकांना अधिक प्राधान्य दिले जाते. यामध्ये कर्बोदकांचे प्रमाण अधिक असते.
- ज्या पिकांचा बुंधा, जाड भरीव आहे असा चारा मुरघास बनविण्याकरिता योग्य मानावाकारण जाड बुंधा असल्यामुळे चारा व्यवस्थित दाबून हावाबंद परिस्थितीत ठेवता येतो.
- एकदल चारा पिके ः मका, ज्वारी, बाजरी, ओट इ.
द्विदल चारा पिके ः लसूण घास, बरसीम, चवळी, गवार इ.
गवत पिके ः हत्ती गवत, यशवंत, जयवंत, गिनी गवत इ.
- मुरघास तयार करताना एकदल चारा आणि द्विदल चारा यांचे प्रमाण ७०:३० टक्के एवढे असावे.
- मका हे चारा पीक मुरघास बनविण्यासाठी उत्तम मानले जाते. कारण त्याचा बुंधा जाड असून, कर्बोदकाचे प्रमाण अधिक असते.

Silage Making
Silage Making : मुरघास करताना गुणवत्ता कशी राखावी?

पीक कापणीची योग्य वेळ ः
- ज्वारी आणि बाजरीचे पीक पोटरीत असताना कणसे येण्यापूर्वी.
- मका पीक पोटरीवर येऊन दाणे दुधाळ परिस्थितीत असताना.
- द्विदल पिके फुलोऱ्यात असताना कापावीत.
- बहुवार्षिक चारा पिके डी. एच. एन. ६ आणि १० या पिकांची पहिल्या कापणी झाल्यानंतर पुढील कापणी ६ ते ८ आठवड्यांनी करून नंतर ते मुरघाससाठी वापरावे.
- कापणी केलेल्या चाऱ्यांमध्ये पाण्याचे प्रमाण ८० ते ८५ टक्के असते. पाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कापणी केलेला चारा साधारणतः एक दिवस सावलीत वाळवून त्यातील पाण्याचे प्रमाण ६५ ते ७० टक्यापर्यंत कमी आणावे.

Silage Making
Silage Making : मुरघास बनविण्यासाठी कोणती चारापिकं निवडाल ?

मुरघास बनविण्याची पद्धत ः
- कुट्टी यंत्राच्या साह्याने चाऱ्याचे अर्धा ते पाऊण इंच लांबीचे तुकडे करून घ्यावेत.
- चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण तपासण्यासाठी कुट्टी केलेल्या चाऱ्याचा हाताने गोल चेंडू करावा. चेंडू लगेच उलगडला तर पाण्याचे प्रमाण कमी आणि चाऱ्याचा चेंडू तसाच राहिला तर पाण्याचे प्रमाण जास्त आहे असे समजावे. चाऱ्याच्या चेंडू हळूहळू उघडला, तर चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण योग्य आहे असे समजावे.
- उपलब्ध हिरवा चारा आणि जनावरांची संख्या यावरून मुरघास निर्मितीचे प्रमाण ठरवावे.
- साधारण १ फूट बाय १ फूट बाय १ फूट एवढ्या जागेत १६ किलो हिरव्या चाऱ्याची कुट्टी सामावते.
- मुरघास तयार करण्यासाठी खड्डा म्हणजे साइलो तयार करताना उंचवट्याची जमीन निवडावी. पावसाचे पाणी खड्ड्यात जिरपणार नाही याची खात्री करावी. जमिनीवर दहा ते बारा फूट उंच आकाराची टाकी बांधून मुरघास साठविता येतो.
- खड्ड्याचे कोपरे गोलाकार असावेत. खड्ड्याच्या भिंती गुळगुळीत असाव्यात. भिंतींना भेगा नसाव्यात.
- अत्यंत कमी भांडवल वापरून प्लॅस्टिकचे ड्रम, टाक्या, प्लॅस्टिक पिशव्या आणि बांबूची चौकट वापरून मुरघास तयार करता येतो.
- तयार खड्ड्यामध्ये प्रथम प्लॅस्टिकचा कागद सर्व बाजूंनी अंथरून त्यावर चारा कुट्टीचा थर पसरावा.

- प्रति क्विंटल कुट्टी केलेल्या हिरव्या चाऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी युरिया १ किलो, मीठ अर्धा किलो, उसाची मळी किंवा गूळ २ किलो आणि खनिज मिश्रण १ किलो प्रति १५ लिटर पाण्यामध्ये विरघळून त्याचे मिश्रण करावे. या मिश्रणामुळे चाऱ्यामध्ये किण्वन प्रक्रिया होऊन उत्तम दर्जाचा मुरघास तयार होतो.
- अलीकडे बाजारामध्ये सायलेज इनोक्युलमदेखील उपलब्ध आहेत. त्याचा मुरघास बनविण्याकरिता वापर केल्यास कमी कालावधीत उत्तम दर्जाचा मुरघास बनविता येतो. सायलेज इनोक्युलम उपलब्ध असल्यास मळी किंवा गूळ टाकण्याची गरज भासत नाही.
- खड्ड्यात कुट्टीचा चार इंच उंचीचा थर झाल्यावर तयार केलेल्या मिश्रणाचा फवारा घ्यावा. आणि थर चांगला दाबून घ्यावा, त्यामुळे त्यातील हवा बाहेर निघून जाईल. याकरिता धुमस किंवा ट्रॅक्टरचा ही वापर करावा.
- चारा भरताना त्यात हवा राहणार नाही याची काळजी घ्यावी. कारण हवेच्या संपर्कामुळे चाऱ्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता असते‌.
- मुरघास खड्डा भरायला घेतल्यावर किमान १ ते २ दिवसांत खड्डा पूर्ण भरून घ्यावा. त्यापेक्षा जास्त दिवस घेऊ नयेत.
- खड्डा किंवा ड्रम किंवा बॅग इत्यादी व्यवस्थित भरल्यानंतर त्यावर प्लॅस्टिकचा कागद झाकून पालापाचोळा, उसाचे पाचट किंवा गवताचा थर पसरून आच्छादन करावे. या आच्छादनावर पाच इंचाचा मातीचा थर द्यावा, जेणेकरून तो हवाबंद स्थितीत राहील.
- हवाबंद केलेला मुरघास हा ४० ते ६० दिवस ठेवल्यास चाऱ्यामध्ये आंबवण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन उत्तम दर्जाचा मुरघास तयार होतो. तयार मुरघास एक ते दोन वर्षांसाठी टिकून राहतो.

उत्तम मुरघास कसा ओळखावा?
- मुरघासाला सोनेरी पिवळा किंवा हिरवट पिवळा रंग येतो.
- आंबट गोड वास येतो.
- उत्तम दर्जाच्या मुरघासाचा सामू ३.५ ते ४.२ असतो.
- ६५ ते ७० टक्के पाण्याचे प्रमाण असते.

मुरघास देण्याची पद्धत ः
- मुरघास सायलो मधून जनावरांना खाण्यासाठी काढताना, एका बाजूने उघडून आवश्यक तितका मुरघास बाहेर काढावा. आणि पुन्हा झाकून ठेवावा.
- खड्डा पूर्णपणे उघडू नये. जेणेकरून हवा आतमध्ये जाणार नाही आणि मुरघास खराब होण्याची शक्यता टाळली जाईल.
- मुरघासाचा जनावरांच्या आहारात हळूहळू वापर करावा. मुरघासाचा सामू आम्लधर्मीय असतो. त्यामुळे जनावरांना अचानक जास्त प्रमाणात मुरघास खाऊ घातल्यामुळे आम्लधर्मीय अपचन होण्याची शक्यता असते.
- एका गाईला तिच्या वजनानुसार २० ते २५ किलो मुरघास लागतो. हा मुरघास दिवसातून २ ते ३ वेळा समभागात विभागून द्यावा.
- एक वर्षापेक्षा कमी वासरांना अर्धा किलोपेक्षा जास्त मुरघास देऊ नये.
- शेळ्या- मेंढ्यांना दररोज किलोभर मुरघास पुरेसा होतो.
----------------------------------------------------
- डॉ. अजित पाटील, ९२८४९५१५७१
डॉ. गणेश गादेगावकर, ९८६९१५८७६०
(पशुवैद्यक व पशू विज्ञान महाविद्यालय, उदगीर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com