Compost Fertilizer Agrowon
टेक्नोवन

Compost Fertilizer Production: कंपोस्ट खत निर्मिती तंत्र करतेय जमिनीला सशक्त

Soil Fertility: जमिनीची सुपीकता व पीक उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने विदर्भातील शेतकरी बायोडायनॅमिक कंपोस्ट खताची निर्मिती व वापराकडे वळले आहेत.

 गोपाल हागे

Agriculture Tips: जमिनीची सुपीकता व पीक उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने विदर्भातील शेतकरी बायोडायनॅमिक कंपोस्ट खताची निर्मिती व वापराकडे वळले आहेत. त्यांना स्थानिक स्वयंसेवी संस्थेचे तांत्रिक मार्गदर्शन त्यातून मिळते आहे. हे खत तयार करण्याची पद्धत सोपी आहे. त्यासाठी बाहेरून निविष्ठा आणण्याची गरज नसून केवळ पीकअवशेषांचा वापर व जिवाणू कल्चर यांचा वापर करून शेतकरी या तंत्रनिर्मितीत कुशल झाले आहेत.

सेंद्रिय किंवा नैसर्गिक शेतीकडे अधिकाधिक शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. जमिनीची सुपीकता, तिचे आरोग्य याबाबत अधिकाधिक शेतकरी गंभीर झाले आहेत. त्यातून पर्यावरणाचे आरोग्य जपताना रासायनिक अवशेषमुक्त उत्पादन घेऊ लागले आहेत. यामध्ये त्यांना विविध संस्था, शासकीय योजनांच्या पाठबळाचा फायदाही निश्‍चित होतो आहे. विदर्भात अनेक वर्षांपासून सर्ग विकास समिती ही स्वयंसेवी संस्था कार्यरत असून अकोला येथे मुख्यालय आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन, परंपरागत कृषी विकास योजना आदींच्या माध्यमातून संस्था शासनाच्या विविध संस्थांसोबत कार्य करीत आहे. यात सेंद्रिय शेती व बायोडायनॅमिक कंपोस्ट खत निर्मितीवर भर देण्यात आला आहे. सर्ग विकास समितीच्या माध्यमातून विदर्भात एकूण चारहजार हेक्टरपर्यंत क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली किंवा रूपांतरित क्षेत्राखाली आले आहे.

यात सहा हजार शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन देण्यात येत आहे. संस्थेतर्फे शेतकऱ्यांसाठी जैविक शेती प्रशिक्षण आयोजित केले जाते. त्यात पीक अवशेषांपासून व एस ९ या जिवाणू कल्चरपासून बायोडायनॅमनिक कंपोस्ट खत निर्मितीचे प्रात्यक्षिक करून घेण्यात येते. त्याचबरोबर जिवामृत, दशपर्णी अर्क यांची निर्मिती, नैसर्गिक पद्धतीने कीटक नियंत्रणाचे उपाय, पीक फेरपालट व आंतरपीक पद्धती यावर जोर देण्यात येतो. हे तंत्रज्ञान अनेक शेतकऱ्यांनी अंगीकारले आहे.

पीक अवशेषांपासून खत निर्मिती

मुख्य पीक काढणीनंतर सोयाबीन, उडीद, मूग, हरभरा यांचे काड, उसाचे पाचट, हिरव्या ताज्या पऱ्हाटी यांचा वापर करून बायो डायनॅमिक कंपोस्ट खत तयार करणे सोपे जाते. सर्ग विकास समितीचे तज्ज्ञ प्रशिक्षक सांगतात की या खतात सेंद्रिय खत कर्बाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात तसेच नत्र २ टक्के, स्फुरद १ टक्का व पालाश १ टक्का असे प्रमाण असते. एक एकरातील पीक अवशेषांपासून दीड ते दोन टनांपर्यंत बायोडायनॅमिक कंपोस्ट तयार होते. यासाठी ७५ ते ९० दिवसांचा कालावधी पुरेसा असतो.

पीक काढणी झाल्यानंतर शेतातच १५ बाय ५ बाय लांबी रुंदी व एक फूट उंची या आकाराचा एक फुटाचा थर लावला जातो. त्यात कंपोस्टिंग एस ९ कल्चरचा वापर होतो. या पद्धतीबरोबर ड्रममध्ये ५० किलो शेणकाला तयार करून त्यामध्ये संपूर्ण कल्चर वापरून खत तयार करण्याचीही दुसरी पद्धती आहे. शेतकरी कंपोस्ट खत निर्मितीसाठी गोठ्यातील शेण, पालापाचोळा यांचा योग्य प्रमाणात वापर करतात. काही शेतकऱ्यांनी गांडूळ खत निर्मिती युनिट्स उभारले आहेत. संस्थेतर्फे अनेक शेतकऱ्यांकडे बायोडायनॅमिक कंपोस्ट बेड लावण्यात आले आहेत.

होत असलेले फायदे

समितीचे प्रशिक्षक वंजारे सांगतात, की हे कंपोस्ट खत तयार करण्याची पद्धती सोपी आहे. विशेष म्हणजे यात पीक अवशेषांचाच मुख्य वापर करायचा आहे. या खतामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होते. जमीन भुसभुशीत होते. पावसाळ्यात पावसाचे पाणी धरून ठेवण्याची जमिनीची क्षमता सुधारते. अतिरिक्त पाण्याचा निचरा होण्यास मदत होते. पिकांची मुळे खोलवर जातात. लाभदायक सूक्ष्मजीव संपत्ती मातीत पुन्हा निर्माण होण्यास मदत होते. या खताच्या वापरामुळे रासायनिक खतांवरील ‘खर्च बऱ्याच अंशी कमी करणे शेतकऱ्यांना शक्य झाले आहे. या मातीतून उत्पादित शेतीमालाचा दर्जा सकस असतो. आता सेंद्रिय शेतीला चांगली चालना मिळून काही शेतकऱ्यांनी गटशेतीद्वारे सेंद्रिय प्रमाणपत्र घेण्यास सुरुवात केली आहे.

शेतकरी अनुभव

विवरा (ता. पातूर, जि. अकोला) येथील देविदास धोत्रे २०१० पासून बायोडायनॅमिक शेती पद्धतीकडे वळले. त्यापूर्वी ते रासायनिक शेती करायचे. त्या वेळी खर्चाचा ताळमेळ बसत नव्हता. सुरुवातीला ते ते एकरी तीन ट्रॉली कंपोस्ट खत वापरायचे. आता वर्षाला दोन ट्रॉलीपर्यंत वापर होतो. धोत्रे यांची साडेचार एकर शेती असून, त्या संपूर्ण शेतीत ते या तंत्राचा वापर करतात. भाजीपाला, कांदा, सीताफळ, लिंबू, कोबी व यंदा एक एकरात बडीशेप अशी पीक पद्धती त्यांनी अवलंबिली आहे.

देविदास धोत्रे ९४२३८४९७३१

इसरूळ मंगरूळ (ता. चिखली, जि. बुलडाणा) येथील लिंबाजी सुरुशे यांची नऊ एकर शेती आहे. ते सन २०१६ वर्षांपासून कंपोस्ट खत पद्धतीने साडेपाच ते सहा एकर शेतीचे व्यवस्थापन करतात. तूर, सोयाबीन, हरभरा आदी पिके ते घेतात. शेतातच कंपोस्ट खत तयार करतात. पाऊस झाल्यानंतर एकदा व ठरावीक अंतराने पुढील मात्रा या पद्धतीने त्याचा वापर होतो. तुलनात्मक म्हणून त्यांनी दोन एकर क्षेत्र राखीव ठेवले आहे.

त्यात रासायनिक खतांचा वापर होतो. कंपोस्ट खताचा सातत्यपूर्ण वापर व व्यवस्थापनातून त्यांनी पीक उत्पादकता वाढवली आहे. पूर्वी तुरीचे एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन त्यांना मिळायचे. आता ते १० ते ११ क्विंटलपर्यंत मिळते. सोयाबीनचे एकरी सात ते आठ क्विंटल मिळणारे उत्पादन ही तीन ते चार क्विंटलने वाढले आहे. यंदा तीन एकरांत तुरीचे ३४ क्विंटल उत्पादन मिळाले आहे. काबुली हरभऱ्याचे एकरी नऊ ते १० क्विंटल उत्पादन मिळाले आहे.

- अभिजित वंजारे ७८७५३२९८३१ तज्ज्ञ प्रशिक्षक, सर्ग विकास समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT