
Agricultural Waste Management :
पाचट कुजविण्याच्या पद्धती
खड्डा पद्धत
एक टन पाचटासाठी ४ मीटर लांब, २ मीटर रुंद आणि १ मीटर खोल खड्डा तयार करावा. त्यात तुकडे केलेले पाचट २५ ते ३० सेंमी जाडीच्या थराने भरावे. प्रत्येक थरावर पाचट ओले करून त्यावर जिवाणू संवर्धक मिश्रित शेणकाला शिंपडावा, तसेच युरिया व सुपर फॉस्फेट टाकावे.१०० किलो शेणाचा काला वापरावा. शेणकाला करताना शेण व पाणी १०:५ प्रमाणात वापरावे.
सर्व थर भरून झाल्यावर पाचटाची वरील बाजू चिखलमातीने बंद करावी.
दीड ते दोन महिन्यांनी खड्डा उघडून पाचट चांगले मिसळून घ्यावे. थोडे पाणी शिंपडावे. खड्डा पुन्हा चिखलमातीने बंद करावा.
ढीग पद्धत
ही पद्धत खड्डा पद्धतीसारखीच आहे. फक्त पाचट खड्ड्यात टाकून कुजवण्याऐवजी ढीग करून कुजवतात.
लागवड केलेल्या उसामध्ये पाचट कुजविणे
पाचट गोळा करून ते नवीन ऊस लागवड करावयाच्या प्रत्येक सरीमध्ये दाबून घ्यावे.
१ टन पाचटासाठी म्हणजे १० गुंठे क्षेत्रासाठी ८ किलो युरिया आणि १० किलो सिंगल सुपर फॉस्फेट १०० लिटर पाण्यामध्ये द्रावण करून पाचटावर शिंपडावे.
१०० लिटर पाणी, १०० किलो शेण तसेच १ किलो कंपोस्ट जिवाणू संवर्धक याचा शेणकाला पाचटावर शिंपडावा. रिजरच्या साहाय्याने सरीचा वरंबा करून सर्व पाचट झाकून घ्यावे. चार ते साडेचार महिन्यामध्ये सरीमधील पाचट कुजून शेतातच चांगले खत तयार होते.
पाचट जाळल्याचे तोटे
सेंद्रिय कर्ब, नत्र, स्फुरद आणि पालाश यासारख्या अन्नद्रव्यांचा नाश होतो.
पाचट जाळल्यास खोडव्याची उगवण क्षमता ६८ टक्के राहते. मात्र पाचट न जाळता केलेल्या योग्य व्यवस्थापनामुळे ती ८२ टक्के राहते.
पिकांची वाढ खुंटते.पर्यावरणावर विपरीत परिणाम होतो.
जमिनीच्या वरील थरातील सूक्ष्मजिवांचे प्रमाण कमी होते; तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी होते. परिणामी, जमिनीची सुपीकता व भौतिक स्थिती बिघडते.
पाचट लवकर न कुजण्याची कारणे
पाचटामधील कर्बः नत्र यांचे गुणोत्तर हे १२२:१ असे असते. यातील कर्बाचे प्रमाण अधिक असले तरी नत्राची उपलब्धता कमी असल्याने जिवाणूंना पाचट कुजविण्यासाठी अधिक वेळ लागतो.
कर्बामुळे जिवाणूंना ऊर्जा मिळते; तर नत्रापासून प्रथिने मिळतात. जिवाणूंच्या चांगल्या वाढीसाठी पिकांच्या अवशेषांतील कर्ब नत्र गुणोत्तर २४:१ असे असावे. असे गुणोत्तर शेणखत किंवा कंपोस्ट खतामध्ये असते. त्यामुळे त्यामध्ये जिवाणूंचे प्रमाण अधिक असते.
शेतात पाचट लवकर कुजविण्यासाठी उपाय
ऊस खोडवा कटर यंत्राचा वापर: ऊस तुटून गेल्यानंतर यंत्राच्या साह्याने बुडखे छाटणे, बगला फोडणे व खते देणे ही सर्व कामे एकाच वेळी केली जातात. ऊस तुटून गेल्यानंतर बुडखे जमिनीलगत कापून वरंब्याच्या दोन्ही बगला हलक्या फोडल्या जातात. त्यामुळे जुनी मुळे तुटून नवीन कार्यक्षम मुळे वाढतात. बगला फोडलेली माती सरीतील पाचटावर टाकली जाते, त्यामुळे पाचट लवकर कुजण्यास मदत होते.
पाचट कुट्टी यंत्राचा वापर: कुट्टी केल्यामुळे पाचटाचे छोटे छोटे तुकडे होऊन पाचटाचा पृष्ठभाग वाढतो त्यामुळे जास्तीत जास्त पाचट मातीच्या संपर्कात येऊन लवकर कुजते.
नत्रयुक्त खतांचा वापर: पाचटाचे कर्बः नत्र गुणोत्तर २४:१ च्या जवळ आणण्यासाठी उसाच्या पाचटातील नत्राचे प्रमाण वाढवले पाहिजे. त्यासाठी पाचटावर बाहेरून नत्र (युरिया) टाकावा.
जैविक स्लरीचा वापर: स्लरी तयार करण्यासाठी १० लिटर गोमूत्र, १० किलो शेण, २ किलो गूळ, २ किलो बेसन पीठ, ५ लिटर ताक हे सर्व घटक १७० लिटर पाण्यात मिसळून दोन ते तीन दिवस भिजवून ठेवावे. त्यामध्ये पाचट कुजविणारे जिवाणू संवर्धक मिसळून जमिनीतून द्यावे. साधारणपणे एक टन पाचट कुजण्यासाठी एक किलो जिवाणू संवर्धक वापरावे. संपूर्ण शेतामध्ये सायंकाळी ही स्लरी शिंपडावी त्यामुळे पाचट कुजण्याचा वेग वाढतो.
जिवाणू कल्चरचा वापर :
तामिळनाडू कृषी विद्यापीठाचे ‘बायोमिनरलायझर’ हे जिवाणू कल्चर विकसित केले आहे. या कल्चरमुळे कुजण्याच्या प्रक्रियेला वेग मिळतो. उसाचे पाचट सरी मध्ये लोटल्यानंतर खोडव्याला पाट पाणी देऊन ते पाचट पायात गम बूट घालून दाबावे. त्यामुळे जास्तीत जास्त पाचट माती आणि पाण्याच्या संपर्कात येऊन लवकर कुजण्यास मदत होते.
एकरी पाच पाचटामधून मिळणाऱ्या घटकांचे प्रमाण
मिळणारे घटक प्रमाण एकरी मिळणारे घटक
सेंद्रिय कर्ब (खत) ३२ ते ४० % २ ते ३ टन
नत्र ०.४ ते ०.५ % १६ ते २० किलो
स्फुरद ०.१५ ते ०.२० % ८ ते १२ किलो
पालाश ०.७ ते १ % ३० ते ४० किलो
कॅल्शिअम ०.४२ ते ०.५४ % २० ते २५ किलो
मॅग्नेशिअम ०.१२ % ५ ते ६ किलो
लोह २०४५ पीपीएम -
मॅगेनीज २३६ पीपीएम -
झिंक २५.७ पीपीएम -
तांबे १६.८ पीपीएम -
- पांडुरंग काळे,
७३५०८४४१०१
(विषय विशेषज्ञ (कृषीविद्या), श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी, ता. करवीर, जि. कोल्हापूर)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.