अकोला येथील मयूर पठाडे हा तरुण वाहन दुरुस्ती व्यवसायात नोकरी करायचा. अळिंबी उत्पादनाचा मार्ग त्याला गवसला. आपल्या घरच्या टेरेसवर कमी गुंतवणुकीत, उपलब्ध साधनसामग्रीचा योग्य वापर करून केव्हीकेतील शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनातून त्याने धिंगरी अळिंबीचे (मशरूम) दर्जेदार उत्पादन घेण्याचे तंत्र आत्मसात केले. आज या व्यवसायातून त्याने महिन्याला चांगल्या पगाराप्रमाणे उत्पन्न घेण्यास सुरवात केली आहे. पूर्णवेळ रोजगार देणारा, स्थिर, फायदेशीर असा त्याच्यासाठी हा व्यवसाय ठरला आहे..अकोला शहरातील मेहरेनगर येथे राजेंद्र मधुकर पठाडे यांचे कुटुंब राहते. त्यांची भौरद शिवारात तीन एकर कोरडवाहू शेती आहे. राजेंद्र शहरातील होलसेल किराणा मार्केटमध्ये नोकरी करतात. त्यांचा मुलगामयूर (वय वर्षे २७) याने शिक्षण पूर्ण केल्यानंतर इलेक्ट्रिक दुचाकी विक्री केंद्रात नोकरी धरली. कुटुंबाला तोही आर्थिक हातभार लावू लागला. परंतु म्हणावा तसा पगार नव्हता. समाधान नव्हते. स्वतःचा व्यवसाय उभारून उत्पन्नस्त्रोत वाढवायचे हे डोक्यात होते. म्हणता म्हणता तीन वर्षे नोकरीचा अनुभव तयार झाला. .Mushroom Farming: आईच्या प्रेरणेतून साकारलेला मशरूम उद्योग.अखेर जिद्दी मयूरने शेतीतच काहीतरी करायचे या उद्देशाने २०२२ मध्ये अकोला कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधला. तिथे विविध प्रक्रिया उद्योगांविषयी माहिती घेताना धिंगरी मशरूम (ऑयस्टर मशरूम) उत्पादनाबाबत माहिती मिळाली. व्यवसायाची वैशिष्ट्ये, उत्पादनाची शास्त्रशुद्ध बाजारपेठ, अर्थकारण या बाबी जाणून घेतल्या. सोशल मीडियाचाही त्यासाठी आधार घेतला. त्यानंतर व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.वडिलांनाही मुलाच्या इच्छेला पाठिंबा दिला..उत्पादन निर्मितीचे तंत्र जाणले कृषी विज्ञान केंद्राकडून मयूरने धिंगरी अळिंबी उत्पादन तंत्राचे सहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले. केव्हीकेच्या विषय तज्ज्ञ तथा प्रशिक्षक कीर्ती देशमुख यांनी केलेले वैज्ञानिक मार्गदर्शन आणि त्यानंतरही वेळोवेळी सतत मिळणारे तांत्रिक साहाय्य अत्यंत मोलाचे ठरले. त्यातून उत्कृष्ट बीज (Spawn), कच्चा माल निवड, आर्द्रता-तापमान नियंत्रण, शेड व्यवस्थापन, वर्षभरात साखळी पद्धतीने बॅच घेण्याचे तंत्र, उत्पादन मूल्यवर्धन, मार्केटिंग व ब्रँडिंग, पॅकेजिंग आणि गुणवत्ता नियंत्रण या सर्व तांत्रिक बाबी शिकता आल्या. आत्मसात करता आल्या. अकोला तापमानाच्या दृष्टीने अतिउष्ण शहर मानले जाते. उन्हाळ्यात येथे तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोचते. मशरूम लागवडीसाठी १८ ते ३० अंश से. तापमान आणि ७० ते ८५ टक्के आर्द्रता आवश्यक असते. परंतु प्रतिकूल हवामानात मशरूम उत्पादनाचे आव्हान मयूरने स्वीकारले..Mushroom Production: अळंबी उत्पादनातून महिला झाल्या सक्षम.उत्पादन निर्मितीचा सेटअपकमी गुंतवणुकीत, कमी खर्चात आपल्या १८०० चौरस फूट घराच्या टेरेसवर उत्पादन निर्मितीचा सेटअप तयार केला. तिथे मशरूम बेड्ससाठी सुविधा तयार केली. उन्हाळ्यात प्रामुख्याने व अन्य काळासाठीही तापमान नियंत्रणासाठी सुमारे २५.फॉगर्सची व्यवस्था उभी केली. ग्रीननेटने परिसर झाकून घेतला. टेरेसवरही आच्छादन केले. टेरेसच्या बाजूंना पोती पसरवली. त्यातून आर्द्रता तयार केली. त्यासाठी नियमितपणे स्प्रिंकलरचाही वापर केला. आज सुमारे चारशे बेड्सची क्षमता आहे. साखळी पद्धतीने बेड लावण्यात येतात. त्यातून दररोज सात ते दहा किलो ताजे मशरूम मिळते अशी व्यवस्था आहे. विज्ञानाधारित पद्धत आणि मेहनतीतून मशरूमची गुणवत्ता कायम टिकून राहण्यास मदत झाली आहे.व्यवसायासाठी लागणारे बीज या क्षेत्रातील अनुभवी व्यावसायिकाकडून घेण्यात येते, त्याचबरोबर सोयाबीन, गहू, तूर यांचे कुटारही कमी खर्चात उपलब्ध होते. या कच्च्या मालावर रीतसर प्रक्रिया केली जाते. सुरवातीचे २० दिवस बेड अंधाऱ्या खोलीत (डार्क रूम) ठेवले जातात. .उत्पादन व मूल्यवर्धनप्रति बॅच एकूण चारशे ते पाचशे किलोपर्यंत मशरूमचे उत्पादन मिळते. वर्षभरात सुमारे सहा बॅचेस होतात. श्रीनाथ कृपा असा ब्रँड तयार केला आहे. आवश्यक सर्व शासकीय संमती प्रमाणपत्रे, पॅकेजिंग डिझाईन, लेबलिंग, दर्जा नियंत्रण या सर्व प्रक्रियांचे शास्त्रशुद्ध पद्धतीने पालन केले आहे. बाजारातील मागणी ओळखून ताज्या मशरूमचे २०० ग्रॅमचे पनेट पॅकिंग तयार केले आहे. अकोला शहरातील भाजीपाला विक्रेते, डेअरी, सुपर शॉप्स, हॉटेल्स तसेच थेट ग्राहकांना पुरवठा होतो. दिवसाला ८ ते १० किलोची सातत्यपूर्ण विक्री स्थिर उत्पन्न मिळवून देत आहे. ताज्या उत्पादनाबरोबरच मूल्यवर्धनावरही लक्ष केंद्रित केले आहे. ग्राहकांची मागणी ओळखून ग्राईंडरच्या साह्याने पावडर तयार केली जाते..त्याचे शंभर ग्रॅम वजनी पॅकिंग केले असून त्याची १५० ते २०० रुपये किंमत आहे. मशरूम पापड, लोणचे आणि सूप पावडर अशीही उत्पादने विकसित केली आहेत. धिंगरी मशरूममध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आहेत .त्यामुळे ते रोग प्रतिकारशक्ती वाढवते. आरोग्यविषयक अन्य फायदेही होतात. कोरोना काळानंतर ग्राहक आरोग्याकडे अधिक लक्ष देऊ लागल्याने मशरूमला मागणी अधिक वाढली आहे. प्रक्रियेमुळे केवळ विक्री वाढीलाच चालना मिळाली असे नाही तर उत्पादनांचे नुकसानही बरेच कमी करण्यात यश मिळाले..व्याप्ती वाढविणारमयूरच्या प्रवासात आई सुनीता, वडील राजेंद्र त्याचबरोबर बहीण अंकिताने मोठी भूमिका बजावली आहे. पॅकेजिंग, स्वच्छता, विक्री, कामांचे नियोजन अशा प्रत्येक टप्प्यावर कुटुंब त्याच्यासोबत उभे राहिले. हीच साथ यशाचा पाया मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरली. येत्या काही वर्षांत उत्पादन क्षमता वाढवण्याचा व प्रक्रियायुक्त ‘ब्रँडेड’ उत्पादने उपलब्ध करण्याचे ध्येय आहे. ऑनलाइन विक्री, ‘होम डिलिव्हरी’ यासारख्या पुढील योजना आहेत. मात्र मर्यादित साधनसामग्री, प्रतिकूल हवामान, आर्थिक अडचणी या सर्व अडथळ्यांना मागे टाकून मयूरसारख्या युवकाने स्वतःसाठी सक्षम रोजगार तयार केला ही महत्त्वाची बाब म्हणावी लागेल.मयूर पठा़डे ९६०४९११७८२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.