Kardai Agrowon
टेक्नोवन

Safflower Harvesting : करडई काढणीसाठी कम्बाइन हार्वेस्टर फायदेशीर

Team Agrowon

डॉ. शहाजी शिंदे

Harvesting of Safflower crop through combine harvester : करडई पिकाची काढणी योग्य वेळी करणे अत्यंत गरजेचे आहे. वाणनिहाय करडई पीक साधारण १२० ते १४० दिवसांत काढणीस तयार होते. पिकाची पाने व बोंडे पिवळी पडल्यानंतरच काढणी करणे आवश्यक आहे. पीक परिपक्व झाल्यावर पानांवरील तसेच फुलांवरील काटे वाळतात आणि टणक होतात.

त्यामुळे काढणी करतेवेळी हे काटे हाताला आणि पायांना टोचून इजा होते. त्यामुळे काढणीसाठी मजुरांची उपलब्धता होण्यास अडचणी येतात. अशावेळी जास्त मजुरी देऊन काढणी करावी लागते. परिणामी उत्पादन खर्चात मोठी वाढ होते. करडई पीक काढणी वेळी मजुरांची समस्या ही बाब नित्याचीच झाली आहे. त्यामुळे शेतकरी करडई लागवड करण्याचे टाळत असल्याचे दिसून येते.

तसेच नवीन विभागांत करडई पिकाचा विस्तार न होण्यामागे देखील याच बाबी कारणीभूत असल्याचे दिसून येते. त्यासाठी करडई काढणी व मळणी करण्यासाठी कंबाइन हर्वेस्टरचा वापर फायदेशीर ठरतो. कम्बाइन हार्वेस्टरद्वारे करडई पिकाची काढणी करण्यासाठी पिकाची लागवड सलग पद्धतीने करणे आवश्यक आहे. तसेच पीक काढणीस तयार झाल्यानंतरच योग्य अवस्थेला पिकाची काढणी करणे गरजेचे आहे.

कम्बाइन हार्वेस्टरचे फायदे

या यंत्रामुळे काढणी व मळणीची कामे सोपी व सुटसुटीत होतात.

कमी वेळात पिकाची काढणी होते. काढणी खर्चात देखील बचत होते.

काढणीवेळी करडईच्या झाडाचे बारीक तुकडे होऊन शेतात विखुरले जातात. हे तुकडे जमिनीत मिसळून कुजल्यामुळे त्याचा जमिनीस फायदा होतो.

यंत्राद्वारे काढणी केली असता स्वच्छ धान्य उपलब्ध होते.

बऱ्याच वेळा शेतकरी थेट शेतामधूनच करडई विक्रीसाठी बाजारात घेऊन जातात. अशावेळी या यंँत्राचा वापर फायदेशीर ठरतो.

या यंत्राच्या माध्यमातून मजूर टंचाईवर मात करणे शक्य होते.

काढणीसाठी होणाऱ्या मजुरी खर्चात बचत होत असल्याने पिकाचे क्षेत्र वाढण्यास मदत होईल.

उत्पादन

करडई लागवडीसाठी सुधारित तंत्रज्ञानाचा वापर केल्यास कोरडवाहू पिकाचे मध्यम जमिनीत १० ते १२ क्विंटल तर भारी जमिनीत १५ ते १७ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते. संरक्षित २ पाणी दिले असेल तर २० ते २२ क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते.

करडईच्या तेलात संपृक्त स्निग्ध आम्लाचे प्रमाण इतर तेलाच्या तुलनेत बरेच कमी असते. त्यामुळे ह्रदयरोग तसेच रक्तदाबाचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे तेल आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. या तेलाच्या वापरामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवली जाते. तसेच करडईच्या पाकळ्यांचा वापर देखील आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो.

काढणीची योग्य वेळ

वाणनिहाय करडई पीक १२० ते १४० दिवसांत काढणीस तयार होते. करडई पिकाची काढणी झाडावरील सर्व पाने, बोंडे पिवळी पडून वाळल्यांनतर तसेच झाडाच्या फांद्या व दाणे टणक झाल्यावर करावी. पीक जास्त वाळले तर काढणी करताना बोंडे तडकून त्यातील दाणे गळण्याची शक्यता असते. त्यासाठी पिकाची काढणी वेळेवर करणे अत्यंत गरजेचे आहे.

करडई पिकाची पक्वता ही जातीनुसार, प्रदेशानुसार, पेरणीची वेळ, जमिनीचा प्रकार, व ओलाव्याची उपलब्धता यावर अवलंबून असते. महाराष्ट्र ,कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामध्ये हे पीक साधारणपणे चार ते साडेचार महिन्यात तयार होते. तर मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, छत्तीसगढ या राज्यात पीक तयार होण्यास पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लागतो.

कोरडवाहू पीक १२० ते १३० दिवसांत तयार होते, तर बागायती करडई पीक तयार होण्यास १३० ते १४० दिवसांचा कालावधी लागतो.

ज्वारी, हरभरा किंवा जवस अशा पिकात आंतरपीक किंवा पट्टा पद्धतीने लागवड केली असल्यास आणि काढणीसाठी कंबाइन हार्वेस्टर यंत्र उपलब्ध नसेल तर अशा करडई पिकाची मजुरांच्या मदतीने काढणी करावी. काढणी सकाळच्या वेळेस करावी. सकाळी तापमान कमी असते. आर्द्रतेचे प्रमाण जास्त असल्याने करडईचे काटे नरम पडलेले असतात. तसेच बोंडे तडकून बी गळण्याचे प्रमाण देखील यावेळी कमी असते.

मजुरांच्या मदतीने काढणी करताना किलतान किंवा पोत्यापासून बनविलेले किंवा रबरी मोजे वापरल्यास हातांना आणि पायांना काटे टोचून इजा होत नाही.

काढणीवेळी धारदार विळ्याने झाडाची कापणी जमिनीलगत करावी. कापलेल्या झाडांचे छोटे ढीग करावेत. ढीग करताना कापलेला बुडख्याचा भाग मध्यभागी व फांद्या आणि शेंडे बाहेरील बाजूस या पद्धतीने रचावेत. असे ढीग ७ ते ८ दिवस वाळू द्यावेत. त्यानंतर खळ्यात किंवा ताडपत्रीवर घेऊन काठीच्या मदतीने बडवावेत. किंवा मळणी यंत्राने मळणी करावी.

मळणी केल्यानंतर उफणणी करून धान्य स्वच्छ करावे. साठवण करण्यापूर्वी चांगले ऊन देऊन नंतर पोत्यात भरून साठवण करावी.

डॉ. शहाजी शिंदे, ९६८९६१७०६६

(लेखक निवृत्त करडई पैदासकार आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : शिरूरमधील शेतकऱ्यांचे वादळ, पावसामुळे पिकांचे नुकसान

Maharashtra Politics : छत्रपती शिवरायांचे विचार घेऊनच काँग्रेसचा लढा

Neera Karha Upsa Irrigation Scheme : बारामतीचा जिरायत शिक्का पुसणार

Agriculture Input Subsidy : निविष्ठांचे अनुदान मिळण्यासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

Bioplastic Production : ‘बायो प्लॅस्टिक’ चे उत्पादन वाढविणे काळाची गरज

SCROLL FOR NEXT