Ethanol
Ethanol Agrowon
संपादकीय

Ethanol Blending : इथेनॉल आख्यान

रमेश जाधव

या वर्षीच्या ऊस गळीत हंगामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यातच भारतातच नव्हे, तर जगभरात प्रतिकूल परिस्थितीमुळे उसाचे पर्यायाने साखरेचेही उत्पादन घटणार आहे. भारतात तसेच जागतिक पातळीवरही जेमतेम गरजेपुरते, किंबहुना त्याहूनही कमी साखर उत्पादनाचा अंदाज आहे.

साखरेला मागणी वाढून दरही वधारून राहतील. त्यामुळे कारखान्यांचा कल इथेनॉलऐवजी साखर उत्पादनाकडे राहील, असे चित्र दिसते. अशा परिस्थितीत नोव्हेंबर २०२२ ते ऑक्टोबर २०२३ पेट्रोलमध्ये १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य आपण पार केले असून, पुढील इथेनॉल वर्षात (डिसेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४) १५ टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. एवढेच नव्हे तर आधी २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट ठेवून हा टप्पा २०२३ मध्येच गाठायचा, असा केंद्र सरकारद्वारे निर्धारही करण्यात आला होता.

आता २०२३ हे वर्ष तर संपत आले आहे. परंतु पुढील दोन वर्षांत म्हणजे २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट गाठणे मोठे आव्हानात्मक काम वाटते. इथेनॉलचे देशांतर्गत उत्पादन ८०० ते ९०० कोटी लिटर आहे. पेट्रोलमध्ये २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठायचे असेल तर आपल्याला १७०० ते १८०० कोटी लिटर इथेनॉल लागणार आहे. अर्थात पुढील दोन वर्षांत इथेनॉल उत्पादनात दुपटीने वाढ करावी लागेल.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जैवइंधन धोरणानुसार इथेनॉल निर्मिती आणि वापरास प्रोत्साहन दिले जात असले, तरी यात अनेक अडचणींचा सामना कारखान्यांना करावा लागतोय. जागतिक बाजारातील साखरेची मागणी, मिळणारा दर यानुसार उसापासून साखरेचे उत्पादन कमी-जास्त करून त्यानुसार इथेनॉल निर्मिती करण्याचा निर्णय बहुतांश देश घेतात. आपल्याकडे मात्र अजूनही उसापासून साखर उत्पादनालाच प्राधान्यक्रम दिला जातो.

या वर्षी तर साखरेला मिळणाऱ्या अपेक्षित अधिक दरामुळे कारखान्यांना इथेनॉलपेक्षा साखरच सरस वाटू लागली आहे. कारखान्यांना इथेनॉल निर्मिती प्रकल्पांना मान्यता दिली जात असली तरी त्याचे प्रगत तंत्रज्ञान अजूनही आपल्याकडे नाही. प्रकल्प उभारणीत आर्थिक अडचणींचा सामनाही अनेक कारखान्यांना करावा लागतोय. मागील काही वर्षांत इथेनॉलच्या दरात वाढ झाली असली, तरी इथेनॉलच्या गुणवत्तेनुसार प्रतिलिटर १० रुपयांपर्यंत दर वाढून मिळावेत, अशी उद्योगाची अपेक्षा आहे.

महत्त्वाचे म्हणजे इथेनॉल साठवणुकीबाबत साखर कारखाने आणि तेल कंपन्या एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत. राज्यात तयार झालेले इथेनॉल तत्काळ विकत घेत त्याची साठवणूक तेल कंपन्यांनी करावी, असे कारखान्यांना वाटते तर तेल कंपन्या कारखाना परिसरात इथेनॉल साठवणुकीस आग्रही आहेत. इथेनॉल साठवणुकीसाठी मोठ्या टाक्या उभाराव्या लागणार असल्याने हे काम तेल कंपन्यांनीच करावे, आर्थिक अडचणीत असलेल्या कारखान्यांवर हा भुर्दंड लादू नये. इथेनॉल वाहतूक, प्रत्यक्ष वापरातही अनेक तांत्रिक अडचणी असून त्याही सर्वांच्या समन्वयातून दूर करायला हव्यात.

उसापासून तसेच धान्यापासून इथेनॉल निर्मितीला खूप मर्यादा आहेत. धान्याचा मानवाला खाण्यासाठी, खराब धान्याचा पशु-पक्ष्यांच्या खाद्यात याचा वापर होतो. कोरोना महामारी, रशिया-युक्रेन युद्धानंतर सर्वच देश अन्नसुरक्षेला प्राधान्य देत आहेत. त्यातच जगातील बहुतांश देशांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे अन्नधान्य उत्पादन घटत आहे. अशावेळी इथेनॉल उत्पादन वाढवून पेट्रोलमध्ये २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी पीक अवशेषांसह शेतीतील टाकाऊ पदार्थ, तसेच इतरही इथेनॉलचे स्रोत शोधून त्यापासून इथेनॉल उत्पादन घ्यावे लागणार आहे. असे केले तरच शेतकऱ्यांचे अर्थकारण सुधारेल तसेच पुढील दोन वर्षांत इथेनॉल उत्पादन दुपटीने वाढून पेट्रोलमध्ये २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट आपल्याला गाठता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nursery Business : ‘नर्सरी, लॅंडस्केपिंग, गार्डनिंग’ व्यवसायातील कुशल निकीता

Dairy Business : विदर्भात दुग्ध व्यवसायाला तयार केली बाजारपेठ

Smart Meters : ‘स्मार्ट मीटर्स’ म्हणजेच खासगीकरणाकडे वाटचाल

Cotton Rate : शेतकऱ्यांच्या ‘सोन्या’चे दर कधी वाढणार?

Crop Damage : कंदर भागात वादळी वाऱ्यामुळे केळी, ऊस, पपई भुईसपाट

SCROLL FOR NEXT