Ethanol Blending : पेट्रोलमध्ये १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य पार

Ethanol Production : भारताने पेट्रोलमध्ये १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य पार केले आहे. नोव्‍हेंबर २०२२ ते ऑक्‍टोबर २०२३ अखेरच्या इथेनॉल वर्षात भारताने हा टप्पा गाठला आहे.
Ethanol Production
Ethanol ProductionAgrowon

Kolhapur News : भारताने पेट्रोलमध्ये १२ टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य पार केले आहे. नोव्‍हेंबर २०२२ ते ऑक्‍टोबर २०२३ अखेरच्या इथेनॉल वर्षात भारताने हा टप्पा गाठला आहे. पुढील वर्षात म्हणजे डिसेंबर २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीत १५ टक्के मिश्रणाचे लक्ष्य केंद्राने ठेवले आहे. २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल पेट्रोलमध्ये मिश्रण करण्याचे उद्दिष्ट आहे.

अलीकडच्‍या काळात २०२३-२४ इथेनॉल वर्षासाठी तेल कंपन्यांनी ८२५ कोटी लिटर इथेनॉलच्‍या पुरवठ्यासाठी निविदा मागविल्या आहेत. ही मागणी पूर्ण करण्यासाठी केंद्राच्‍या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत.

२०१८ पर्यंत इथेनॉल मिळविण्यासाठी फक्त उसाचा वापर केला जात होता. आता सरकारने मका, बाजरी, फळे आणि भाजीपाला आदी अन्नधान्यांचा समावेश करून इथेनॉल निर्मिती योजनेची व्याप्ती वाढवली आहे.

Ethanol Production
Ethanol Production : इथेनॉल निर्मितीवर भर देणे फायदेशीर

पेट्रोलमध्ये ५ टक्के मिश्रणासह प्रारंभ करून सरकारने २०२२ पर्यंत १० टक्के मिश्रण केले. साखर कारखान्यांनी जास्तीत जास्‍त प्रमाणात इथेनॉल निर्मितीकडे वळावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

फक्त साखर उद्योगावर अवलंबून न राहता केंद्राने अलीकडच्या काही महिन्यांत धान्यांवर आधारित प्रकल्प सुरू करण्‍यासाठीही चाचपणी केली. विशेष करून येथून पुढील काळात मक्यासारख्या पिकांपासून इथेनॉलनिर्मिती व्‍हावी, यासाठी विविध उपाययोजना आखल्‍या जात आहेत.

२०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ट साध्‍य करण्यासाठी केंद्रीय पातळीवरून जोरदार हालचाली सुरू आहेत. सरकारने देशात इथेनॉलचे उत्पादन आणि वापरास प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम आणि उपाययोजना जाहीर केल्या आहेत, ज्यात इथेनॉल पुरवठा साखळीचा विस्तार, इथेनॉल प्रकल्पांची संख्या वाढविणे आणि फ्लेक्स-इंधन वाहनांचा वापर आदींचा समावेश आहे.

Ethanol Production
Ethanol Production : भविष्यात उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती

इथेनॉलचे उत्पादन वाढविण्याचे प्रयत्न

तेल उत्पादक कंपन्यांनी २०२२-२३ मध्ये साखर आधारित डिस्टिलरीजमधून ३७४ कोटी लिटर इथेनॉलची खरेदी करण्याबरोबर १४० कोटी लिटर धान्य-आधारित प्रकल्‍पांकडून खरेदी करण्याचा करार केला होता.

उसाच्या रसापासून बनविलेल्या इथेनॉलचे १३८ कोटी लिटर, तर बी हेवी मोलॅसिसपासून २३० कोटी लिटर इथेनॉल पुरवठ्याचे करार गेल्‍या वर्षी झाले आहेत. सध्या देशातील साखर हंगाम सुरू झाला आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा साखर कारखान्यांनी इथेनॉलचे उत्पादन वाढवावे, यासाठी जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com