Cotton Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Cotton Rate : कापसात यंदाही तेजी राहणार का?

अमेरिकी कृषी खात्यांतर्गत असलेल्या दुसऱ्या युनिटने दिल्लीमधून प्रसिद्ध केलेले भारतातील २०२२-२३ कापूस हंगामाचे आकडे शेतकऱ्यांसाठी चांगलेच उत्साहवर्धक आहेत. या आकड्यांनुसार देशांतर्गत मागणीमध्ये घसघशीत वाढ दाखवली असून, निर्यात देखील सात-आठ लाख गाठींनी जास्त दाखवली आहे. तर आयात तेवढ्याच प्रमाणात कमी अंदाजित केली आहे. तसेच वर्षअखेरीस शिल्लक साठा ११५ दशलक्ष गाठींच्या जागी ९० दशलक्ष गाठींपेक्षा कमी दाखवला आहे. हा अंदाज खरा ठरेल, असे मानण्यास विशेष हरकत नसावी. कारण मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात देखील साधारण अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी अधिकृत अंदाजापेक्षा भारतातून व्यक्त केलेला अंदाज अधिक अचूक ठरला होता. त्यानंतर कापसात काय झाले हे सांगायची आवश्यकता नाही. मात्र यामुळे हुरळून जाऊन आपला माल योग्य किमतीला टप्प्याटप्प्याने विकण्याची खबरदारी घेतली नाही तर पश्‍चात्तापाची वेळ येऊ शकते.

श्रीकांत कुवळेकर

अन्नधान्य (Food Grain) आणि इतर शेतीमाल उत्पादनाचे (Agriculture Production) २०२२-२३ या वर्षासाठी पहिले सरकारी अनुमान प्रसिद्ध झाले आहे. खरिपातील काढणीला (Kharif Season Harvesting) अनेक ठिकाणी नुकतीच सुरुवात झाली असून, पुढील चार-सहा आठवड्यांमध्ये काढणीच्या हंगामाला चांगलाच वेग येईल. विशेषतः कापूस (Cotton) आणि सोयाबीन (Soybean) ही पिके चांगलीच चर्चेत राहतील. आणि त्याबरोबरच अनेक संस्थांची आपापली पीक उत्पादनाची (Crop Production) अनुमाने प्रसिद्ध करण्याची स्पर्धा लागेल. प्रत्येक जण मागील वर्षातील आपले अनुमान कसे जास्त अचूक होते किंवा जर चुकीचे असेल तर त्यात निसर्गाचा भाग कसा होता अशा प्रकारची ‘गिरे तो भी टांग उपर’ अशा प्रकारही कारणमीमांसा देईल.

एक गोष्ट मात्र त्रिवार सत्य. ती म्हणजे ही पीक अनुमाने शब्दशः अंदाजच असतात. बरेचदा ते रामभरोसे असतात किंवा आपल्या संस्थेच्या सभासदांचे हित जोपासणारे अधिक असतात. तर सरकारी अंदाजदेखील अनेकदा खोटे ठरल्याचे दिसून आले असून, त्यावर क्वचितच विश्‍वास ठेवला जातो. तत्कालिन अर्थमंत्री कै. अरुण जेटली यांनी आपल्या एका अर्थसंकल्पीय भाषणात याची नोंद घेतली होती. शिवाय देशात माहिती आणि डेटा या क्षेत्रात निदान एक तरी कार्यक्षम यंत्रणा उभी करण्याची शिफारस केली होती. परंतु त्याला चार वर्षे होऊन गेली तरी अजून परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.

अशा परस्परविरोधी अनुमानांमुळे शेतकरी, प्रक्रिया उद्योजक आणि व्यापारी या प्रत्येक घटकाचे काहीना काही नुकसान होत असते. पर्यायाने त्या त्या उद्योगाचे देखील नुकसान होते. परंतु असा संभ्रम बरेचदा सरकारी यंत्रणेला फायदेशीर ठरतो. मागील दोन वर्षांत सोयाबीन आणि कापूस या महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनाच्या बाबतीत घातलेला घोळ आपण अनुभवला.

अचूक अनुमान हे हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात बाहेर येऊ लागले. परंतु तोपर्यंत उशीर झालेला होता. तोपर्यंत अनेक लहान शेतकऱ्यांनी आपला माल कमी भावात विकून टाकला होता. सर्वात हसे झाले ते कापूस उत्पादनाच्या अंदाजाबाबत. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) हंगामाच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेला सुमारे ३७५ लाख गाठींचा अंदाज हंगामाच्या अखेरीस सुमारे २० टक्के कमी होऊन ३१० लाख गाठींवर आणला. सीएआयने सुरुवातीलाच ३२०-३३० लाख गाठींचा अंदाज दिला असता तर अचानक किमती वाढून उद्योगाला सरकारी रोष ओढवून घ्यावा लागला असता. याकरताच टप्प्याटप्प्याने उत्पादन अंदाज घटवला गेला असे मानण्यास जागा आहे.

यंदाही गोंधळाची स्थिती

या पार्श्‍वभूमीवर परत एकदा कापसात संभ्रम निर्माण होईल अशी परिस्थिती आहे. जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या कापूस उद्योग परिषदेमध्ये सीएआयने कापसाचे भारतातील उत्पादनाचा अंदाज जाहीर केला. त्यामध्ये सावधगिरी पाळल्याचे जाणवते. कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) ही हमीभावाने कापूस खरेदी करणारी संस्था. या संस्थेने कमीत कमी उत्पादन ३६० लाख गाठींचे दाखवले.

परंतु सीएआयने मात्र आपला पवित्रा बदलला. असोसिएशनचे अध्यक्ष अतुल गणात्रा यांच्या म्हणण्यानुसार पुढील काळात हवामान अनुकूल राहिल्यासच ३७५ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित आहे. अन्यथा, ते ३२५ लाख गाठी एवढे कमीदेखील होऊ शकेल. दुसरीकडे केंद्र सरकारच्या पहिल्या अंदाजाप्रमाणे ३७० लाख गाठीच्या लक्ष्याच्या तुलनेत उत्पादन ३४२ लाख गाठी राहील, असे म्हटले आहे.

मागील वर्षीपेक्षा ते १० टक्क्यांनी अधिक आहे. ज्या माहितीवर हे अंदाज बेतले आहेत ती साधारणपणे १० सप्टेंबरपूर्वीची असावी. त्यानंतरच्या १५ दिवसांत पावसाचा बेभरवशीपणा आणि पुढील काळातील हवामान अंदाज पाहता हे आकडे थोडे मोठे वाटत आहेत.

अर्थात, कापसाच्या किमतींवर या आकड्यांचा परिणाम दिसू लागला आहेच. परंतु मागील वर्षीचा अनुभव पाहता हंगामाच्या सुरुवातीलाच अशा मोठ्या आकड्यांवर आधारित निर्णय घेण्याची चूक करण्याइतपत सगळेच शेतकरी अडाणी राहिलेले नाहीत, हे अलीकडे दिसून आले आहे.

यूएसडीएचा अंदाज काय सांगतो?

यापुढे जाऊन आपण अमेरिकी कृषी खात्याचे (यूएसडीए) आकडे पाहिल्यास असे दिसून येईल, की याही वर्षी शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची घाई करू नये. यूएसडीएने १२ सप्टेंबरला २०२२-२३ वर्षाकरिता सप्टेंबर महिन्यातील अधिकृत अंदाज प्रसिद्ध केला. त्यात भारतातील कापूस उत्पादन, वर्षारंभीचा साठा (स्टॉक), आयात, निर्यात, स्थानिक मागणी आणि वर्षअखेरचा शिल्लक राहणारा साठा यांचे आकडे दिले आहेत.

ते देखील कॉटन कॉर्पोरेशनच्या अंदाजाप्रमाणे मोठेच आहेत. मात्र त्याच दिवशी अमेरिकी कृषी खात्यांतर्गत असलेल्या दुसऱ्या युनिटने दिल्लीमधून प्रसिद्ध केलेले भारतातील २०२२-२३ कापूस हंगामाचे आकडे शेतकऱ्यांसाठी चांगलेच उत्साहवर्धक आहेत. या आकड्यांनुसार देशांतर्गत मागणीमध्ये घसघशीत वाढ दाखवली असून, निर्यात देखील सात-आठ लाख गाठींनी जास्त दाखवली आहे. तर आयात तेवढ्याच प्रमाणात कमी अंदाजित केली आहे. तसेच वर्षअखेरीस शिल्लक साठा ११५ दशलक्ष गाठींच्या जागी ९० दशलक्ष गाठींपेक्षा कमी दाखवला आहे.

हा अंदाज खरा ठरेल, असे मानण्यास विशेष हरकत नसावी. कारण मागील वर्षाच्या सप्टेंबर महिन्यात देखील साधारण अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी अधिकृत अंदाजापेक्षा भारतातून व्यक्त केलेला अंदाज अधिक अचूक ठरला होता. त्यानंतर कापसात काय झाले हे सांगायची आवश्यकता नाही. मात्र यामुळे हुरळून जाऊन आपला माल योग्य किमतीला टप्प्याटप्प्याने विकण्याची खबरदारी घेतली नाही तर पश्‍चात्तापाची वेळ येऊ शकते.

कारण या वर्षी जागतिक अर्थव्यवस्थेतील परिस्थिती अगदी उलट आहे. मागील वर्षीची मध्यवर्ती बँकापुरस्कृत रोखसुलभता जाऊन आता रोखीची टंचाई निर्माण होऊ लागली आहे. रुपया कमजोर झाला असला तरी जगावर मंदीचे सावट आहे. विशेषतः युरोपमधून मागणी कमी होऊ शकेल. त्यामुळे निर्यातीमध्ये आणि स्थानिक मागणीमध्ये सुद्धा अनिश्‍चितता येऊ शकेल.

बांगलादेशामधील आर्थिक संकटाची व्याप्ती कशी राहील हेही महत्वाचे आहे. कारण बांगलादेश हा कापसाचा जगातील सगळ्यात मोठा आयातदार देश आहे. तो भारतासाठी निर्यातीचे सर्वात मोठे मार्केट आहे. शेतकऱ्यांनी एकंदर परिस्थितीवर बारीक नजर ठेऊन कापूस विक्रीविषयीचा निर्णय घेणे योग्य ठरेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT