हरभरा दर दबावातच
1. सणांमुळं हरभऱ्याला मागणी वाढलेली आहे. त्यामुळं उत्तर भारतातील अनेक बाजारांमध्ये हरभरा दर मागील आठवडाभरात स्थिर होते. नाफेडही खुल्या बाजारात हरभरा विकतंय. मात्र मागणी असल्यानं दरात मोठी घसरण झालेली नाही. पण हमीभावापेक्षा सध्या हरभऱ्याला ८०० ते एक हजार रुपये कमी दर मिळतोय. सध्या देशभरात हरभऱ्याला ४ हजार २०० ते ४ हजार ६०० रुपये दर मिळतोय. बाजारातील मागणी आणि नाफेडची विक्री लक्षात घेता हरभरा दरात जास्त वाढ होण्याची शक्यता नाही, असं जाणकारांनी सांगितलं.
मक्याचे दर टिकून
2. ऑगस्ट महिन्यात मका दराने २८०० रुपयांचा टप्पा गाठला होता. त्यामुळं ऑक्टोबरपर्यंत मका ३ हजारांपर्यंत मजल मारेल, असा अंदाज अनेक जाणकार व्यक्त करत होते. मात्र झालं उलटं. मका दर वाढण्याऐवजी नरमले. देशातील बाजारात सध्या मक्याला २ हजार ४०० ते २५५० रुपये दर मिळतोय. त्यामुळं तेजीची अपेक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. वाढलेल्या दरात पोल्ट्रीकडून मक्याचा उठाव कमी झाला. त्यामुळं दर नरमले. पुढील महिनाभर मक्याचा हा दर टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
कोथिंबिरीच्या दरात मोठी तेजी
3. चालू वर्षी पावसाच्या तडाख्यात डाळिंब पिकाचा आंबिया बहर हातचा गेला. फळांची कुज, संततधार पाऊस व रोगांच्या प्रादुर्भावामुळं उत्पादनात ४० ते ५० टक्क्यांपर्यंत घट आली. त्यामुळं डाळिंबाचे दर सुधारत आहेत. नगर जिल्ह्यातील राहाता बाजार समितीत गुणवत्तापूर्ण डाळिंबाला उच्चांकी २५,५०० रूपये दर मिळाला. मात्र सरासरी दर ५ हजारांवर होता. चालु महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून शिवार खरेदीत प्रतिकिलो १७४ रुपयांचा कमाल दर मिळाला होता. त्यानंतर हा दर २५० रुपयांवर पोचला. पुढील काळात गुणवत्तापूर्ण डाळिंबाच्या दरात आणखी सुधारणा होऊ शकते, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
गुणवत्तापूर्ण डाळिंबाला दराची लाली
4. बाजारात सध्या कोथिंबिरीची आवक नगण्य होतेय. पावसामुळं कोथिंबिर प्लाॅटचं नुकसान झालंय. तर ऑगस्ट महिन्यात टाकलेले प्लाॅट अद्याप काढणीला आलेले नाहीत. त्यामुळं कोथिंबिरीची टंचाई भासतेय. मात्र मागणी कायम आहे. त्यामुळं कोथिंबिरीच्या दरात वाढ झाली. सध्या कोथिंबिरीला घाऊक बाजारात प्रतिजुडी २० ते ३० रुपयांचा दर मिळतोय. तर क्विंटलमध्ये हा दर १३ हजार ते १८ हजार रुपयांवर पोचलाय. पुढील काही दिवस हा दर टिकून राहील, असा अंदाज भाजीपाला व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय.
कापसाला केव्हा उठाव मिळेल?
5. देशातील अनेक भागांत कापसाची आवक (Cotton Arrival) सुरु झाली. मात्र ऑक्टोबरच्या मध्यापासून कापसाची आवक वाढेल. दुसरीकडे सध्या बाजारातील कापसाचे दर (Cotton Market Rate) तेजीतच आहेत. कापसाला ८ हजार ते १० हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. मात्र वायद्यांमध्ये कापूस दरात (Cotton Futures) जवळपास १७ टक्क्यांनी घट झाली. आठवड्याच्या सुरुवातीला कापसाचे वायदे ३५ हजार ६१६ रुपये प्रतिगाठीवर होते. एक गाठ १७० किलो रुईची असते. ते शुक्रवारी ३२ हजार ८१० रुपयांवर बंद झाले. वायद्यांमध्ये कापूस दर नरमण्याची मुख्यतः दोन कारणं आहेत. एक म्हणजे कापड बाजारातील (Textile Market) कमी उठाव आणि दुसरं म्हणजे उत्पादनवाढीचा अंदाज.
आर्थिक मंदीच्या सावटामुळं जागतिक कपड्यांची मागणी कमी झालीये. परिणामी कापड उद्योगाकडून सुताला आणि सूतगिरण्यांकडून कापसाला मागणी असल्याचं उद्योगांचं म्हणणये. तर यंदा कापसाची लागवड वाढली त्यामुळं उत्पादनही वाढेल, असा अंदाज व्यक्त होतोय. पण पिकाच्या नुकसानीमुळं उत्पादनात जास्त वाढ होणार नाही, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. तसचं सध्या कापसाचा साठा जास्त नाही. कपड्यांनाही सणांच्या काळात मागणी वाढेल. त्यामुळं कापसाचे दरही सुधारतील, असा अंदाज आहे. ऑक्टोबर महिन्यात कापूस काहीसा दबावात येऊन साडेसात ते ८ हजार रुपयांपर्यंतही दर कमी होऊ शकतात. मात्र नोव्हेंबरपासून दरात सुधारणा होऊ शकेल. शेतकऱ्यांनी किमान ९ हजार रुपयांच्या दरपातळीवर लक्ष ठेऊन विक्रीचं नियोजन केल्यास फायदेशीर ठरू शकेल, असं जाणकारांनी सांगितलं.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.