Wheat Production
Wheat Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Wheat Production : सलग दुसऱ्या वर्षी गहू उत्पादन घसरणार?

Team Agrowon

Wheat Market Update उत्तर आणि मध्य भारतात सध्या उष्णतेची लाट (Heat Wave) आल्यामुळे गव्हाच्या उभ्या पिकावर परिणाम होण्याची शक्यता आहे. गहू सध्या पक्वतेच्या अवस्थेत आहे. या वेळी पिकाला थंडीची गरज असते.

त्याऐवजी तापमानात (Temperature) मोठी वाढ झाल्यामुळे दाण्याचं नुकसान (Crop Damage) होण्याची भीती आहे. त्यामुळे देशातील गहू उत्पादन (Wheat Production) सलग दुसऱ्या वर्षी घसरण्याची चिन्हे आहेत. रॉयटर्स वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.

केंद्र सरकारला यंदा विक्रमी गहू उत्पादनाची अपेक्षा होती. आताही केंद्रीय कृषी आयुक्त डॉ. पी. के. सिंह विक्रमी गहू उत्पादनाच्या अंदाजावर ठाम आहेत. परंतु प्रत्यक्षात शेतांमधली परिस्थिती चिंता वाढवणारी आहे.

वाढत्या उष्णतेमुळे गव्हाचे उत्पादन कमी होण्याची भीती आहे. तर दुसऱ्या बाजूला गव्हाचा सरकारी गोदामांमधला साठा कमी होऊन तो गेल्या सहा वर्षांतील नीचांकी पातळीला पोहोचला आहे.

त्यामुळे गेल्या वर्षी गहू निर्यातीवर बंदी घातलेल्या भारताला आता गव्हाची आयात करण्याची नामुष्की ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ‘अजून हिवाळा संपलेला नाही. परंतु दिवसाचं तापमान वाढलंय. आताच उन्हाळा सुरू झाल्यासारखं तापमान आहे.

सध्या,’ रामेश्‍वर चौधरी म्हणाले. चौधरी हे राजस्थानमधल्या निवाई गावचे गहू उत्पादक शेतकरी आहेत. उन्हाचा चटका कमी व्हावा म्हणून आम्ही पिकाला पाणी देतोय, पण त्याच्यापलीकडे आमच्या हातात काही नाही, असे ते म्हणाले.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीनुसार काही गहू उत्पादक पट्ट्यांमध्ये फेब्रुवारीत काही दिवस तापमान ३९ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. सरासरीपेक्षा तापमान १० अंश सेल्सिअस जास्त राहिले.

तापमान जास्त असल्यामुळे पीक लवकर पक्व होईल आणि त्यामुळे गव्हाचे दाणे आक्रसून जातील. गेल्या वर्षीही असंच झालं होतं, असं चौधरी म्हणाले.

यंदाचा फेब्रुवारी महिना हा गेल्या १२२ वर्षांतला सर्वाधिक उष्ण फेब्रुवारी ठरला. हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार मार्च महिन्यात आणखी एक उष्णतेची लाट येणार आहे. विशेषतः मध्य आणि उत्तर भारतात ही लाट येणार असून याच भागात गव्हाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

मार्च महिन्यात उष्णतेची लाट आल्यास पिकाचे आणखीनच नुकसान होणार असून, पिकाला आताच ताण बसलेला दिसत आहे, असे गोपीलाल जाट या शेतकऱ्याने सांगितले.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात उष्णतेची लाट आल्यामुळे गव्हाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले होते. अमेरिकी कृषी विभागाच्या (यूएसडीए) आकडेवारीनुसार गव्हाची स्थानिक गरज १०३.६ दशलक्ष टन असताना गहू उत्पादन घसरून १०० लाख टनांपर्यंत आले होते.

केंद्र सरकारने गेल्या महिन्यात सांगितले होते, की यंदाच्या हंगामात गव्हाचे उत्पादन विक्रमी ११२.२ दशलक्ष टन राहण्याची शक्यता आहे. परंतु व्यापारी संघटना मात्र त्यावर विश्‍वास ठेवायला तयार नाहीत.

‘‘मार्चमधील जादा तापमानामुळे गव्हाचे उत्पादन ४० ते ५० लाख टनांनी कमी होण्याची शक्यता आहे. आमच्या अंदाजानुसार यंदा गहू उत्पादन १०६ ते १०७ दशलक्ष टन राहील,’’ असे रोलर फ्लोअर मिलर्स फेडरेशन ऑफ इंडियाचे (आरएफएमएफआय) अध्यक्ष प्रमोद कुमार म्हणाले.

काही व्यापार संस्थांच्या मते मात्र उत्पादन त्यापेक्षाही जास्त घटण्याची चिन्हे आहेत. ‘‘आम्ही गहू उत्पादनाचा अंदाज १०९ दशलक्ष टनांवरून कमी करून १०३ दशलक्ष टनावर आणला आहे,’’ असे नवी दिल्लीतील एका डीलरने सांगितले.

हवामान विभागाने सांगितल्यानुसार मार्चमध्ये जर तापमान सरासरीपेक्षा जास्त राहिले, तर गव्हाचे उत्पादन १०० लाख टनांपर्यंत खाली येऊ शकते, अशी पुस्ती या डीलरने जोडली.

गव्हाचे उत्पादन घटल्यास बाजारात गव्हाचे दर किमान आधारभूत किमतीपेक्षा (हमीभाव) जास्त राहतील, असे या डीलरने सांगितले. गेल्या वर्षी सरकारी खरेदीत तब्बल ५३ टक्के घट झाली. गेल्या वर्षी केवळ १८.८ दशलक्ष टन गहू खरेदी झाली. त्यामुळे स्थानिक बाजारात गव्हाचे दर भडकले.

या स्थितीत गव्हाचे दर कमी करण्यासाठी भारतीय अन्न महामंडळाला ५० लाख टन विक्रीसाठी खुला करावा लागला. महामंडळाकडून गव्हाची विक्री सुरूच आहे. पण त्याचा परिणाम म्हणजे सरकारी गोदामांमधला साठा निम्म्यावर येण्याची शक्यता आहे.

एप्रिलपासून नवीन विपणन वर्ष सुरू होईल तेव्हा सरकारी गोदामांतला गव्हाचा साठा १०.२ दशलक्ष टन राहण्याचा अंदाज आहे. गेल्या सहा वर्षांतील हा नीचांकी साठा आहे, असे यूएसडीने म्हटले आहे.

हा साठा वाढविण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांकडून ३४ दशलक्ष टनापेक्षा जास्त गहू विकत घेण्याचा घाट घातला आहे.

‘‘केंद्र सरकार अन्नसुरक्षेसाठी आणि गव्हाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी शक्य ते सगळे प्रयत्न करेल. गरज पडली तर सरकार गव्हाची आयात देखील करेल,’’ असे ‘आरएफएमएफआय'चे कुमार म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Farmer : निवडणूक काळात संत्रा उत्पादक उपेक्षित

Chara Chavani : चारा छावण्या सुरू करण्याची पशुपालकांची मागणी

Cotton Sowing : महाराष्ट्रात कापसाचा पेरा राहणार ४२ लाख हेक्टरवर

Animal Heat Stress : वाढत्या उष्म्याचा पशुधनाला धोका

Agriculture Technology : शेती तंत्रज्ञान, पिकांबाबत शेतकरी साक्षर असणे गरजेचे

SCROLL FOR NEXT