Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीन भाव तीन वर्षातील निचांकी पातळीवर; सोयाबीन बाजारात स्टाॅकिस्ट सक्रीय का नाहीत ?

Market Update : सोयाबीनचे भाव गेल्या दोन आठवड्यापासून स्थिरावलेले आहेत. जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ झाल्याने हेज फंड्स म्हणजेच सोयाबीन बाजारात येणारी गुंतवणूक कमी झाली आहे.

Anil Jadhao 

Pune News : सोयाबीनचे भाव गेल्या दोन आठवड्यापासून स्थिरावलेले आहेत. जागतिक सोयाबीन उत्पादनात वाढ झाल्याने हेज फंड्स म्हणजेच सोयाबीन बाजारात येणारी गुंतवणूक कमी झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची विक्री वाढली. त्यामुळे भाव गेल्या तीन वर्षातील निचांकी पातळीवर आले आहेत. याचा दबाव आपल्याही सोयाबीनवर दिसतो. देशातही सोयाबीनचा स्टाॅक होताना दिसत नाही. त्यामुळे भावात जास्त तेजी-मंदी होताना दिसत नाही. 

देशातील बाजारात सोयाबीनची आवक आजही टिकून आहे. रोज किमान दीड लाख क्विंटल सोयाबीनची आवक होत असल्याचे उद्योगांकडून सांगितले जात आहे. यंदा देशातील उत्पादन कमी झाले तरी मागील हंगामातील सोयाबीन अनेक शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे आहे. त्यामुळे बाजारातील पुरवठा जास्त असल्याचे उद्योगांकडून सांगितले जात आहे. याचाही दबाव देशातील बाजारावर दिसून येत आहे. त्यासोबत आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदीचाही दबाव भावावर दिसून येत आहे. सध्या देशात सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ६०० रुपयांचा भाव मिळत आहे. 

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे भाव पडलेले आहेत. आधीच भाव कमी होते त्यात पुन्हा नरमाई आली. भारत सरकारने आयातशुल्कही कमी करून ठेवले आहे. यामुळे तेलावरील दबाव कायम आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयापेंड स्वस्त झाल्याने देशातून निर्यात होणाऱ्या सोयापेंडलाही चांगला भाव मिळत नाही. आपलं सोयापेंड नाॅन जीएम असूनही पाहीजे त्या प्रमाणात प्रिमियम भाव मिळत नाही किंवा विक्रेत्यांकडून तेवढा प्रिमियम घेतला जात नाही. याचाही फटका आपल्या सोयाबीन उत्पादकांना मिळत आहे. 

जागतिक बाजारात सोयाबीन भाव पडण्याला दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे वाढलेला पुरवठा, दुसरं म्हणजे हेज फंड्सची वाढलेली विक्री. जागतिक सोयाबीन बाजारात निराशेचे वातावरण आहे. यंदा आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा पुरवठा वाढला. म्हणजेच यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन वाढल्याचा अंदाज जगातील सर्वच महत्वाच्या संस्थांनी व्यक्त केला. जागतिक सोयाबीन उत्पादनात टाॅपच्या तिन्ही देशांनी आपला दबदबा कायम ठेवला. ब्राझीलचं उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी होणार आहे. पण अर्जेंटीना गेल्यावर्षीपेक्षा दुप्पट उत्पादन घेईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटीना या तीन देशांचा एकूण जागतिक सोयाबीन उत्पादनात ८० टक्क्यांपर्यंत वाटा आहे. तर सोयाबीनचा मुख्य ग्राहक असलेल्या चीनचा वाटा केवळ ५ टक्के आहे. ब्राझीलने मागच्या हंगामात विक्रमी उत्पादन घेतले होते. त्यामुळे ब्राझीलची सोयाबीन निर्यात २९ टक्क्यांनी वाढली. तर अमेरिकेची निर्यात १४ टक्क्यांनी घटली आहे. कारण ब्राझीलमध्ये उत्पादन वाढल्याने भाव कमी होते. यामुळे निर्यात वाढली. अमेरिका आणि ब्राझीलच्या सोयाबीन निर्याताचा जागतिक निर्यातीत तब्बल ८० टक्के वाटा आहे. 

बाझीलमध्ये यंदा गेल्यावर्षीपेक्षा उत्पादन कमी राहणार असले तरी काढणी जोमात सुरु आहे. यामुळे बाजारात पुरवठा वाढत आहे. पुरवठा वाढल्याने सोयाबीनमध्ये फायदा दिसत नसल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातील हेज फंड्स म्हणजे सोयाबीनच्या स्टाॅकमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या बाहेर पडत आहेत. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची विक्री वाढलेली दिसते. याचा परिणाम सोयाबीनच्या भावावर झाला आहे.

नुकत्याच संपलेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची विक्री आधीच्या आठवड्याच्या तुलनेत चांगलीच वाढली. यामुळे सोयाबीन आणि सोयापेंडचा भाव गेल्या तीन वर्षातील निचांकी पातळीवर पोचला. सोयाबीन ११.३८ डाॅलर प्रतिबुशेल्सवर होते. तर सोयापेंड ३२७ डाॅलरवर आले. विक्री वाढल्याचा दबाव बाजारावर दिसून येत आहे. ब्राझील आणि अर्जेंटीनाच्या सोयाबीन उत्पादनामुळे जागतिक सोयाबीन बाजाराचे गणित बिघडले आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT