कॉँग्रेसकडून सरकारचा निषेध
अकोला जिल्हा कॉँग्रेसकडून रस्त्यावर सोयाबीन आणि कापूस फेकून सरकारचा निषेध करण्यात आला. सध्या कापूस आणि सोयाबीन पिकातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे जिल्हा कॉँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी (ता.२२) आंदोलन केलं. यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकार यांनी भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणांनं शेतकऱ्यांचं नुकसान केल्याचं मत व्यक्त केलं. शेतमाल हमीभावाच्या कायद्यासाठी हरियाणा-पंजाब शेतकरी आंदोलन करत आहेत. या शेतकरी आंदोलनला केंद्र सरकार दाबत आहे, असं अमानकार म्हणाले. दुसरीकडे कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हरियाणा-पंजाबच्या सीमेवर शेतकरी आंदोलकाच्या मृत्यूवरून सरकारवर जोरदार टीका केली. पटोले म्हणाले, "दिल्लीच्या शेतकरी आंदोलनात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. शेतकऱ्यांवर आंतकवाद्यांसारखा गोळीबार करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. भाजपचं शेतकरी विरोधी धोरण अंगलट येईल. भाजपला सत्तेवरून पायउतार करण्याचा कॉँग्रेसचा निर्धार आहे."
कांदा निर्यातबंदीवरून विखे-शिंदे भिडले?
कांदा निर्यातबंदी उठवण्यावरून राज्यात अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांनी गडबडीनं श्रेय पदरात ओढून घेण्याचे प्रयत्न केले. पण केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी हटवली नाही. यावरुन भाजपचे माजी आमदार राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्राला टोला लगवला आहे. ते गुरुवारी पत्रकार परिषदेत बोलत होते. शिंदे म्हणाले, "केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबतच्या बैठकीत कांदा प्रश्नावर चर्चा झाली का नाही झाली, यावरच शंका आहे." असं म्हणत टीका केली. यानंतर खासदार सुजय विखे यांनी पत्रकार परिषद घेऊन काही लोक गैरसमज पसरवत आहेत. सरकार ते सरकार अशी कांदा निर्यात करण्यात येणार आहे. कांदा निर्यात बंदी उठवण्यासंबंधी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यांनी मागणी पूर्ण केली. त्यासाठी गृहमंत्र्यांना मी धन्यवाद देतो." असं विखे म्हणाले. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर अहमदनगर जिल्ह्यात भाजप अंतर्गत माजी-आजी नेत्यांमध्ये शह-काटशह सुरू आहेत. त्यात कांदा निर्यातबंदीवरून रान पेटलं आहे. गुरुवारी संध्याकाळी ५५ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय सचिव रोहित कुमार सिंग यांनी पीटीआयला दिली. पण याबद्दल अधिकृत अधिसूचना आलेली नाही.
सोयाबीन-कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय
कांदा, सोयाबीन, कापसावरून आम्हाला राजकारण करायचं नाही. केंद्र सरकारनं काही हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यामुळं भाव स्थिर राहायला मदत होईल, अशी भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (ता.२३) पत्रकार परिषदेत मांडली. अजित पवारांनी यावेळी पाणी-चारा टंचाई, दुष्काळ, सोयाबीन, कापसाची खरेदीची माहिती दिली. ते म्हणाले, "कापूस आणि सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली आहेत. त्यामुळे सीसीआयला कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. सोयाबीनचीही खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं हमीभावाच्या वर कापूस सोयाबीनचे दर राहतील, असा निर्णय घेण्यात आला आहे." राज्यातील शेतकरी मात्र खरेदी केंद्र सुरू नसल्याचं सांगतात.
महानंदच्या हस्तांतरणावरून अजित पवारांनी राज्य सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, "विरोधक गैरसमज निर्माण करतात, एनडीडीबीनं महानंद चालवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हस्तांतरण झालेलं नाही. त्याची फक्त चर्चा सुरू आहे. काही संचालकांनी स्वखुशीनं राजीनामे दिले आहेत. त्यांच्यावर कुणीही दमदाटी केलेली नाही," असंही अजित पवार म्हणाले. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय यांनी सरकारवर टीका केली. "महानंदचा कारभार आता गुजरातमधून चालेल. राज्यातील उद्योग गुजरातकडे वळविले जात आहे. महानंदचे अध्यक्ष कोण होते? राधाकृष्ण विखे पाटील यांचे सख्खे मेहुणे. 'महानंद' ची ५० एकर जागा उद्योगपती अदानींना विकण्याचा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डाव असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
शेतकरी आंदोलनात शेतकऱ्याचा मृत्यू
शेतकरी आंदोलनात अजून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबमधील भट्टीडा जिल्ह्यातील अमरग्रह गावातील दर्शन सिंग असं शेतकऱ्यांचं नाव आहे. ते ६२ वर्षांचे होते. सकाळी ११ वाजता दर्शन सिंग यांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळं त्यांना जवळच्या पटरान कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये भरती करण्यात आलं. पण तेथून त्यांना राजेंद्र हॉस्पिटल पटियाला येथे हलवण्यात आलं. तिथे सिंग यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं. १३ फेब्रुवारीपासून पुकारण्यात आलेले दिल्ली चलो आंदोलनात खनौरी सीमेवर सहभागी होते. दर्शन सिंग यांच्या कुटुंबाला सरकारनं भरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय किसान युनियन एकता सिंधुपुर संघटनेचे सरचिटणीस रेशम सिंग यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.