Orange Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Orange Export Subsidy : संत्रा निर्यात अनुदानाची घोषणा फसवी

Orange Market Update : बांगलादेश सरकारकडून आयात शुल्कात केलेल्या वाढीनंतर नागपुरी संत्र्याची निर्यात मंदावली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : बांगलादेश सरकारकडून आयात शुल्कात केलेल्या वाढीनंतर नागपुरी संत्र्याची निर्यात मंदावली. त्याचा परिणाम दरावर झाला. त्या पार्श्‍वभूमीवर राज्य सरकारने निर्यात अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे.

खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा या संदर्भात व्यासपीठावरून घोषणा केली. परंतु हंगाम अंतिम टप्प्यात असताना या विषयी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयच न झाल्याने ही घोषणा निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप संत्रा बागायतदारांमधून होत आहे.

राज्यात सुमारे दीड लाख हेक्‍टर तर एकट्या विदर्भात एक लाख हेक्‍टरवर नागपुरी संत्रा आहे. राज्याची एकूण उत्पादकता पाच लाख टन इतकी आहे. उत्पादीत संत्रा फळांपैकी सुमारे अडीच ते तीन लाख टन संत्र्याची निर्यात बांगलादेशला होते. मात्र यंदाच्या हंगामात बांगलादेशने आयात शुल्कात प्रती किलो ८८ रुपये अशी वाढ केली. त्याच्या परिणामी संत्र्याची निर्यात निम्म्याहून कमी झाली आहे.

निर्यात मंदावल्याने देशाअंतर्गत बाजारपेठेत संत्र्याचे दर गडगडले. नोव्हेंबर महिन्यात २५ ते ४० हजार रुपये टन विकल्या जाणारा संत्रा २० ते २५ हजार रुपयांवर आला. याचा सर्वाधीक फटका वरुड, मोर्शी या सर्वाधीक संत्रा लागवड असलेल्या भागाला बसला.

संत्रा उत्पादकांनी याविरोधात सातत्याने रोष व्यक्‍त केला. शेतकऱ्यांमध्ये या वाढत्या असंतोषाची दखल घेत राज्य शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संत्रा निर्यातीसाठी अनुदानाची घोषणा केली.

संत्र्याच्या आयात शुल्कातील ५० टक्‍के शुल्काची प्रतिपूर्ती शासन करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. मात्र हे अनुदान कोणाला आणि कशाप्रकारे दिले जाईल, याबाबत कोणतेच धोरण मांडण्यात आले नाही.

इतकेच काय तर मंत्रिमंडळ बैठकीतही याविषयी अद्याप चर्चा घडून आली नाही. त्यामुळे आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना या निर्णयाची अंमलबजावणी कधी आणि कशी होणार याबाबतही संत्रा उत्पादकांमध्ये अनभिज्ञता आहे.

कोरोना काळातही फळांचे दर कोसळले होते. त्या पार्श्‍वभूमीवर रेल्वेव्दारा फळ वाहतुकीला प्रोत्साहन मिळावे याकरिता रेल्वेला ५० टक्‍के अनुदान देण्यात आले होते. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत संत्रापट्ट्यातून २१ रेल्वेने देशभरात संत्रा पोचला होता. त्याच धर्तीवर आताही वाहतूकदारांबाबत वेगळे धोरण असावे, अशी देखील मागणी आहे.

ज्या व्यापाऱ्यांनी बांगलादेशला निर्यात केली; त्या व्यापाऱ्यांसह ज्या शेतकऱ्यांनी कमी दरात संत्रा विकला अशा बागायतदारांना दरातील तुटीची तफावत रक्‍कम अनुदान स्वरुपात देण्याचे धोरण असावे. तूर्तास शासनस्तरावर कोणतेच धोरण निश्‍चित नाही. दुसरीकडे आंबिया हंगाम संपल्यात जमा आहे. त्यामुळे अनुदान योजनेबाबत अस्पष्टता आहे. शासनही या विषयावर गंभीर असल्याचे दिसत नाही.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज
केंद्रीय वाणिज्य मंत्रालय आणि अपेडा या दोन्ही यंत्रणाच्या अखत्यारीतील हा विषय आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी सातत्याने पत्रव्यवहार केला. परंतु त्यांच्या पत्राची कोणतीच दखल वाणिज्य मंत्रालयाकडून घेण्यात आली नाही. संत्रा निर्यात धोरणात ठोस भूमिका त्यांना बजावता आली नाही. परिणामी संत्रा विषयात आम्ही निर्णय घेऊन दिलासा दिला हे पटविण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्यात अनुदानाची घोषणा करुन मोकळे झाले. मात्र मंत्रिमंडळ बैठकीत असा कोणताच निर्णय झाला नाही. परिणामी ही धूळफेक असल्याचे स्पष्ट होते.
- ॲड. धनंजय तोटे, अध्यक्ष, महाराष्ट्र संत्रा बागायतदार संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Elections: सोलापुरात ‘आयात’ नेत्यांच्या जोरावर भाजपची मोर्चेबांधणी

E Crop Survey: रब्बी हंगामातील ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्राची ई-पीक पाहणी बाकी

Maharashtra Elections 2026 Exit Poll: 'भाजप'चेच वर्चस्व; मुंबई ठाकरेंच्या हातून निसटणार, एक्झिट पोलचे आकडे काय सांगतात?

Cotton Rate: कापसाच्या भावात चढ उतार कशामुळे सुरू आहेत?

Livestock Health: बळीराजाचे पशुधन संसर्गजन्य रोगामुळे संकटात

SCROLL FOR NEXT