दहिगाव उपसा सिंचन योजना बंद असताना पाऊस लांबणीवर पडला. विहिरी आणि बोअरची पाणी पातळी खालावल्याचाही फटका करमाळा तालुक्याच्या पूर्व भागातील दहा हजार एकर क्षेत्राला बसतो आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून, केळी निर्यातीवर याचा परिणाम होणार आहे. गेल्या चार- पाच वर्षांपासून करमाळा तालुक्यातील केळी पिकाखालील क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून होत असलेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील वरकटणे, सरपडोह, सौंदे, साडे, कोंढेज, गुळसरी, शेलगाव, साडे, निंभोरे, देवळाली, कुंभेज या गावच्या परिसरात केळी पिकाखालील क्षेत्र वाढले होते.
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार असूनही अद्याप गुऱ्हाळे सुरू आहेत. पावसामुळे गुळाचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी गुऱ्हाळ मालकांना झगडावे लागत आहे. परिणामी गुळाचे दर गेल्या पंधरवड्याच्या तुलनेत क्विंटलला सुमारे दोनशे रुपयांनी कमी झाले आहेत. गुळाची एक दिवसाआड २ ते ३ हजार रव्यांची आवक होत आहे. गुळास क्विंटलला ३६०० ते ३८०० रुपये दर मिळत आहेत. एक किलो व दहा, तीस किलोच्या परिमाणात गूळ रवे बाजार समितीत येत आहेत. गुजरातमधील व्यापाऱ्यांनीही शीतगृहातील गूळ विक्रीस काढण्याला प्राधान्य दिले आहे. यामुळे सध्या तयार होणाऱ्या गुळास अपेक्षित मागणी नसल्याचे चित्र आहे.
पुणे जिल्ह्यातील गेल्यावर्षी दौंड तालुक्यात सरासरीच्या दीडपट पाऊस झाला. मात्र, जुलै महिन्यातील पंधरा दिवसांमध्ये अनेक भागात कमी पाऊस होता. पावसाने मोठी ओढ दिल्याने तालुक्यातील जिरायती भागावर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला. यंदा वळवाचा नाही अन् मोसमी पाऊसही समाधानकारक पडला नाही. जिरायती भागात अद्याप खरिपाच्या पेरण्या झाल्या नाहीत. पांढरेवाडी, कुसेगाव, पडवी या भागात मध्यंतरी झालेल्या थोड्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. मात्र, लवकर पाऊस झाला नाही तर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार आहे.
पुणे बाजार समितीमधील फळे, भाजीपाला विभागातील डमी अडत्यांना चाप लावण्यासाठी संचालक मंडळाने प्रत्येक अडत्याने दोन मदतनीस असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला अडत्यांनी केराची टोपली दाखवत आदेश धुडकावले आहेत. रविवारअखेर एकाही अडत्याने प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही. यामध्ये खुद्द दोन व्यापारी संचालकांचा देखील समावेश आहे. बाजार समितीमध्ये अनेक अडत्यांनी गाळे भाडेतत्वावर देऊन, इतर व्यवसायात आपले बस्तान बसविले आहे. तर अनेक अडते स्वतः व्यापार न करता केवळ नियमबाह्य भाडे घेत आहेत. अडत्यांच्या या बेकायदेशीर कार्यपद्धतीमुळे डमी अडत्यांचा सुळसुळाट बाजार समितीमध्ये झाला आहे.
पानमळ्यांची उतरण झाल्यानंतर उन्हाळी पावसाने दडी मारली. याचा परिणाम पानांच्या फुटव्यावर झाला असून खाऊच्या पानांच्या उत्पादनात घट झाली आहे. बाजारात पानांची आवक कमी असून मागणी वाढली आहे. यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा २५ टक्क्यांनी दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पान उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भाग हा भाग पान मळ्यांसाठी प्रसिद्ध आहे. या भागातील खाऊची पाने पंढरपूर, सोलापूर, कोकण यासह अन्य ठिकाणी विक्री होतात. मात्र गेल्या तीन वर्षांपासून अति पावसामुळे पान उत्पादक शेतकरी संकटात होते. त्यातच बाजारपेठेत पानांची आवक वाढली, मागणी कमी झाली यामुळे पानांचे दर कमी होते. परिणामी उत्पादन खर्चही मिळणे मुश्कील झाले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पानमळ्यांची शेती कमी केले असल्याचे चित्र आहे.
यंदा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीन महिन्यांत नागवेलींची उतरण केली. त्यानंतर उन्हाळी पाऊस झाला नाही. त्यातच मॉन्सून पाऊस वेळेत सुरू झाला नाही. या साऱ्याचा परिणाम फुटव्यावर झाला आहे. त्यामुळे वेलींना पानांची संख्या कमी आहे. त्यामुळे उत्पादनात ४० टक्क्यांनी घट झाली आहे. यंदाच्या हंगामात पानांची विक्री सुरू झाली आहे. बाजारात पानांची आवक कमी असून मागणी अधिक आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.