Orange  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Orange Import Duty : बांग्लादेशकडून संत्रा आयात शुल्कात २५ रुपयांची वाढ

Orange Market Update : नागपुरी संत्र्यांचा एकमेव आयातदार असलेल्या बांगलादेशने परत एकदा आयात शुल्कात तब्बल २५ रुपयांची वाढ केली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : नागपुरी संत्र्यांचा एकमेव आयातदार असलेल्या बांगलादेशने परत एकदा आयात शुल्कात तब्बल २५ रुपयांची वाढ केली आहे. पूर्वीच्या ६३ रुपयांवर आता प्रतिकिलो ८८ रुपयांची आकारणी केली जाईल. याचा संत्रा निर्यातीवर मोठा परिणाम होईल. यापूर्वी बांगलादेशला दीड लाख टन संत्रा निर्यात होत होती. शुल्क वाढीच्या परिणामी ती निम्म्यावर आली असताना आता त्यात पुन्हा घट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे.

‘सार्क’ देशांनी एकमेकांवर कर लादू नये, अशी तरतूद आहे. असे असतानाही बांगलादेश मात्र सातत्याने या नियमाचा भंग करून संत्रा उत्पादकांना वेठीस धरत असल्याचा आरोप संत्रा बागायतदार संघाकडून केला जात आहे. २०१९ मध्ये २० रुपये, २०२० मध्ये ३०, २०२१ साली ५१ तर नोव्हेंबर २०२२ मध्ये ६३ रुपये अशी प्रतिकिलो आयात शुल्कात वाढ करण्यात आली. त्यानंतर आता नुकतेच आयात शुल्क तब्बल २५ रुपयांनी वाढवून ८८ रुपये करण्यात आले आहे.

युरोपियन देशांचे निर्यात निकषामुळे संत्रा फळांच्या त्या देशांतील निर्यातीला मर्यादा आहेत. याउलट बांग्लादेशकडून मात्र कोणत्याही अटी, निकषाविनाच संत्रा खरेदी होते. बांगलादेशचे व्यापारी थेट भारतात येऊन स्थानिक व्यापारी, अडत्यांच्या माध्यमातून सौदे करतात. पश्‍चिम बंगाल मार्गे रस्ते मार्गाने थेट बांगलादेशला निर्यात केली जाते.

२००५ साली बांगलादेश आयातदार संघटनेचे अध्यक्ष इसरार अली व भारतातील निर्यातदार शेतकरी यांच्यात ‘अपेडा’च्या पुढाकारातून नागपुरात बैठक झाली. ‘अपेडा’चे तत्कालीन अध्यक्ष अतित त्रिपाठी व तत्कालीन सचिव मोहन तोटे उपस्थित होते.

त्यावेळी आयात शुल्क न आकारण्याचा निर्णय झाला. सार्क देशातील व्यवहारासंबंधीच्या अटी-शर्तीत देखील एकमेकांकडून कोणतेही शुल्क न आकारण्याचे ठरले आहे. परंतु बांगलादेशकडून मात्र सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते.

दीड लाख टनांची निर्यात ६० हजार टनांवर

राज्याच्या एकूण ५ लाख टन संत्रा उत्पादनापैकी सुमारे दीड लाख टनाची निर्यात एकट्या बांगलादेशला होते. परिणामी संत्रा उत्पादकांना चांगला दर मिळतो. गेल्या काही वर्षात बांगलादेशने सातत्याने आयात शुल्क वाढविल्याने दीड लाख टनाची निर्यात ६० हजार टनांपर्यंत खाली आली आहे.

आता पुन्हा आयात शुल्क वाढीने त्यात घट होण्याची शक्यता आहे. खरेदी दर, बांगलादेशपर्यंतचा वाहतूक खर्च आणि प्रतिकिलो ८८ रुपये आयात शुल्क यामुळे बांगलादेशमधील ग्राहकांना प्रतिकिलो संत्र्यासाठी अधिक रक्‍कम चुकवावी लागेल.

पुण्यात फलोत्पादन विषयक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात बांगलादेशने वाढविलेल्या आयात शुल्काचा मुद्दा महाराष्ट्र संत्रा बागायतदार संघाने उपस्थित केला. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सचिव मनोजकुमार आहुजा यांनी दोन्ही देशांच्या वाणिज्य मंत्रालयाच्या माध्यमातून यावर बैठक घेणार असल्याचे सांगितले. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष आहे.आयात शुल्क कमी न झाल्यास त्याचा निर्यातीवर मोठा परिणाम होईल.
- ॲड. धनंजय तोटे, अध्यक्ष, महाराष्ट्र संत्रा बागायतदार संघ
संत्र्यांसाठी बांगलादेश मोठा ग्राहक आहे. मात्र आयात शुल्कात सातत्याने होणाऱ्या वाढीने निर्यातीवर परिणाम होईल. स्थानिक बाजारातील दरावरही परिणाम होईल. त्यामुळे गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे. या प्रकरणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घ्यावा.
- श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT