
Orange Cultivation : राज्यात सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावर नागपुरी संत्रा लागवड असून, त्यापैकी सर्वाधिक एक लाख हेक्टर क्षेत्र एकट्या विदर्भात आहे. राज्याचे एकूण उत्पादन पाच लाख टन आहे. उत्तम प्रत, मोठा आकार यावर फळांना बाजारात मागणी आणि दर मिळतो.
या प्रतवारीमध्ये मागे पडलेल्या सुमारे ३० ते ३५ टक्के लहान फळांना फारसे मूल्य मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते.
अनेकदा ही फळे बांधावरच फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. त्यांचा वापर प्रक्रियेमध्ये करता आल्यास शेतकऱ्यांच्या फायद्यामध्ये वाढ होऊ शकते. मात्र संत्र्यामधील बिया रस काढतेवेळी चिरडल्या जात असल्याने रसामध्ये कडवटपणा उतरतो. सामान्यतः तो दूर करण्यासाठी साखरेचा वापर केला जातो.
मात्र आरोग्यासाठी जागरूकता वाढलेली असल्यामुळे अधिक शर्करायुक्त रसापासून लोक दूर राहण्याचा प्रयत्न करतात. तसेच मूळ चवीतही बदल होतो. ही बाब लक्षात घेता बिया वेगळ्या काढून प्रक्रिया करणाऱ्या संयंत्राची मागणी होत होती. ती लक्षात घेऊन केव्हीके, दुर्गापूर येथील अन्न प्रक्रिया तज्ज्ञ राहुल घोगरे त्या दिशेने अभ्यास आणि संशोधनाला प्रारंभ केला.
केंद्राचे प्रमुख डॉ. के. पी. सिंग यांचे मार्गदर्शन मिळाले. केंद्रामध्ये आवश्यक ती साधणे व यंत्रे नसल्यामुळे खासगी वर्कशॉपमध्ये संकल्पनेवर आधारित प्रारूप विकसित करण्यात आले. मौज (मोबाइल ऑरेंज ज्यूस युनिट) असे नाव देण्यात आले आहे. त्यातून संत्र्याचा आरोग्यदृष्ट्या निर्जंतुक आणि ताजा रस उपलब्ध होण्यास मदत झाली आहे.
...असे आहे तंत्रज्ञान
संयंत्राविषयी माहिती देताना राहुल घोगरे यांनी सांगितले, की संत्रा ज्यूस कडवट होण्यामागे त्यातील बिया आणि त्यातील फायबर हे कारणीभूत ठरतात. संत्र्याचे दोन भाग करून, आतील भागावर हलका दाब देण्यासाठी स्टील बॉलचा वापर केला आहे. संत्र्याच्या आतील भागावर हलका दबाव पडत असल्याने बी फुटत नाही.
या नव्याने विकसित प्रारूपामध्ये कोल्ड प्रेस तंत्रज्ञान वापरलेले असल्याने बिया आणि फायबर तुटत नाही. परिणामी, रसामध्ये कडवटपणा येत नाही. विजेवर चालणारे हे प्रारूप तासाला ६० ते १०० किलो संत्र्यावर प्रक्रिया करू शकते. यामध्ये मोसंबी, संत्रा आणि डाळिंब यांचाही रस काढत येत असल्याने बहुपयोगी ठरणार आहे.
सोप्या पद्धतीने हाताळणीसाठी हे संयंत्र विद्युतचलित वाहनावर बसविण्यात आले आहे. त्याची किंमत सहा लाख रुपये इतकी आहे. विजेवर चालणारे हे सयंत्र सौर ऊर्जेवर चालविण्याच्या दृष्टीने सध्या प्रयत्न सुरू असल्याचे राहुल घोगरे यांनी सांगितले.
अमरावतीत ९० टक्के अनुदानावर उपलब्धता
अमरावती जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीने आखलेल्या जिल्हा वार्षिक योजना २०२१-२२ अंतर्गत विशेष तरतूद केली आहे. त्यामध्ये केव्हीकेने विकसित केलेले मोबाइल संत्रा ज्यूस युनिट हे तीन तालुक्यात शेतकरी कंपन्या, स्वयंसाह्यता समूह यांना ९० टक्के अनुदानावर वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमाला कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची उपस्थिती होती. या संयंत्राकरिता कृषी विभागाकडून जाहिरात देऊन शेतकरी गट व शेतकरी कंपन्यांचे अर्ज मागविण्यात आले होते.
त्यातून लॉटरी पद्धतीने तिवसा महिला उत्पादक कंपनी, तिवसा; श्री ज्ञानेश्वर पुरुष बचत गट, सालोरा खुर्द, अमरावती; श्री दत्त माउली शेतकरी उत्पादक कंपनी, तोंडगाव, चांदूरबाजार यांची निवड करण्यात आली.
‘केव्हीके’ची अन्य शेतीपयोगी कार्ये
१) दर्जेदार बियाण्यांची उपलब्धता : केव्हीकेमध्ये सोयाबीन, तूर याचे प्रमाणित बियाणे उपलब्ध असते. त्यासाठी शेतकरी हंगामापूर्वीच नोंदणी करतात. हे बियाणे ‘महाबीज’च्या दरानुसार विनाअनुदानित तत्त्वावर उपलब्ध केले जाते.
दरवर्षी खरिपात सोयाबीन, तुरीचे सुमारे एक हजार क्विंटल आणि रब्बी हंगामात हरभऱ्याचे एक हजार क्विंटल बियाणे विकले जाते. दहा वर्षांच्या आतील वाण असल्याने उत्पादकता अधिक मिळते. हर्षद ठाकूर (संपर्क ः८३०८०१००३८) हे बियाणे विभाग प्रमुख आहेत.
२) कृषी विस्तारासाठी कम्युनिटी रेडिओ : प्रामुख्याने कृषी विस्तार, महिला सक्षमीकरण आणि ग्रामविकास यासाठी वाहिलेले कम्युनिटी रेडिओ सेंटरही जून २०१२ पासून चालवले जाते. त्याचा वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) ९०.४ एफ.एम. आहे. त्यावर सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी पाच ते आठ या वेळात कृषी क्षेत्राशी निगडित कार्यक्रमांचे प्रसारण होते.
त्यात शेतकऱ्याला आवश्यक हवामानाचा अंदाज, पेरणी ते काढणी व्यवस्थापन, बीज प्रक्रिया, निविष्ठा आणि विशेष करून जैव तंत्रज्ञान, जैविक खते, परिसरातील प्रयोगशील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, महिला स्वयंसाह्यता समूहाचे व्यावसायिक अनुभव यांचा समावेश असतो. त्याचे व्यवस्थापन प्रा. संजय घरडे (संपर्क : ८६०५५३१२८७) यांच्याकडे आहे.
संपर्क - राहुल घोगरे, ८२७५२८८९३८
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.